Top Post Ad

अधिकारी, ठेकेदार आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या अभद्र युतीमुळेच ठाणेकरांची दैन्यावस्था

 ठाणे शहरात विकासकामांच्या नावाखाली, सर्वसामान्य करदात्या ठाणेकर नागरिकांची होणारी कुचंबणा, मेट्रो कामातील दिरंगाई, रस्त्यावरील खड्डे आणि त्यातून निर्माण होणारी प्रचंड वाहतूक कोंडी, यामुळे ठाणेकर जनता गेल्या काही वर्षांपासून सातत्याने त्रास सहन करीत आहे. ठाणे शहरातील मेट्रो प्रकल्प गेल्या कित्येक वर्षांपासून  रखडलेला असल्याने घोडबंदर रस्त्यावर नेहमीच वाहतूक कोंडी निर्माण होत असते. त्यातच अत्यंत निकृष्ट दर्जाचे बांधकाम साहित्य वापरुन तयार केलेले रस्ते म्हणजे, अपघाताला निमंत्रण ठरत आहेत. या संपूर्ण कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्यानेच, ठाणेकर नागरिक ‘करदाता’ असूनही, त्यांना त्यांच्या हक्काची नागरी-सुविधा मिळत नाही. याप्रकरणी सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरवा करण्यात येऊनही, ठाणे महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासन अक्षरशः गेंड्याच्या कातडीसारखे बनून राहिलेले आहे. याचा निषेध करण्यासाठी ठाणे कॉंग्रेसच्या वतीने, जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्त्वाखाली शुक्रवार, दि. २७ जून रोजी, घोडबंदर येथील आनंदनगर नाका, कासारवडवली येथे एकदिवसीय ‘लक्षवेधी-आंदोलन’ करण्यात आले  

 या आंदोलनाला आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. काँग्रेसच्या काळात सुरुवात झालेल्या घोडबंदर रोडची आजची अवस्था अतिशय वाईट असून या अवस्थेला केवळ ठाणे महानगर पालिका जबाबदार आहे. याकडे आयुक्तांचे संपूर्ण दुर्लक्ष असून आयुक्तांच्या समोर ठाण्याची दुर्दशा होत असताना आयुक्त केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला तर   ‘धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष राजन राजे यांनी ठाणे महानगरपालिका प्रशासन आणि राज्य शासनाच्या भोंगळ कारभाराचा निषेध केला. संबंधित प्रशासकीय अधिकारी, ठेकेदार यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी  यांच्या अभद्र युतीमुळेच, आज ठाणेकरांच्या वाट्याला ही वेळ आली आहे. म्हणून आगामी ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत, सर्वसामान्य नागरिकांनी खऱ्याखुऱ्या ‘मतदार-राजा’ची भूमिका डोळसपणे बजवावी, असे आवाहन  राजन राजे यांनी  केले. आमदार निरंजन डावखरे यांनी याबाबतीतील निवेदन घेऊन ते आपण मुख्यमंत्री आणि संबंधित प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा काम नक्कीच करू, ही एक ठाणेकर म्हणून माझी जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com