परभणी प्रकरणी सरकारने अनेक आश्वासने दिली मात्र अजूनपर्यंत मारहाण करणाऱ्या पोलिसांवर गुन्हा नोंदविण्यात आलेला नाही, शासनाच्या या दडपशाही व नाकर्तेपणाच्या निषेधार्थ परभणी आणि इतर मराठवाड्यातील दलित आणि पुरोगामी कार्यकर्ते न्याय हक्कासाठी १७ जानेवारीपासून मुंबई च्या दिशेने मोर्चा घेऊन निघाले आहेत. ते मुंबईत अंदाजे १६-१७ फेब्रुवारीला पोचतील. या अन्यायाविरुद्ध मुंबईतील सर्व दलित आणि इतर पुरोगामी संघटनांनी एकत्र येऊन परभणीहून निघालेल्या मोर्चात सामील होऊन पाठींबा द्यावा असे आवाहन जाती अंत संघर्ष समिती, महाराष्ट्र अखिल भारतीय दलित अधिकार आंदोलन दलित पँथर सुवर्ण महोत्सव समन्वय समिती नारी अत्याचार विरोधी मंच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष सी पी आय. (माले), लाल निशाण लेनिनवादी राष्ट्रीय बहुजन संघ, भीम आर्मी, सविधान संवर्धन समिती. आदी संघटनांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. याबाबत अधिक माहिती देण्यासाठी आज मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी शैलेंद्र कांबळे, कॉ प्रकाश रेड्डी, सुबोध मोरे, संध्या गोखले, दादाराव पटेकर, अशोक कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्व न्यायप्रेमी आणि संविधानाच्या बचावासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना पाठींबा देण्यासाठी, मुंबईतील विविध वस्त्यांमध्ये चौक सभा, नाकेसभा आयोजित करण्यात सामाजिक, सांस्कृतिक संघटनांनी पुढाकार घ्यावा, तसेच लॉंगमार्च च्या वाटेवर होणाऱ्या सभा कार्यक्रमात नागरिकांनी, सामाजिक बांधिलकी मानणाऱ्या पुरोगामी, समतावादी, आंबेडकरी लेखक, कलावंत, साहित्यिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे आणि लॉंगमार्च चे समर्थन करावे. याबाबत कोणतीही सहाय्यक समितीचे गठन करण्यात आलेले नसून हे केवळ आवाहन असून परभणीतील दलितांवरील अत्याचाराच्या विरोधात परभणी ते मुंबई लाँग मार्च मध्ये, सामील व्हा असे उपस्थितांनी स्पष्ट केले.परभणी मध्ये, १० डिसेंबरला संध्याकाळी ४. ३० वाजता दत्ताराव पवार या इसमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या जवळील काचेत ठेवलेले संविधानाचे प्रतीकाची अवहेलना केली. मात्र तेथील लोकांनी लगेच त्याला पकडले आणि पोलिसांच्या हवाली केले. मात्र पोलिसांनी त्याला माथेफिरू म्हणून घोषित करण्याची बनवेगिरी केली. या विरोधात परभणीतील दलित आणि पुरोगामी संघटनांनी एकत्र येऊन ११ डिसेंबर ला बंद जाहीर केला. परभणी आणि आजुबाजुच्या परिसरात बंद शांततेत यशस्वी झाला. परंतु, बंद संपता संपता परभणीमध्ये अचानक एक गटाने दुकानांवर दगडफेक, रस्त्यावरील गाड्यांचे नुकसान सुरु केले. नंतर पोलिसांनी अश्रूधूर, लाठी हल्ला करून ती हिंसा थांबवली. त्यानंतर संध्याकाळी ४ वाजल्यानंतर पोलिसांनी जाणिवपुर्वक दलित वस्त्यांवर कोम्बिंग ऑपरेशन सुरु केले. ज्यांच्या घरावर, रिक्षा वर निळे झेंडे आहेत, बाबासाहेबांचे फोटो आहेत, त्या घरांमध्ये घुसून, दरवाजे, खिडक्या तोडून, अतिशय अमानवी, क्रूरतेने स्त्री, पुरुष, वृद्ध, मुले सगळ्यांवर लाठी, लाथा बुक्क्याने हल्ला सुरु केला. रस्त्यावर सुद्धा ज्यांच्या कपाळावर निळा टीका आहे, जय भीम गोंदवले, अशांवर पण लाठी, लाथा बुक्क्यांनी हल्ला केला. हे करताना पोलीस सतत जातीवाचक शिव्या देत, अतिशय अर्वाच्य भाषेत लोकांना धमकावत होते, याबाबत सर्वत्र व्हीडीओ व्हायरल झाले आहेत.
