महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा उत्सव सुरु झाला आहे. मात्र या उत्सवादरम्यान नेहमीप्रमाणे आयाराम गयाराम प्रक्रिया सुरू झाल्याचे दिसून येत आहे. पक्ष फोडाफोडी करण्याची पारंपारिकता याहीवेळेस सर्वच पक्षांकडून होत आहे. याची सुरूवात महायुतीतून झाली आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे (रासप) अध्यक्ष महादेव जानकर महायुतीतून बाहेर पडणार आहेत. महायुतीतून बाहेर पडण्याची घोषणा महादेव जानकर यांनी केली आहे. विधानसभेत रासपला 40 जागा महायुतीनं द्याव्यात, अन्यथा 288 जागांवर स्वबळावर लढण्याची तयारी करत आहोत, असा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकरांनी महायुतीला दिला होता. तसंच जानकरांनी कार्यकर्त्यांना स्वबळावर लढण्यासाठी सज्ज राहण्याचं आवाहन केले होते. मात्र जागावाटपात घटक पक्षांना कोणतेही स्थान देण्यात आलेले नाही. यामुळे महादेव जानकर नाराज झाले.
दरम्यान काँग्रेसला देखील मोठा झटका बसला आहे. मुंबईतील ज्येष्ठ नेते रवी राजा यांनी काँग्रेसचा 'हात' सोडला. ते भारतीय जनता पक्षाचा झेंडा हाती घेत आहेत. रवी राजा यांनी मुंबई महापालिकेत विरोधीपक्ष नेते पद भूषवले आहे. ते काँग्रेसचा मुंबईतील चेहरा मानले जातात. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द केला. काँग्रेसमध्ये मेरिटनुसार तिकीट मिळत नसल्याचा आरोप करत रवी राजा यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. सायन विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास ते इच्छुक होते. मात्र तिकीट न मिळाल्याने ते नाराज होते. आज सकाळीच ते भाजप प्रदेश कार्यालयात दाखल झाले. काही दिवसांपूर्वीच त्यांनी भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची यासंदर्भात भेट घेतली होती.
रवी राजा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याचा प्रकार ताजा असताना त्याच दिवशी कोल्हापुरातील विद्यमान आमदार जयश्री जाधव यांनी काँग्रेसला रामराम ठोकला. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला आहे. कोल्हापुरात काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांना हा धक्का मानला जात आहे. कारण जयश्री जाधव या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून पक्षाच्या मावळत्या आमदार आहेत. येत्या निवडणुकीत तिकीट नाकारल्यामुळे त्या नाराज होत्या. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत संपल्यानंतर त्यांनी पक्षाला रामराम ठोकत धनुष्यबाण घेतल्याने त्यांच्या बंडखोरीचा फटका काँग्रेसला बसणार नसला, तरी त्यांच्या समर्थकांची मोठी ताकद शिंदेसेनेकडे वळणार आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील नगर शहर विधानसभेच्या जागेवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने दावा केला होता. अनेक वर्षांपासून शहरात शिवसेनेचा उमेदवार असल्याने ही जागा सेनेला मिळावी, अशी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. मात्र, महाविकास आघाडीच्या जागावाटपात नगरची ही जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला गेल्याने राष्ट्रवादीचे पदाधिकारी संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं. येथील महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख आशा निंबाळकर तसेच शहर प्रमुख अरुणा गोयल यांच्यासह शिवसेना महिला पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्यांनी शिवसेनेला रामराम करत थेट राष्ट्रवादी अजित पवार पक्षात प्रवेश केला आहे. शिवसेना पक्ष कोणत्याही निर्णयात महिला पदाधिकाऱ्यांना विचारात घेत नसल्याने या महिला पदाधिकाऱ्यांनी महायुतीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे, येथील लढतीत आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद वाढली असून सध्या येथील जागेवर विद्यमान आमदार हेही संग्राम जगतापच आहेत.
विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली असून छाननी प्रक्रिया देखील पूर्ण झाली आहे. आयोगाच्या तारखेनुसार 30 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज छाननी होऊन बाद उमेदवारांची नावे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली. ज्यामध्ये अकोला (Akola) जिल्ह्यात मनसेच्या उमेदवार प्रशंसा अंबेरे यांचा अर्ज बाद झाला. अर्जाच्या छाननीत काल वय 25 दिवसांनी कमी असल्यामुळे त्यांचा अर्ज फेटाळला गेला होता. मात्र संतापलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज फेटाळलेल्या प्रशंसा अंबेरे यांचं कार्यालय फोडलं. अकोल्यातील डाबकी रोड भागातल्या आठवडी बाजार चौकात अंबेरे यांचं कार्यालय आहे. अंबेरे यांनी विरोधी उमेदवारांशी हातमिळवणी करून जाणीवपूर्वक आपलं वय कमी असल्याची बाब लपवल्याचा आरोप आता मनसेच्या कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. मनसेचे शहर उपाध्यक्ष अविनाश मुरेकर आणि इतर कार्यकर्त्यांनी कार्यालयात घुसून ही तोडफोड केल्याची माहिती आहे. उमेदवारी अर्ज फेटाळण्याच्या प्रकारात मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोपही मनसेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. या घटनेनंतर घटनास्थळावर पोलीस दाखल झाले असून अधिक तपास करत आहेत. मात्र, येथील मतदारसंघात मनसेचा उमेदवार अपात्र ठरल्याने मनसैनिक व मनसे पक्षासाठी हा मोठा झटका आहे.
0 टिप्पण्या