अमरावतीत खासदार जनसंपर्क कार्यालयाचा वाद वाढत आहे. यामागचा बोलविता धनी कोणी दुसराच असल्याची चर्चा आता अमरावतीत रंगली आहे. राणा यांना पराभूत करून वानखेडे यांनी मिळवलेला विजय हा इथल्या गावगुंडांच्या डोळ्यात सलत असून त्यामुळेच हा वाद जाणिवपूर्वक निर्माण करण्यात आला असल्याचे चर्चा आता अमरावतीत होऊ लागली आहे. पराभूत झाल्यानंतर 19 तारखेला नवनीत राणा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या कार्यालयाचा ताबा जिल्हाधिकारी कार्यालयाला सोपविला, त्याच दिवशी भाजपचे राज्य सभेचे खासदार अनिल बोंडे यांनी कार्यालय देण्याची मागणी केली होती. आमदार रवी राणा आणि खासदार अनिल बोंडे जातीवाद करत असल्याचा काँग्रेसकडून आरोप करण्यात येत आहे.
दोन दिवसांपूर्वीच यशोमती ठाकूर आणि बळवंत वानखडे यांनी तालातोडो आंदोलन केले. कुलूप तोडून कार्यालय ताब्यात घेतले होते. काँग्रेसने ताब्यात घेतलेले खासदार कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पुन्हा सील करण्यात असून परिसरात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. याविरोधात महिला काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आंदोलन केलं आहे. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील खासदारांच्या कार्यालयाचं कुलूप तोडून ते ताब्यात घेतल्याबद्दल आंदोलकावर भारतीय दंड संहिता 1860 नुसार कलम 143, 149, 427, 135 गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये खासदार बळवंत वानखडे, आमदार यशोमती ठाकूर, बबलू शेखावत, विलास इंगोले, प्रवीण मनोहर, हरीश मोरे, वैभव वानखडे, योगेश वानखडे, यांच्यासह आणखी 10 काँग्रेस कार्यकर्ते यांचा समावेश आहे
अमरावती खासदार कार्यालय नेमकं कुणाचं? हा प्रश्न आता चांगलाच तापल्याचं दिसत आहे. यावेळी यशोमती ठाकूर चांगल्याच आक्रमक झाल्या होत्या. आता पुन्हा सील केल्याने पुन्हा वाद होण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने हे खासदार कार्यालय अजून कोणालाही दिले नाही. त्यामुळे काँग्रेसने कुलूप तोडून ताबा घेतला होता. अमरावती मतदार संघ खेचून आणल्यानंतर काँग्रेसचे आक्रमक रुप सर्वांनीच पाहिले.
नवनीत राणा यांनी जिल्हाधिकाऱ्यांना खासदार जनसंपर्क कार्यालय परत करत असल्याचे पत्र दिले. काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखेडे यांना हे कार्यालय देण्याचे त्यांनी पत्रात नमूद केले होते. त्यांनी वानखेडे यांना विजयी झाल्याबद्दल शुभेच्छा पण दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील खासदार जनसंपर्क कार्यालय हे जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर आणि सर्व सामान्य जनतेसाठी आहे. त्यामुळे ते नवनिर्वाचित खासदाराला देण्याचे म्हणणे त्यांनी मांडले.
0 टिप्पण्या