ठाणे महानगर पालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना काही दिवसांपूर्वी झालेल्या मारहाणप्रकरणात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नौपाडा पोलिस ठाण्यात दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी न्यायालयाकडे केली असल्याची माहिती मिळत आहे. अचानक सुचलेल्या या शहाणपणामुळे ठाण्यात चर्चेला उधाण आले आहे. निवडणुकीच्या धामधुमीत या प्रकरणी महेश आहेर यांना माघार घेण्याचा सल्ला देणारा मास्टर माईंड कोण आहे याबाबत उलट सुलट चर्चा होत आहेत. हा गुन्हा रद्द करण्याच्या अर्जात महेश आहेर यांचे प्रतिज्ञापत्र जोडण्यात आले असून यात मारहाणीचा प्रकार गैरसमजातून झाला असल्याचे स्पष्टीकरण देत गुन्हा मागे घेण्यास हरकत नसल्याचे नमूद केले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत जवळचे अधिकारी असल्याचा आरोप आव्हाड यांनी महेश आहेर यांच्यावर केला होता. आता त्यांनीच आव्हाड यांच्याविषयी गैरसमजातून तक्रार केल्याचे प्रतिज्ञापत्र दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. फेब्रुवारी २०२३ मध्ये ठाणे पालिकेचे सहायक आयुक्त महेश आहेर यांनी आमदार आव्हाड यांच्या मुली व जावयाच्या हत्येची सुपारी दिल्यासंदर्भात कथित ऑडिओ क्लिप वर्षभरापूर्वी समोर आली होती. या क्लिपनंतर पाच ते सहा जणांनी आहेर यांना ठाणे पालिका मुख्यालयासमोरच मारहाण केली होती. आहेर यांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करताना मारहाण करणाऱ्यांनी आव्हाड यांचे नाव घेत आपल्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार नौपाडा पोलिस ठाण्यात दिली होती. त्यानुसार, पोलिसांनी आव्हाड यांच्यासह त्यांच्या सहा कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला होता. तत्पूर्वी आव्हाड यांनीही एका ऑडिओ क्लिपचा हवाला देत आहेर गुन्हेगारांच्या साथीने आपल्या तसेच कुटुंबीयांच्या हत्येचा कट रचत असल्याची तक्रार नौपाडा पोलिस ठाण्यात दाखल केली होती.
या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात गुन्हा रद्द करण्यासाठी आव्हाड यांनी अर्ज दाखल केला असून यात या गुन्ह्याचा आणि आपला काहीही संबंध नसल्याचा दावा केला आहे. या अर्जात आव्हाड यांनी आहेर यांचे चार पानी प्रतिज्ञापत्रही जोडले असून यात आहेर यांनी नौपाडा पोलिस ठाण्यात आव्हाड यांच्याविरोधातील तक्रार गैरसमजातून केल्याचे म्हटले आहे. एका ऑडिओ क्लिपमधला आवाज माझा आहे, अशा गैरसमजातून हा हल्ला झाला होता. मात्र त्यात आव्हाड यांचा काहीही संबंध नसल्याचे मला स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी माझी काहीही तक्रार नसल्याचेही आहेर यांच्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. त्यामुळेच या घटनाक्रमामागे पडद्यामागून कोणत्या राजकीय हालचाली सुरू आहेत याची चर्चा ठाण्यात रंगली आहे.
याबाबत जितेंद्र आव्हाड यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. मला या प्रकरणाबाबत काहीही बोलायचे नाही असे बोलून त्यांनी प्रसिद्धी माध्यमांना टाळले.
हे पण वाचा....click here 👉 घरांचे आणि गाळ्यांचे वाटपात मोठा गैरव्यवहार ? "त्या" अधिकाऱ्याची चौकशी करण्याची मागणी
0 टिप्पण्या