या सर्व प्रकारातच सोमनाथ सूर्यवंशी हा तरुण विध्यार्थी होता. अनेक जणांना पूर्ण रात्र पोलीस ठाण्यात डांबून जबरदस्त मारहाण केली. स्त्रिया आणि मुलींना सुद्धा पाठीवर, पायांवर दूरगाम पूर्ण रात्रभर पोलीस मारत राहिले. जे अति जखमी होते त्यांना पोलीस स्टेशन बाहेर फेकून दिले. कोणालाही रक्त बंबाळ असून सुद्धा काही वैद्यकीय उपचार केले नाहीत. ह्या पोलिसांच्या हिंसेमुळे सोमनाथ सूर्यवंशीचा न्यायालयीन कोठडीमध्ये १५ डिसेम्बरला मृत्यू झाला. अनेक जणांना ज्यात स्त्रिया सुद्धा आहेत अनेक दिवस रुग्णालयात राहावे लागले. पोलिसांनी दलितांवर केलेली ही हिंसा महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात निघृण आणि भयानक हिंसा आहे. या सगळ्याचा धक्का बसून परभणीतील लोकप्रिय दलित नेते श्री विजय वाकोडे यांचा मानसिक तणावामुळे सोमनाथच्या अंत्ययात्रेच्या दुसऱ्या दिवशी अचानक मृत्यू झाला. अनेक जणांनी पोलिसांच्या या छळाबद्दल तक्रार नोंदवायचा प्रयत्न केला पण पोलिसांनी तक्रार घेतली नाही. सोमनाथच्या मृत्यूनंतर पोलीस आणि सरकार दोघांनी अधिकृत शवविच्छेदन अहवाल येण्यापूर्वीच जाहीर केले, की त्याचा मृत्यू हृदय विकारामुळे झाला. सोमनाथचे शव विच्छेदन नांदेड ला उरकून पोलिसांना सर्व छळ केलेले पुरावे दडपून टाकायचे होते. परंतु परभणीतल्या कार्यकर्त्यांमुळे सोमनाथचे शव विच्छेदन औरंगाबादला झाले आणि पोलिसांनी केलेल्या छळामुळे मृत्यू झाला हे सत्य बाहेर आले.
पोलिसांच्या अमानुष हिंसेमुळे झालेल्या सोमनाथ आणि विजय वाकोडेच्या मृत्यूची खास चौकशी करून सर्व पोलीस अधिकाऱ्यांवर, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा लागू करून, FIR नोंदवून त्वरीत निलंबन कारवाई झाली पाहिजे. इतर अनेक स्त्री, पुरुष, मुले ह्याच्यावर जी हिंसा झाली, घरांची जी नासधूस केली त्याबद्दल पोलिसांवर कारवाई करावी आणि नुकसान भरपाई द्यावी. या सर्व जखमी व्यक्तींना संरक्षण दिले पाहिजे, ही सर्व कारवाई पोलीस स्टेशन, रस्ते, जेल सर्व क्लोज सर्किट टीव्हीचे सी सी टीव्ही फुटेज पाहून ही तपासणी पारदर्शिक स्वरूपात करावी. अशाप्रकारे परत पोलीस कायदा हातात घेऊन लोकांवर अन्याय करणार नाहीत ह्यासाठी कायम स्वरूपी सुधारणा करून, पोलिसांच्या अरेरावी वर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना करावी, या मागण्या जोपर्यंत सरकार मान्य करीत नाही तोपर्यंत हा लॉंग मार्च सुरूच राहणार आहे. हा मार्च अनेक ठिकाणी धाकदपटशीने अडवण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र अविरतपणे हा मार्च सुरूच आहे. मुंबईमध्ये देखील हा मार्च पोहोचू न देण्यासाठी शासन प्रयत्न करेल मात्र मुंबईकरांनी यावेळी आपली एकजूट दाखवावी. आणि हे आंदोलन यशस्वी करावे. असे आवाहन शेवटी करण्यात आले.
0 टिप्पण्या