येत्या पंधरा दिवसात सातवली उड्डाणपूलाच्या सर्व्हिस रोडचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन तसेच रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे आणि वाहतूक कोंडीतून सर्वसामान्य नागरिकांची मुक्तता केली जाईल असे आश्वासन आज 21 जुन रोजी मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 वर गेल्या आठवड्याभरापासून मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीबाबत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत देण्यात आले. 400 वीजेचे खांब, दुभाजकाची उंची वाढवणे, 3 शिपमध्ये किमान 60 ट्राफिक वार्डन मागणी, पादचारी करिता पूल बनवणे. सातवली उड्डाण पुलाच्या कामामुळे 14 लोकांचा नाहक बळी गेल्याने मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणे अशा मुद्द्यांवर देखील या बैठकीत चर्चा करण्यात आली.
यावेळी आ. तरे म्हणाले की, मुंबई - अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 हा महामार्ग मुंबई व गुजरात राज्यांना जोडणारा नसून, तो महाराष्ट्राच्या औद्योगिक, व्यावसायिक व वैद्यकीय, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्त्वाचा आहे. विशेषतः पालघर जिल्ह्यातील बोईसर - तारापूर औद्योगिक क्षेत्र, वसई - विरार महानगर क्षेत्र, तसेच तेथील विविध कारखाने, आयात-निर्यात व्यवसाय, रुग्णालये व शैक्षणिक संस्था या सर्वांच्या दैनंदिन व्यवहारांसाठी या महामार्गाचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. मात्र, मागील आठवड्याभरापासून या महामार्गावर वारंवार आणि तीव्र स्वरूपाची वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या वाहतूक कोंडीमुळे अनेक प्रमाणे गंभीर परिणाम होत आहेत: वेळेवर रुग्णालयात पोहोचण्यास अडथळा निर्माण होत असून, यामुळे गंभीर आजारी रुग्णांचे प्राणही धोक्यात येऊ शकतात,
बोईसर - तारापूर एमआयडीसीमधील निर्यात योग्य मालाच्या वाहतुकीस विलंब होत असून, याचा परिणाम औद्योगिक गतीवर होत आहे, वेळेत कामावर पोहोचता न आल्याने अनेकांना दंडाचा, कापाचा किंवा गैरहजेरीचा सामना करावा लागत आहे, अनेक ठिकाणी रस्त्याचे काम अपूर्ण अवस्थेत सोडले गेले असून, खड्ड्यांमुळे अपघात व वाहतुकीचा अडथळा निर्माण होत आहे, या त्रासांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून, त्यांचा संयम सुटत चालला आहे. या पार्श्वभूमीवर, सदर समस्येवर तातडीने उपाययोजना करा, वाहतूक नियोजनात सुधारणा करा, संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय साधून नागरिकांना दिलासा मिळवून देणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने, ही बैठक बोलावण्यात आली आहे, असे 131 बोईसर (अ. ज.) विधानसभा आमदार विलास तरे यांनी सांगितले.

0 टिप्पण्या