मुंबई शहराला सध्या तानसा (४५५ दशलक्ष लिटर प्रतिदिन), मोडक सागर (वैतरणा) (४५५ द.ल.लि. प्रतिदिन), हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा (४५५ द.ल.लि. प्रतिदिन), अप्पर वैतरणा (६४० द.ल.लि. प्रतिदिन) आणि भातसा (२०२० द.ल.लि. प्रतिदिन) या जलस्रोतातून पाणीपुरवठा करण्यात येतो. हे जलस्रोत मुंबई शहरापासून सुमारे १०० कि.मी. किंवा त्यापेक्षा अधिक अंतरावर आहेत. बृहन्मुंबई महानगराच्या क्षेत्राच्या दोन लहान स्रोत विहार (१०० द.ल.लि. प्रतिदिन) आणि तुळशी (१८ द.ल.लि. प्रतिदिन) आहेत. मुंबई शहराला या सर्व जलस्त्रोतातून ३९५० द.ल.लि. प्रतिदिन इतका पाणीपुरवठा करण्यात येतो.
पाण्याची वहन पद्धती :* शहराबाह्य मुख्य जलस्रोतांमधील पाणी जलशुद्धीकरण केंद्रांपर्यंत वाहून आणण्याचे काम २२३५ मि.मी. ते ३००० मि.मी. व्यासाच्या जलवाहिन्यांद्वारे व ५५०० मि.मी. व्यासाच्या काँक्रिटच्या भूमीगत जलबोगद्याच्या सहाय्याने गुरुत्वाकर्षणाद्वारे होते. सुमारे ५०% पाणीपुरवठा हा उदंचन व्यवस्था वापरुन जलशुद्धीकरण केंद्रांपर्यंत आणला जातो.
पाणी शुद्धीकरण प्रक्रिया:* जलस्रोतांमधील पाणी शुद्धीकरणाकरिता पांजरापूर (१३६५ द.ल.लि. प्रतिदिन), भांडुप संकुल (२८१० द.ल.लि. प्रतिदिन) आणि विहार (१०० द.ल.लि. प्रतिदिन) आणि तुळशी (१८ द.ल.लि. प्रतिदिन) येथे आणले जाते. या अशुद्ध पाणी वाहुन आणणा-या जलवाहिन्यांना प्राथमिक स्थराची व्यवस्था (Primary System) म्हणतात, जी सुमारे ४०० कि.मी. एवढ्या लांबीची आहे. प्राथमिक स्थर व्यवस्था (Primary System) मध्ये सुमारे ४३ कि.मी. लांबीच्या जलबोगद्यांचा समावेश आहे. जल शुद्धीकरण केंद्रामध्ये पाणी पोहचविल्यानंतर त्यामध्ये प्रथम पॉली एल्युमिनियम क्लोराईड (पीएसी) मिसळले जाते. हे पीएसी मिश्रीत पाणी मोठ-मोठ्या टाक्यांमधुन नेऊन हे पाणी संथ होण्यासाठी अवधी दिला जातो. यामुळे पीएसीची प्रक्रिया पूर्ण होऊन जड झालेला गाळ / धुलीकण या मोठ्या टाक्यांच्या तळाशी बसतात. हा गाळ सतत टाक्यांमधुन बाहेर काढला जात असतो. नंतर हे पाणी पूर्णतः गाळण्यासाठी रेतीचा / वाळूचा थर असलेल्या टाक्यांमधुन (रॅपिड सँड फिल्टर्स) मधून नेण्यात येते. पूर्णतः गाळलेले शुद्ध झालेले पाणी फिल्टर बेडच्या तळातून काढून घेवून निर्जंतुकीकरणासाठी पुढे नेण्यात येते. शुद्ध पाणी ब-याच लांबवर वाहून नेण्याचे असल्याने निर्जंतुकीकरणासाठी क्लोरीनचा वापर केला जातो. निर्जंतुकीकरण केलेले पाणी एका महासंतुलन जलाशयात साठवून पुढील वितरणासाठी शहरात ठिक ठिकाणी असलेल्या सेवा जलाशयापर्यंत पोहोचविले जाते. योग्य शुद्धीकरण सुविधांमुळे WHO व IS १०५००-२०१२ ने प्रमाणित केलेल्या मानकांनुसार जलशुद्धीकरण करणे साध्य झाले आहे. शुद्ध पाण्याचा गढूळपणा पूर्ण वर्षभर ०.३ NTU वा त्यापेक्षा कमी असतो व रेसिड्युअल क्लोरीनचे ग्राहकाच्या ठिकाणचे प्रमाण ०.२ PPM एवढे असते.
शुद्ध पाणी वितरण :* प्रक्रिया केलेले पाणी जलशुद्धीकरण केंद्राजवळील महासंतुलन जलाशयात साठवून पुढील वितरणासाठी शहरात ठिकठिकाणी असलेल्या २७ सेवा जलाशयापर्यंत पुढील वितरणासाठी विभागले जाते. यासाठी १२०० मि.मी. ते २४०० मि.मी. च्या पोलादी जलवाहिन्या व २२०० मि.मी. ते ३५०० मि.मी. व्यासाच्या भूमीगत जलबोगद्यांचा वापर केला जातो. या जलवाहिन्यांची लांबी सुमारे ४५० कि.मी. असून सुमारे २७ कि.मी. लांबीच्या जलबोगद्यांचा समावेश आहे. या जलवितरण जाळ्यास द्वितीय स्तर (Secondary System) वहन व्यवस्था म्हणतात.
