संविधानाचे मंदिरं उभारणार आहेत. संविधानाची मस्जिद, संविधानाची गुरुद्वारा, पुढे संविधानाचे विहारही बांधणार आहेत की काय? हा सगळा खटाटोप कशासाठी? कोण अज्ञानी लोक आहेत ही अशी संविधान-मंदिरांची मागणी करणारे ? आता हळूहळू देशभर संविधान-सत्संग, संविधान-कथावाचन, संविधान-पारायणे, संविधान-कीर्तनेही भरवायचा उपक्रम हाती घेतल्या जाईल की काय?...यामागे यांचा हेतू तो काय? हे शोधलं पाहिजे. ते समजून घेतलं पाहिजे. 'संविधान अंमल' टाळणाऱ्यांच्या टाळक्यात नेमकं आहे तरी काय? इतिहास काळात जनतेला चिरकाल गुलामीत ढकलण्यासाठी वापरण्यात आलेले 'बामणी डाव' आजही कसे कार्यान्वित केल्या जातात याचेच हे सदर उदाहरण होय. एखाद्या उदात्त तत्वाचा अतिरेक करून मूळ तत्वालाच कायमस्वरूपी नेस्तनाबूत करण्याचा 'ब्राह्मणी डाव' आपण ओळखला पाहिजे मित्रांनो. हा त्यांचा डाव तेव्हाही होता, आजही आहे, उद्याही ते वापरतीलचं!
यावेळी ज्या तत्वावर त्यांना हल्ला चढवायचा आहे ते तत्व 'संविधान'रूपाने विद्यमान आहे. बामणी डावपेचांची आखणी, तिची कार्यपद्धती समजून घेण्यासाठी प्राचीन भारतातील एक घटना येथे आपल्यापुढे विशद करतो आहे. बौद्ध धर्माच्या दृष्टीने अन्नग्रहणास्तव (प्राणीहत्या) गोमांस भक्षण त्याज्य नव्हते. शरीरासाठी आवश्यक तो मांसाहार-खानपान आपल्या खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग होता. बुद्धाने शरीर व मन या दोहोंच्याही सुदृढतेवर कायमचं भर दिला आहे. आणि अत्यंत महत्वाची बाब म्हणजे धम्माचा संबंध हा अन्नग्रहणाशी, खाद्यसंस्कृतीशी नसून 'माणसा-माणसातील व्यवहार' कसा असावा, कसा नसावा याबाबत आहे. धम्माला घेणेदेणे आहे ते अग्रक्रमाने मनुष्यमात्राच्या आपापसातील व्यवहाराशी ! दुःख व दुःखमुक्तीची पाळेमुळे आहेत ती येथे !! मात्र प्राचीन भारतात बामणांनी बुद्धाच्या पंचशीलेतील 'मी हत्या करणार नाही' या 'अहिंसा तत्वाचा' भयंकर अतिरेक केला. हे करण्यासाठी त्यांनी दोन डाव मांडले आणि त्यावर अंमल केला. खरे तर यज्ञयाग, पशुबळी हा बामणांचा सनातनी वैदिक संस्कृतीमार्ग. आणि त्यातून भक्षणास मिळणारे गोमांस, सुरापान, मदिरापान यांचा स्वतःसाठी करण्यात येणारा सर्रास वापर हे त्यांच्या वैदिक-ब्राह्मणी संस्कृतीतील अत्यंत प्रचलित स्वरूप. मात्र असे असतांनाही त्यांनी एकाएकी गोहत्या, गोमांस भक्षण त्यागले. बौद्ध धर्म संस्कृतीला नेस्तनाबूत करण्यासाठी येथे त्यांनी त्यांचा पहिला डाव टाकला तो स्वतः गोमांस भक्षण बंद करून !
