नागपूर जिल्ह्यात खासगी प्राथमिक शाळांमध्ये तब्बल 580 शिक्षकांची बोगस पद्धतीने नियुक्त करण्यात आल्याचा काळाबाजार उघड झाला आहे. बनावट शालार्थ आयडीद्वारे शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करुन सरकराला कोट्यवधीची चुना लावण्यात आल्याचे उजेडात आले आहे. बोगस शिक्षकांशी संबंधित शालार्थ आयडी म्हणजेच त्यांचा वेतन देण्यासाठीच्या संगणिकृत प्रक्रिये संदर्भात अनेक डिव्हाईस (डेस्कटॉप कम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईल फोन) वेगवेगळ्या लोकेशन्सवरून वेगवेगळ्या आयपी ऍड्रेसद्वारे वापरले गेल्याचे दिसून येत आहे. तर मोठ्या संख्येने वेगवेगळे लोकेशन्स किंवा आयपी ऍड्रेस किंवा डिवाइस वापरले गेल्याचे प्राथमिक दृष्ट्या दिसून येत आहे. त्यामुळे सायबर सेल समोर या घोटाळ्याचा तपास करणं एक मोठं आव्हान होऊन बसले आहे. या प्रकरणी एकट्या नागपूर विभागात झालेल्या 580 शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांची चौकशी सुरु करण्यात आली आहे.
पोलिसांच्या तपासणीतून 2019 ते 2025 या सहा वर्षांच्या काळात तब्बल 1 हजार 56 शिक्षकांची बोगस भरती झाल्याचं समोर आलं आहे. शालार्थ आयडीच्या फसव्या वापरातून सुरु झालेला हा प्रकार, आता शिक्षण व्यवस्थेचा काळा अध्याय ठरत आहे. या घोटाळ्याचं मूळ एका छोट्याशा भागात असलं, तरी आता याचं जाळ संपूर्ण महाराष्ट्रभर पसरल्याचे स्पष्ट होत आहे. सरकारी अधिकाऱ्यांपासून खासगी संस्थाचालकांपर्यंतचं संगनमत, बनावट दस्तऐवज, बनवलेल्या नोकऱ्या आणि दरमहा पगारातून घेतले जाणारे कमिशन हे सर्व वास्तव सध्या सायबर पोलिसांच्या चौकशीत उघड होत आहे. नागपूर जिल्ह्यातील विठ्ठल-रुक्मिणी शिक्षण संस्थेचे प्रमुख दिलीप धोटे यांना विशेष तपास पथक (SIT) ने अटक केल्याने या प्रकरणाने वेग घेतला आहे. धोटे यांनी बनावट शालार्थ आयडीच्या आधारे तब्बल १५ शिक्षकांची भरती केली होती. विशेष म्हणजे, प्रत्येकी शिक्षकाकडून १५ लाख रुपये घेतल्याची कबुलीही समोर आली आहे. इतकंच नव्हे तर, नोकरी लागल्यानंतरही या शिक्षकांकडून दरमहा एक ठराविक रक्कम धोटे यांच्याकडे वळवली जात होती. या शिक्षकांची शासकीय कागदपत्रे वेगळ्या संस्थेत नियुक्त असल्याचं दाखवत असतानाच, प्रत्यक्षात त्यांची नोकरी राजाबक्षा येथील नवयुवक प्राथमिक शाळेत सुरु होती.भाजप प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निकटवर्तीय विठ्ठल रुक्मिणी शिक्षण संस्थेचे प्रमूख दिलीप धोटे यांना राज्यभर गाजत असलेल्या शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात अटक झाली आहे. काही संघ विचारांच्या शाळांचा देखील यात समावेश असल्याचे धागेदोरे समोर येत आहेत. सत्तेच्या आडून असे घोटाळे करणाऱ्यांवर फडणवीस सरकार ऍक्शन घेणार आहे का ? असा सवाल यशोमती ठाकुर यांनी सोशल माध्यमाद्वारे विचारला आहे.

0 टिप्पण्या