मुंबईकर नागरिकांना स्वच्छ आणि ताजे अन्न मिळावे त्यासोबतच भेसळयुक्त, दूषित, आरोग्यास हानी पोहचविणाऱ्या अन्न सेवनापासून परावृत्त करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने पुढाकार घेतला आहे. त्याकरिता महानगरपालिकेचा अनुज्ञापन विभाग आणि भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरण (FSSAI) यांच्या संयुक्त विद्यमाने स्त्यावर खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना अन्न सुरक्षा आणि स्वच्छ्तेचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणाचे पहिले सत्र आज के पूर्व विभाग कार्यालयात पार पडले. अन्न सुरक्षेचे महत्त्व, वैयक्तिक स्वच्छता, खाद्य विक्री आणि साठवणूक ठिकाणांची नियमित स्वच्छता, अन्न शिजवणे किंवा पाककृती करणे, कचरा व्यवस्थापन आणि अन्न सुरक्षा व मानके याचे धडे खाद्य विक्रेत्यांना देण्यात आले.
बृहन्मुंबई महानगरपालिका आणि भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरण यांच्यात अलीकडे सामंजस्य करार झाला आहे. या करार अंतर्गत महानगरपालिका हद्दीतील सुमारे १० हजार परवानाधारक खाद्यविक्रेत्यांना अन्न सुरक्षा नियम, अन्न स्वच्छतेच्या पद्धती, अन्नपदार्थांची सुरक्षित हाताळणी आणि साठवणूक पद्धतीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. उप आयुक्त (विशेष) चंदा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अनुज्ञापन अधिक्षक अनिल काटे यांच्या नेतृत्वाखाली के पूर्व विभाग कार्यालयात आज ८ जानेवारी रोजी प्रशिक्षणाचे पहिले सत्र पार पडले. त्यात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या के पूर्व विभाग कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील ५० हून अधिक खाद्यविक्रेत्यांनी सहभाग नोंदवला. भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाच्या सहायक संचालक ज्योती हरणे, तांत्रिक अधिकारी विद्या एस. बी., शशांक पांडे यांच्यासह महानगरपालिकेच्या के पूर्व अनुज्ञापन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. रस्त्यावरील खाद्य विक्रेत्यांमध्ये अन्न सुरक्षा नियम आणि महत्त्व, वैयक्तिक स्वच्छता, खाद्य पदार्थ विक्री ठिकाणांची स्वच्छता, अन्न तयार करण्याची पद्धत, कचरा व्यवस्थापन यासह अन्नपदार्थांची सुरक्षित हाताळणी याबद्दलचे ज्ञान व कौशल्य यासारख्या बाबींचे खाद्य विक्रेत्यांना प्रशिक्षण देण्यात आले. रस्त्यावरील खाद्य विक्रेत्यांमध्ये 'अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६' चे पालन करण्यासाठी जागरूकता निर्माण व्हावी यासह सार्वजनिक आरोग्यासंदर्भातील जोखीम कमी करण्याविषयीचे धडेदेखील तज्ज्ञांनी दिले.बृहन्मुंबई महानगरपालिका आणि भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने नियमित अंतराने महानगरपालिका प्रभाग कार्यालयांमध्ये वर्षभर प्रशिक्षण सत्रे आयोजित करण्यात येणार आहेत. यामध्ये मुंबईकर नागरिकांना स्वच्छ आणि ताजे अन्न पुरवावे यावर भर देऊन खाद्य पदार्थ विक्रेत्यांना प्रशिक्षण देण्यात येईल. अन्न सुरक्षा व मानके (अन्न व्यवसायांचे परवाना आणि नोंदणी) नियम, २०११ च्या अनुसूची ४ नुसार खाद्य विक्रेत्यांना मुलभुत स्वच्छता पद्धती शिकविण्यात येतील. त्यासोबतच विक्रेत्यांना जनजागृतीपर वाचन साहित्य वितरित करण्यात येईल. प्रशिक्षण सत्रांसाठी पात्र प्रशिक्षक व विषय तज्ज्ञांची नेमणूक करण्यात आली आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमांची परिणामकारकता तपासणी व मूल्यमापन केले जाणार आहे. प्रशिक्षण घेतलेल्या खाद्य पदार्थ विक्रेत्यांना भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरण यांच्या वतीने प्रमाणपत्रंदेखील देण्यात येतील.
0 टिप्पण्या