बौद्धांना तर त्यांच्या धम्मशिकवणीतील 'अहिंसा तत्व' पुरेपूर ठाऊक होते म्हणून बौद्धांनी गरजेनुरूप गोमांस भक्षण सुरू ठेवले होते. बौद्धांच्या खाद्यसंस्कृतीत तो मध्यम मार्ग होता. कोणत्याही तत्वाचा तेथे अतिरेक नाही हेही ब्राह्मणांना ठाऊक होते आणि म्हणूनच त्यांनी मग दुसरा डाव रचला. तो असा की, अन्न म्हणून ग्रहण करण्यात येणाऱ्या गोमांस भक्षण (मांसाहार) करणाऱ्यांना ब्राह्मणांनी सरळसरळ पापीच ठरविले. त्यांना अधर्मी लोक ठरविले. गोमांस भक्षण करणाऱ्या लोकांना 'हे लोक बुद्धाचे अनुयायी नव्हेत कारण ते बुद्धाचे अहिंसा तत्व पाळत नाहीत' म्हणून जोमाने प्रचार-प्रसार सुरू केला. त्यांना सामाजिकदृष्ट्या तुच्छ ठरविण्यात आले. हा त्यांचा दुसरा डाव भयंकर अतिरेकी स्वरूपाचा होता. बुद्धाच्या एका चांगल्या उदात्त तत्वास (अहिंसेस) अतिरेकी स्वरूप देऊन, त्या अतिरेकास स्वतः अंगिकारून तसे जनमानसात बिंबविले. स्वतःला त्या तत्वाची अतिपवित्रता फासली. त्यास अत्याधिक पावित्र्य बहाल केले आणि अशाप्रकारे बौद्धांच्या मूळ 'अहिंसा तत्वाचा' अतिरेक करून, Need to kill and Will to kill या मूळ शिकवणीस डावलून, सामाजिक-सांस्कृतिकदृष्ट्या बौद्धांचे समाजात अधःपतन घडवून आणले. मूळ उदात्त तत्वाला आत्यंतिक पावित्र्यता प्रदान करून त्यास नेस्तनाबूत करण्याचे हे ब्राह्मणी षड्यंत्र फार जुने आहे. हे येथे आपण लक्षात घेतले पाहिजे.
यातून सांगायचे ते एवढेच आहे की, संविधानाच्या बाबतीतही ते याचप्रकारे कार्यप्रवण होतांना दिसताहेत. याची सुरुवात त्यांनी 'संविधान अंमल दिन' (गणराज्य दिन/26 जानेवारी) बाजूला सारून 'संविधान स्वीकृत दिनाला' (संविधान दिन/26 नोव्हेंबर) पुढे आणले. 'स्वीकृत दिनाचे' महिमामंडन सुरू केले. संविधान प्रास्ताविकेचे जागोजागी वाचनही सुरू केले. हे सर्व कशासाठी? तर हा दिवस भारताच्या परिप्रेक्षात विचार करता 'एका विशिष्ट लोकसमूहाचाच' दिन ठरावा म्हणून तर नव्हे ना? आजचे संविधान दिनाचे चित्र काय दर्शविते? जणूकाही संविधान हा कोण्या एका लोकसमूहाचाच विषय आहे अशी भारतीय समाजमनात रुजवणुक व्हावी असा तर त्यांचा ब्राह्मणी डाव नाहीये ना? त्यांना हवे ते समाजचित्र रंगविण्यात ते यशस्वी होतांना दिसतात हे आजवर लपून राहिलेले नाही.
खरे तर 25 नोव्हेंबर 1949 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेपुढे जे शेवटचे भाषण केले ते या देशातील तमाम जनतेस उद्देशून आहे. देशाच्या भावी उन्नतीचा त्यात मार्ग आहे. ते भाषण चिरकाल या देशासाठी मार्गदर्शक आहे. भारताचे भवितव्य ठरविणारे आहे. मात्र 25 नोव्हेंबर या दिनास सरकार दरबारी काहीएक महत्व न देता त्यांनी निवडला तो 'संविधान स्वीकृत दिन' 26 नोव्हेंबर ! कारण 25 नोव्हेंबर जर निवडला तर देशाची वाटचाल कुठे चालली आहे याचे मोजमाप, याचे मूल्यमापन भारतीय लोक त्या बाबासाहेबांच्या दिशादर्शक भाषणाच्या माध्यमातून करतील याची त्यांना धास्ती आहे. त्यांना हे नको आहे. त्यांना हवेत ते फक्त इव्हेंट ! विचार नकोत, त्यांची अंमलबजावणी नको !! 25 नोव्हेंबर हा 'विचार दिन' ठरतो आणि 26 नोव्हेंबर हा 'इव्हेंट दिन' !!! मग ते निवड कोणत्या दिनाची करणार? हे वेगळे सांगणे नको. बरे हा 26 नोव्हेंबर दिन बाबासाहेबांच्या हयातीतही सात वेळा आला. बाबासाहेबांनी त्या 'संविधान स्वीकृती दिनास' उचलून धरल्याचे, साजरा केल्याचे वा त्यास साजरा करण्याविषयी भाष्य केल्याचे कुठे आढळत नाही. असे का? हे दुर्लक्षून कसे चालणार? महत्वाचे काय ते आपणांस कळायला हवे. विचार की इव्हेंट? स्वीकृती की अंमलबजावणी? निवड स्पष्ट हवी. शेवटी विषय देशबांधवांच्या उन्नयनाचा आहे. लोककल्याणाचा आहे.
