"जॉर्ज हे एक प्रभावी आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व होते. ते सातत्याने मागच्या सीटवर बसून आपले काम करत असत. कोकण रेल्वे प्रकल्पासाठी त्यांचे योगदान मोलाचे होते," असे सांगताना त्यांनी आणीबाणीच्या काळातील राजकीय संघर्षाचीही आठवण पवार यांनी करून दिली. "आज पुन्हा अघोषित आणीबाणीचे सावट दिसत आहे. सरकारच्या विरोधात मत मांडले की फोन येतात. ही स्थिती चिंताजनक आहे," असे तीव्र शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) चे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी वर्तमान व्यवस्थेवर टीका केली. २५ जून, १९७५ रोजी इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली तत्कालीन काँग्रेस सरकारने देशात लागू केलेल्या आणीबाणीला तसेच मुंबई लेबर युनियनचे संस्थापक अध्यक्ष पद्मविभूषण जॉर्ज फर्नाडिस यांच्या नेतृत्वाखालील बडोदा डायनामाइट कटाला २५ जून २०२५ रोजी ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मुंबईतील चर्चगेट येथील के.सी. कॉलेज हॉल, येथे विषेश कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) चे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी आपल्या भाषणात जॉर्ज फर्नांडिस यांच्या लढाऊ कार्यशैलीची आणि कष्टकरी जनतेसाठी त्यांनी केलेल्या कार्याची आठवण करून दिली. .
कार्यक्रमाचे अध्यक्षपदी माजी आमदार राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समितीचे नेते कपिल पाटील होते देशात अघोषित आणीबाणीचं वातावरण आहे, राज्यातील कर्मचारी संकटात आहेत आणि कामगार संघटनांच्या अस्तित्वालाच प्रश्न निर्माण झाला आहे. अशा स्थितीत आम्ही शरद पवार साहेबांची आठवण केली आहे. हे केवळ सन्मान नव्हे, तर आमचा हक्क आहे, कधीकाळी कामगारांच्या लढ्याला दिशा देणारे जे काही प्रभावी नेतृत्व होतं, ते आज कुठेच दिसत नाही. पवार साहेबांनी सांगितलेले लढा देणारे पाचजण जर नसते, तर आजचा लढाच संपून गेला असता" असे ठाम प्रतिपादन पाटील यांनी केले तसेच आजच्या कामगारांच्या स्थितीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. या कार्यक्रमात राजद्रोह आणि राज्याविरुद्ध युद्ध पुकारल्याच्या आरोपाखाली अटक झालेल्या आणि आणीबाणीला विरोध करणाऱ्या २२ आरोपींपैकी डॉ. जी. जी. परिकली, पद्मनल एच. शेट्टी, विजय नारायण सिंह, मोतीलाल कनोजिया आणि देवेंद्र मोहन गुजर यांचा त्यांच्या वीर कृत्यांसाठी आणि त्याच्या कारकिर्दीबद्दल सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन मुंबई कामगार संघटनेचे सरचिटणीस संजीव पुजारी यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. मुंबई लेबर युनियनचे सचिव दिनेश तावडे, अशोक जाधव यांच्यासह अनेक कामगार संघटनांचे सदस्य तसेच सर्वसामान्य जनता, सामाजिक/राजकीय कार्यकर्ते, मानवाधिकार रक्षक या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.मुंबईतील कामगारांच्या कठीण जीवनशैलीवर भाष्य करत कपिल पाटील पुढे म्हणाले, “आजचा कामगार बदलापूर, कर्जत, कसारा, नालासोपारा अशा दूरच्या ठिकाणाहून मुंबईत कामासाठी येतो. आठ तास काम करून तीन तास प्रवास करणारा हा खरा शहर निर्माता आहे. पण त्याच कामगाराला मुंबईत परवडणारे घर मिळत नाही, हे दुर्दैव आहे.” सरकारच्या आदेश, पोलीस परवानग्या आणि न्यायालयीन निर्बंध यांच्या गोंधळात कामगारांचे आवाज उठवण्याची व्यासपीठेच आता उरली नसल्याचे पाटील यांनी नमूद केले. “मोर्चांसाठी चौक उरले नाहीत. ही स्थिती फार गंभीर आहे,” असा इशारा त्यांनी दिला.
महापालिकेच्या नव्या टेंडर प्रणालीमुळे सफाई कामगारांच्या संख्येत झालेली कपात आणि त्यांचे हाल याकडेही त्यांनी लक्ष वेधले. “१२ हजार रुपये पगारात दोन वेळा सफाई करणाऱ्या कामगारांचं आयुष्य कसं चालणार? आणि ही कामं आजही दलित, वंचित घटकांनाच का करावी लागतात?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. गिरणी कामगार, माथाडी कामगार आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी निवारा मिळवून देण्यात शरद पवार यांच्या योगदानाची आठवणही त्यांनी करून दिली. पवार साहेबांनी केवळ घोषणा केल्या नाहीत, तर वसाहती उभ्या केल्या आणि घरं मिळवून दिली,”आम्हाला बोलावलं नाही याचं दुःख नाही, पण कामगारांचा आवाज उचलायचा असेल, तर आम्ही बोलणारच. नेतृत्व बदलू शकतं, पण कामगारांचे हक्क दुर्लक्षित होऊ देता येणार नाहीत.”


0 टिप्पण्या