Top Post Ad

प्रॉब्लेम ऑफ रुपी’वर शतकोत्तर जागतिक परिषद, लंडन येथे संपन्न

 


ऑक्सफर्ड विद्यापीठातील प्रा.डॉ.जरेमी झ्विगेलर ,लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स चे डॉ.फ्रान्सिस्को ट्रिकांडो मुनोरा , मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश  पृथ्वीराज चव्हाण व संजय देशमुख, आय.डी.बी.आय बँकेचे माजी चेअरमन किशोर खरात , दिल्ली विद्यापीठाचे प्रा.डॉ.संजोय रॉय, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे माजी जनरल मॅनेजर दीपक कांबळे, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश प्रसन्न वराळे यांचे विशेष मार्गदर्शन 

भारतीय अर्थव्यवस्थेवर भाष्य करणारा ग्रंथ ऑक्सफर्ड विद्यापीठात प्रकाशित करण्याचा ठराव 

 लंडन 

: सायास सहकारी संस्था, पुणे आणि मराठी अर्थशास्त्र परिषद, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रॉब्लेम ऑफ रुपी  या ग्रंथाच्या शतकपूर्ती निमित्त जागतिक परिषद नुकतीच  लंडन येथे दि ११ जुन २०२४ रोजी  झाली. बार्टीचे माजी संचालक रविंद्र चव्हाण यांनी समन्वयक जबाबदारी घेऊन या परिषदेचे यशस्वी आयोजन केले. ऑक्सफर्ड विद्यापीठातील प्रा.डॉ.जरेमी झ्विगेलर ,लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स चे डॉ.फ्रान्सिस्को ट्रिकांडो मुनोरा , मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश  पृथ्वीराज चव्हाण व संजय देशमुख, आय.डी.बी.आय बँकेचे माजी चेअरमन किशोर खरात , दिल्ली विद्यापीठाचे प्रा.डॉ.संजोय रॉय, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे माजी जनरल मॅनेजर दीपक कांबळे, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश प्रसन्न वराळे इत्यादी मान्यवरांच्या मार्गदर्शनामधून भारताच्या आर्थिक स्थितीवर भाष्य करणारा लेखाजोखा परिषदेत मांडण्यात आला.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी १९२३ मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये ‘ दि प्रॉब्लेम ऑफ रुपी : इट्स ओरिजिन अंड इटस सोल्युशन’ या विषयावरील प्रबंध डी.एस्सी पदवीसाठी सादर केला होता. त्यामध्ये त्यांनी ब्रिटीश पौंडच्या तुलनेने ब्रिटीश सरकार हे रुपयाचे अवमूल्यन करीत आहे हे सांगितले होते. तसेच  इतर १७ प्रश्नांचा आढावा घेऊन त्यावर उपाय योजना सुचविल्या होत्या. रिझर्व्ह बँकेची निर्मिती ,धरण बांधणी ,शेती विकास ,मजुरांचे वेतन निश्चिती या सारख्या प्रश्नांची सोडवणूक या ग्रंथातील मतांच्या आधारे पुढे झाली. डॉ बाबासाहेब आंबेडकर हे मूलतः एक अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांनी सांगितलेले उपाय केवळ ब्रिटीश भारतालाच नव्हे तर स्वतंत्र झालेल्या लोकशाही भारताला मार्गदर्शक आहेत.या ग्रंथाला २०२३ मध्ये १०० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त भारतीय अर्थव्यवस्थेचा लेखाजोखा मांडणे,सद्यस्थितीतील आर्थिक समस्यांची मुळे समजून घेऊन शाश्वत आर्थिक विकासासाठी उपाय सुचवणे हे उद्देश या शतकोत्तर जागतिक परिषदेत सफलतेने हाताळण्यात आले.

 


 या परिषदेसाठी ६ ते १२ जून २०२४ या कालावधित भारतातून ३१ प्रतिनिधी आणि इतर ठिकाणावरून १४ प्रतिनिधी लंडनमध्ये दाखल झाले होते. प्रारंभीच दि ७ जून २०२४ रोजी लंडन येथील किंग्ज हेन्री रोड वरील डॉ. बाबासाहेब रहात होते त्या घराला सर्वांनी भेट देऊन तेथे कृतज्ञता व्यक्त करून आपल्या येण्याचे सार्थक करून घेतले.  दिनांक ८ जुन २०२४ रोजी लंडन पासून १२० कि.मी. दूर ऑक्सफर्ड विद्यापीठातील विविध प्रकारच्या  ५४ कॉलेजेसची सखोल माहिती करून घेण्यात आली. दिनांक ११ जुन २०२४ रोजी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स जवळील ग्रेज इन  हॉल मध्ये झालेल्या या जागतिक परिषदेचे  उद्घाटन मुंबई हायकोर्टाचे न्यायाधीश पृथ्वीराज चव्हाण यांनी ऑनलाईन केले. या सत्रात डॉ.संजोय रॉय, रविंद्र चव्हाण, किशोर खरात यांनी भारतीय अर्थ व्यवस्थेवर भाष्य केले.सत्राचे समन्वयक म्हणून अँड. विजयालक्ष्मी खोपडे यांनी काम पाहिले. दुसऱ्या सत्राचे उद्घाटन न्यायाधीश संजय देशमुख यांचे मार्गदर्शनाने झाले. या सत्रात श्री दीपक कांबळे ,ऑक्सफर्ड विद्यापीठाचे प्रा.डॉ.जेरेमी झ्विगेलर आणि डॉ संजोय रॉय यांनी ‘भारतीय अर्थव्यवस्था आणि बदलते जागतिक स्वरूप’ याविषयी भाष्य करून उपाय यावर विश्लेषण केले. या टेक्निकल सत्राचे समन्वयक म्हणून प्रा.डॉ.केशव पवार यांनी काम पहिले. तिसऱ्या सत्रात भारतातील सहभागी प्रतिनिधीं व संशोधकांनी आपले शोधनिबंध सादर केले. त्यामधे प्रामुख्याने प्रा.डॉ.सुभाष वाघमारे ,प्राचार्य डॉ.वृषाली रणधीर ,प्रा.डॉ. मेघना भोसले ,प्रा.डॉ.विश्वनाथ सोनावणे ,प्रा.तानाजी देवकुळे, प्रा. सुहास चव्हाण, डॉ.गजानन पट्टेबहादूर , श्रीमती वंदना गेवराईकर, डॉ.संदीप तान्भारे , श्रीमती सुरेखा खरे या मान्यवरांचा समावेश होता.

