ठाण्यातील शासकीय भूखंड लोकप्रतिनिधीच गिंळंकृत करत आहेत यात आता काही नवीन राहिलेले नाही. मात्र या गिळंकृत करण्यात येणाऱ्या भूखंडावर अल्पशे बांधकाम करून शासनाचा कोट्यावधीचा निधी देखील हडप करण्याचे षडयंत्र ठाण्यातील मानपाडा प्रभाग समिती हद्दीत उघड झाले आहे. मानपाडा येथील जुन्या पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या केवळ २५ बाय १०च्या भूखंडावर जेष्ठ नागरिक कट्टा बांधण्यात येत आहे. या बांधकामाकरिता थेट मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून बजेट उपलब्ध करण्यात आला आहे. हा कट्टा बांधण्याकरिता सुमारे चार कोटीचा निधी लागत असल्याचे मनसे नेते निलेश चव्हाण यांनी उघड केल्याने याबाबत उलट सुलट चर्चा आता मानपाडा परिसरात रंगली आहे. या आधीच या परिसरात महिला मंडळाकरिता भवन बांधण्यात आले आहे. या भवनाची सध्या काय अवस्था आहे हे मात्र येथील महिलाच सांगू शकतील. तरीही पुन्हा या परिसरात जेष्ठ नागरिक कट्टा बांधण्यात येत आहे. मागील तीन वर्षापासून महापालिकेचा कारभार प्रशासकीय ताब्यात आहे. मग जेष्ठ नागरिक कट्टा कोणी मंजूर केला. इतकेच नव्हे तर त्याला थेट मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून निधी मंजूर कसा काय करण्यात आला असे अनेक प्रश्न येथील नागरिक विचारत आहेत.
या कट्ट्याचे बांधकाम होत असताना मनसे नेते निलेश चव्हाण यांनी याबाबत विचारणा केली असता त्यांना धमकविण्यात आले.आणि प्रसंग हमरीतुमरीवर आला असल्याची माहिती मिळत आहे. याबाबत खुद्द चव्हाण यांनी फेसबूकच्या माध्यमातून सांगितले आहे. हा शासकीय भूखंड, त्यावर कट्टा बांधण्यास कधी परवानगी देण्यात आली. त्याची वर्क ऑर्डर बाबत संबधित बांधकाम करणाऱ्यांशी विचारणा करण्यास गेल्यावर चव्हाण यांच्यावर दंडेलशाहीचा वापर करुन त्यांना त्या जागेवरून हुसकावून लावण्यात आले. यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. ठाण्याचे मनसे अध्यक्ष अविनाश जाधव यांनी वेळीच हस्तक्षेप करून प्रकरण शांत केले. ठामपाच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील संबंधित अधिकारी कदम यांची भेट घेऊन संबंधित बांधकामाची सविस्तर माहिती घेतली. ही माहिती आपण लवकरच प्रसिद्ध करू असे चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.
मानपाडा आझादनगर, मनोरमा नगर परिसरात सातत्याने वीजपुरवठा खंडीत होत असतो. मागील अनेक वर्षापासून वीजेच्या या लपंडावाला येथील नागरिक वैतागले आहेत. अनेकांनी याबाबत मला काही तरी करण्याची विनंती केली. तेव्हा मी वीज मंडळ अधिकाऱ्याला भेटलो असता त्यांनी सांगितले की या परिसरात मागील अनेक वर्षापासून एकच ट्रान्सफॉर्मर आहे. मात्र येथील लोकवस्ती दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे त्यावर लोढ येतो आणि वीज पुरवठा खंडीत होतो. यासाठी या परिसरात अजून एक ट्रान्सफॉर्मर बसवणे अतिशय गरजेचे आहे. मात्र त्याकरिता या परिसरात जागा मिळत नसल्याचे वीज महामंडळाच्या अधिकाऱ्यांने स्पष्ट केले. मानपाडा परिसरातील या जुन्या टाकीजवळचा हा भूखंड शासकीय आहे. आणि हा भूखंड वीज मंडळाला देऊन त्यावर ट्रान्सफॉर्मर बसवल्यास येथील नागरिकांचा वीज पुरवठ्याचा प्रश्न कायमचा निकाली निघेल. शिवाय याचा खर्चही केवळ दोन ते अडीच कोटी पर्यंत येईल. जेष्ठ नागरिकांच्या विरंगुळा कट्ट्याकरिता सुमारे चार कोटीचा बजेट ठेवणाऱ्या प्रशासनाने याचा विचार गांभीर्याने करण्याची गरज आहे. - निलेश चव्हाण
0 टिप्पण्या