ग्राहकांना पाणी पुरवठा:* सेवा जलाशयातून Feeder वाहिनी व Distribution वाहिनीच्या द्वारे पाणी विविध परिसरातील ग्राहकांपर्यंत सुमारे ३,८८,९२१ जलजोडण्यांद्वारे पोहचविले जाते. या संपूर्ण प्रणालीला तृतीय स्तर (Tertiary System) प्रणाली म्हणतात. यामध्ये २,४०० मि.मी. ते १५० मि.मी. व्यासाच्या जलवाहिन्यांचा समावेश आहे. तृतीय प्रणालीच्या जाळ्यांची अंदाजीत लांबी सुमारे ५,००० कि.मी. आहे. व त्यामध्ये सुमारे २५ कि.मी. लांबीच्या जलबोगद्यांचा समावेश आहे. मुंबईतील दररोजचा पाणी पुरवठा सुरळीत राहणेसाठी सुमारे १,००० झडपांची उघड्झाप केली जाते.
देखभाल आणि विकास उपक्रम :* बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात पाणीपुरवठा सुरळीत व्हावा याकरिता महानगरपालिकेतर्फे दरवर्षी अनेक कामे आणि उपाययोजना केल्या जातात. नव्याने विकसित होणाऱ्या भागांमध्ये नवीन जलवाहिन्या टाकणे, जुन्या व जीर्ण झालेल्या जलवाहिन्या टप्प्या-टप्प्याने बदलून त्याठिकाणी नवीन जलवाहिनी टाकणे, अनेक सेवा जलजोडण्यांच्या एेवजी एक सामाईक जलवाहिनी टाकणे, गळतीची ठिकाणे शोधून त्याठिकाणी तात्काळ दुरुस्ती करणे यासारख्या कामांचा समावेश आहे.
कर्मचारी वर्ग :* मुबंई शहरातील पाणीपुरवठा सुरळीतपणे सुरू राहण्यासाठी दररोज सुमारे ७१२ अभियंते व ६५२ प्रशासकीय कर्मचारी व ५१४९ इतर कर्मचारी वर्ग अविरत कार्यरत असतो.
आपल्याला हे माहित आहे का?*
- - मुंबईची पाणीपुरवठा प्रणाली ही आशिया आणि जगातील सर्वात मोठ्या व्यवस्थांपैकी एक आहे.
- - तानसा धरण जगातील सर्वात लांबीच्या धरणांपैकी एक असून धरणाची लांबी २,७४३.२० मीटर आहे.
- - भांडुप जलशुद्धीकरण केंद्र आशियातील सर्वात मोठे जलशुद्धीकरण केंद्र असून, त्याची एकूण क्षमता २,८१० दशलक्ष लिटर प्रतिदिन (MLD) आहे. त्यापैकी जुन्या संचाची क्षमता १,९१० द.ल.लि. प्रतिदिन (MLD) आणि नव्या संचाची क्षमता ९०० द.ल.लि. प्रतिदिन (MLD) इतकी आहे.
- - वर्षाजल संधारण (Rainwater Harvesting): ५०० चौ. मीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेल्या भूखंडांसाठी अनिवार्य आहे.
- - *ड्युअल फ्लशिंग वॉल्व्ह किंवा टाकी*: ऑगस्ट २००५ पासून, ३/६ लिटर फ्लशचा वापर करणे अनिवार्य आहे.
- *पाण्याचे पुनर्वापर*: भांडुप आणि पांजरापूर येथे दररोज ४० दशलक्ष लिटर बॅकवॉश पाण्याचे पुनर्वापर करण्यात येत आहे.
*मुंबईच्या पाणीपुरवठा स्रोतांचा वेगवेगळ्या धरणांनुसार आढावा:*
- *विहार तलाव*
- स्थापना वर्ष: १८६०
- दैनंदिन पुरवठा: १०० द.ल.लि. प्रतिदिन
- योगदान: २.४१ %
- ठिकाण: मुंबई शहरांतर्गत
- साठवण क्षमता: २७,६९८ द.ल.लि. प्रतिदिन
- *तुळशी तलाव*
- स्थापन वर्ष: १८७२
- दैनंदिन पुरवठा: १८ द.ल.लि. प्रतिदिन
- योगदान: ०.४३%
- ठिकाण: मुंबई शहरांतर्गत
- साठवण क्षमता:८,०४६ द.ल.लि. प्रतिदिन
- *तानसा धरण*
- स्थापना वर्ष: १८९२ आणि १९४८
- दैनंदिन पुरवठा: ४५५ द.ल.लि. प्रतिदिन
- योगदान: ११.०० %
- ठिकाण : मुंबईपासून १०६किमी
- *मोडकसागर धरण*
- स्थापना वर्ष: १९५४
- दैनंदिन पुरवठा: ४५५ द.ल.लि. प्रतिदिन
- योगदान: ११.००%
- ठिकाण : मुंबईपासून ११९किमी
- *अप्पर वैतरणा धरण*
- स्थापना वर्ष: १९७२
- दैनंदिन पुरवठा: ६३५द.ल.लि. प्रतिदिन
- योगदान: १५.३४ %
- ठिकाण : मुंबईपासून १६३ किमी
- *भातसा धरण*
- स्थापना वर्ष: १९८०-२००७
- दैनंदिन पुरवठा: २०२० द.ल.लि. प्रतिदिन
- योगदान: ४८.८१ %
- ठिकाण : मुंबईपासून १०२ किमी
- *हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा धरण*
- स्थापन वर्ष: २०१४
- दैनंदिन पुरवठा: ४५५ द.ल.लि. प्रतिदिन
- योगदान: ११.००%
- ठिकाण : मुंबईपासून १५०किमी
0 टिप्पण्या