कॉन्फरन्सकरिता जागतिक पातळीवरील विद्यापीठे आणि अर्थशास्त्रातील तज्ज्ञांकडून दहा थीमवर मागविण्यात आलेल्या लेखासोबत सदर  शोधनिबंध संकलित करून  भारतीय अर्थव्यवस्थेच्या शाश्वत विकासाच्या दृष्टीने मार्गदर्शक स्वरूपाचा ग्रंथ तयार करण्याचे काम चालू असल्याची माहिती यावेळी  देण्यात आली.भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश श्री. प्रसन्ना वराळे यांनी समारोपाच्या सत्रात ऑनलाईन पद्धतीने सर्वांना मार्गदर्शन केले. कॉन्फरन्समधे स्वखर्चाने सहभागी झालेल्या, आणि कॉन्फरन्समधे  ज्वलंत चर्चा घडवून आणल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.

लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स मधील डॉ.आंबेडकर स्टुडंट असोसिएशनच्या अध्यक्ष रितू दहिया व सचिव सिद्धांत मैत्रेया यांनी उपस्थित राहून आपली मनोगते व्यक्त केली. प्रा.मृणाल दुप्पटे, पीएच.डी विद्यार्थिनी कु. श्रुती भंडारी यांनी भारतातून येऊन आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केल्याबद्दल  सर्वांचे आभार व समाधान व्यक्त करून पुढील जीवनात समाजासाठी योगदान करण्याचा मनोदय व्यक्त केला. ऑक्सफर्ड विद्यापीठात पीएच.डी साठी संशोधन करणारे मिलिंद अहिवळे आणि त्यांचे ६ सहकारी यांनी परिषदेच्या तसेच ऑक्सफर्ड विद्यापीठ भेटीच्या आयोजनासाठी बहुमोलाचे सहकार्य केले. सायास सहकारी संस्थेच्या कार्यालयातील  डॉ. शितल रणधीर,  अक्षय मखरे, प्रकाश वाघ, कु.जान्हवी कांबळे इत्यादींनी परिषदेच्या आयोजनात सक्रीय योगदान दिले. 

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेले घर, त्यांनी हाताळलेल्या विविध वस्तू, भिंतीवर लावलेल्या विविध पोजमधील तसबिरी, लंडन स्कूल इकॉनॉमिक्स मध्ये घेतलेले शिक्षण, तेथील ग्रंथालयाने दर्शनी भागात लावलेला केवळ त्यांचा पुतळा, नोबेल पारितोषिक विजेत्यांची यादी आणि त्यात डॉ बाबासाहेबांचे उठून दिसणारे वेगळेपण, ग्रेज इन मधील भव्य वास्तूमध्ये त्यांनी बॅरिस्टर पदवीसाठी घेतलेले शिक्षण,  त्याचठिकाणी जागतिक दर्जाच्या विद्वानात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे लावलेले रुबाबदार तैलचित्र, तिथले भव्य ग्रंथालय या सर्व डॉ बाबासाहेबांच्या सहवासाने पुनीत झालेल्या वास्तूचे दर्शन, स्पर्श व अनुभूती घेत असताना सर्वांकडून महामानवाविषयी कृतज्ञता व्यक्त होती आणि डोळ्याच्या कडा पाणावल्या जात होत्या.

 ‘प्रॉब्लेम ऑफ रुपी’ या ग्रंथाच्या शतकपूर्ती निमित्त लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे शतकोत्तर जागतिक परिषद घेणे, त्यामधे भारताच्या अर्थव्यवस्थेचा १०० वर्षाच्या वाटचालीचा अभ्यास करून सद्यस्थिती समजून घेणे, यासाठी परिषदेचा आराखडा तयार करणे आणि परिषद यशस्वी करणे याची सर्वस्वी जबाबदारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे व  यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी पुणेचे माजी संचालक रविंद्र चव्हाण यांनी डॉ.केशव पवार, डॉ.गजानन पट्टेबहादूर यांच्या सहयोगाने यशस्वीरीत्या पार पाडली.  डॉ.संजोय रॉय, प्रा.डॉ.सुभाष वाघमारे, अँड.विजयालक्ष्मी  खोपडे, डॉ.सध्या नारखेडे, डॉ.वृषाली रणधीर, डॉ.मेघना भोसले, सौ. मंगला चव्हाण ,डॉ. सुधीर मस्के, अँड समाधान सुरवाडे, श्री अविनाश देवसटवार इत्यादींनी दिलेल्या सहयोगामुळे ही जागतिक व ऐतिहासिक परिषद अत्यंत यशस्वीरित्या संपन्न झाली.  

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या आर्थिक परिप्रेक्षातून भारताच्या आर्थिक प्रश्नावर दिशादर्शक भाष्य करणारे पुस्तक लवकरच ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या प्रेस तर्फे प्रकाशित करणार असल्याचे कॉन्फरन्सचे समन्वयक श्री. रविंद्र चव्हाण यांनी  सर्वांच्या वतीने जाहीर केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com