मुंबईतील नागरिकांची सुलभता हे महानगरपालिकेचे प्राधान्य आहे. यामध्ये कोणतीही हयगय किंवा तडजोड होऊ शकत नाही. रस्त्याच्या कडेला असलेल्या बेवारस तथा निकामी / भंगार वाहनांमुळे नागरिकांच्या सुलभतेत किंवा सुरळीत वाहतुकीमध्ये अडथळा निर्माण होतो. त्यामुळे, या कामासाठी नेमण्यात आलेली बाह्य संस्था आणि प्रशासकीय विभागस्तरावरील प्रशासन यांनी त्यांच्यातील योग्य समन्वय ठेवत रस्त्याच्या कडेला असलेली बेवारस तथा निकामी / भंगार वाहने तत्काळ निष्कासित करुन त्यांची विल्हेवाट लावावी. ‘बेवारस वाहनमुक्त / अडथळामुक्त रस्ते’साठी उत्तम प्रयत्नांसोबतच प्रसंगी कठोर कारवाईसुद्धा करावी, असे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले आहेत.
मुंबईतील बेवारस तथा निकामी / भंगार वाहनांविरोधात अधिक तीव्रतेने आणि जलद पद्धतीने कारवाई करण्याच्या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेने प्रशासकीय विभाग (वॉर्ड) स्तरावर मे २०२५ पासून बाह्य संस्था नेमली आहे. संबंधित प्रशासकीय विभाग आणि बाह्य संस्था यांच्याद्वारे यासंदर्भात कारवाई सुरू आहे. सुरू केलेल्या कारवाईचा आढावा, कारवाईदरम्यान येत असलेले अडथळे तथा उपाययोजनांसंदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आज १८ जून बैठक पार पडली. त्यावेळी गगराणी यांनी हे निर्देश दिले. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, सह पोलिस आयुक्त (वाहतूक) अनिल कुंभारे, उपायुक्त (वित्त) प्रशांत गायकवाड, विशेष कार्य अधिकारी (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) चंद्रशेखर चोरे यांच्यासह विविध परिमंडळांचे उपायुक्त, सर्व प्रशासकीय विभागांचे सहायक आयुक्त, प्रमुख अभियंता (रस्ते व वाहतूक) गिरीश निकम, उप प्रमुख अभियंता (वाहतूक) महेंद्र अग्रवाल आदी या बैठकीस उपस्थित होते.महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी पुढे म्हणाले, मुंबईतील नागरिकांना रस्त्यांवरुन सुलभतेने मार्गक्रमण करता यावे, यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून विविध प्रयत्न सुरू आहेत. मात्र, रस्त्यांच्या कडेला उभ्या असलेल्या बेवारस तथा निकामी / भंगार वाहनांमुळे खूप अडथळा निर्माण होतो. रस्त्यांवर वाहतुकीसाठी कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून ‘बेवारस वाहनमुक्त / अडथळामुक्त रस्ते’साठी पुढाकार घेण्यात येत आहे. बेवारस तथा निकामी / भंगार वाहनांविरोधात प्रशासकीय विभाग स्तरावर कार्यवाही केली जात आहे. मात्र, ही कार्यवाही अधिक तीव्र आणि जलदगतीने होण्यासाठी बाह्य संस्था नेमण्यात आली आहे.
संबंधित बाह्य संस्था आणि प्रशासकीय विभागस्तरावरील प्रशासन यांनी आपापसांत योग्य समन्वय ठेवून बेवारस तथा निकामी / भंगार वाहनांचे तत्काळ निष्कासन करावे. तसेच, संबंधित वाहन मालकांवर कारवाई करावी. केवळ दंडात्मक कारवाई करणे, हा प्रशासनाचा उद्देश नसून रस्त्यांवरील अडगळ दूर करण्यास प्राधान्य आहे, निकामी / भंगार वाहनांसोबतच इतर प्रकारचे अनधिकृत टाकाऊ / भंगार साहित्यसुद्धा तत्काळ निष्कासित करावे. आवश्यक त्या ठिकाणी कारवाईसाठी पोलिस प्रशासनाचे सहकार्य घेऊन विशेष मोहीम आयोजित करावी. बेवारस व निकामी / भंगार वाहनांविरोधातील कारवाईसंदर्भात पोलिस, कंत्राटदार आणि महानगरपालिका प्रशासन यांच्यातील समन्वयासाठी प्रत्येक प्रशासकीय विभाग स्तरावर समन्वय अधिकाऱ्यांची (नोडल ऑफिसर) नेमणूक करावी, असे निर्देशही गगराणी यांनी यावेळी दिले.

0 टिप्पण्या