आजमितीस ब्राह्मणी डावपेचांची परिणती अशी झाली आहे की, त्यांच्या एकूणच खेळीत, या देशासाठी, भारतीय लोकांसाठी अत्यंत महत्वाचा असलेला 'संविधान अंमल दिन/गणराज्य दिन' (Republic Day) यांस मात्र अधिकाधिक उत्सवप्रियतेकडेच नेले जातांना दिसते आहे. त्यास सणासुदीचा-उत्सवाचा भरपूर रंग चढविला जातो आहे. खऱ्या अर्थाने संविधानिक भारताचा सुरू होणारा हा प्रवासदिन आहे. बाबासाहेबांचे खरेखुरे महत्व तर या दिनी ना, त्यांच्या परिश्रमाचे चीज होण्याची खरीखुरी सुरुवात तर या 'अंमल दिनापासूनची' ना ! मात्र नेमके हे डावलल्या जाते आहे. 'स्वीकृतीला' अनन्यसाधारण महत्व दिल्या जाते आहे आणि 'अंमलबजावणीला' मात्र हेतुपुरस्सर गाडल्या जाते आहे. स्वीकृती झाली म्हणजे अंमलबजावणी होतेच असे नाहीये..या दोन स्वतंत्र बाबी आहेत. आपले लक्ष असले पाहिजे ते अंमलबजावणीकडे ! आणि येथेच त्यांनी आम्हाला गुंगविले आहे. अंमलबजावणीच्या ध्येयापासून लक्ष विचलित करण्यात ते यशस्वी होताहेत. हाताशी आमचीच माणसं धरायची आणि आपले छुपे डाव साध्य करायचे यात ते पटाईत आहेत. आता त्यांनी पुढचा डाव रचला आहे. संविधान मंदिरे बांधण्याचा घाट घालून !
राज्यातील 434 आयटीआय कॉलेजात ही संविधान मंदिरे उभारणार आहेत म्हणे. देशाचे उपराष्ट्रपती या मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहताहेत. 'आमची म्हणविली जाणारी त्यांची हक्काची माणसं' येथे पुन्हा त्यांच्या दिमतीला हजर राहताहेत. 'स्वीकृत दिनाच्या' खेळीवरून 'आपली म्हटली जाणारी माणसं' यांच्या कशी हाती लागतात ते 'आठवले' की हा ब्राह्मणी डाव मग आपसूकच आपल्यासमोर उलगडत जातो. मित्रांनो, त्यांच्या या ब्राह्मणी डावपेचांना एक सुज्ञ भारतीय म्हणून आपण वेळीच हाणून पाडले पाहिजे. आणि 'संविधानाच्या अंमलबजावणी'चे काय? हा आपल्या जीवनमरणाचा प्रश्न कायमस्वरूपीच रेटून धरला पाहिजे. सरकारच्या या संविधान-मंदिर प्रकल्पाचा आपण जाहीरपणे निषेध नोंदवून 'संविधानाच्या अंमलबजावणी'चे काय?' हा प्रश्न सरकारास रोखठोकपणे पुन्हा-पुन्हा विचारू या !
- प्रशिक आनंद, नागपूर
- 15 सप्टेंबर 2024
0 टिप्पण्या