अजब पालिकेचा गजब कारभार....


 ठाणे महानगर पालिकेतील मालमत्ता विभागाचे अधीक्षक तथा सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांची चौकशी करण्यापूर्वी त्यांना पदमुक्त करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी केली.  अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाड यांच्यासमोर (22 फेब्रुवारी 2021 )  झालेल्या सुनावणीमध्ये  आनंद परांजपे यांनी महेश आहेर यांच्याबाबतीत पालिकेकडून झालेल्या अनेक नियमबाह्य गोष्टींचे पुरावेच सादर केले. त्यामध्ये आहेर यांच्या शैक्षणिक पुराव्यांसह, देण्यात आलेल्या पदोन्नत्या, विहित कालावधीपेक्षा अधिक काळाचे प्रभारीपद, बोगस ताबापत्रांच्या बाबतीत झालेल्या सह्या आदींचा समावेश आहे. यामुळे आता आहेर यांच्यावरील अडचणींचा डोंगर अधिकच वाढला आहे. 

15 फेब्रुवारी रोजी परांजपे यांनी महेश आहेर यांच्याविरोधात तक्रार केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने संजय हेरवाडे यांच्यासमक्ष  सुनावणी झाली. यावेळी परांजपे यांनी ज्या अधिकाऱ्याची चौकशी करण्यात येणार आहे. असा अधिकारी पदावर असल्यास त्याची चौकशी निष्पक्ष होण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे महेश आहेर यांना जर निलंबित करणे शक्य नसेल तर त्यांना आधी स्थावर मालमत्ता विभागाच्या अधीक्षक आणि दिवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त पदावरुन तत्काळ पदमुक्त करावे अशी मागणी केली. या सुनावणीमध्ये शैक्षणिक पात्रता, बीएसयूपीच्या घरांचा घोटाळा, अनधिकृत बांधकामे, त्यांची संपत्ती, अतिरिक्त पोलीस संरक्षण आदी कागदोपत्री माहिती परांजपे यांनी सादर केली. 

परांजपे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, महेश आहेर हे दहावी उत्तीर्ण अन् अकरावी नापास आहेत. त्यांनी विनायका मिशन, सिक्कीम येथून बनावट पदवी घेतली आहे; दिवा प्रभाग समितीमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरु असून या बांधकामांना आहेर यांचेच अभय आहे; बीएसयूपीच्या बोगस लाभार्थी गुन्ह्यातील सीआरपी कलम 173 (8) या गुन्हा प्रकरणात हस्ताक्षर तज्ज्ञांकडून महेश आहेर यांच्या सहीची तपासणी करण्याची मागणी आरोपींनी करतानाच आरोपींना महेश आहेर यांनी कमिशन दिलं असल्याची तक्रार कासारवडवली पोलीस ठाण्यात केली असल्याची प्रतही परांजपे यांनी सादर केली. महेश आहेर यांना देण्यात आलेल्या पदोन्नत्या या देखील बेकायदेशीर आहेत. 

प्रभारी पदाचा कार्यकाळ हा सहा महिने असावा, असे संकेत आहेत. मात्र आहेर हे या पदावर दोन ते तीन वर्षांपेक्षा अधिक काळ आहेत. नौपाड्यामध्ये कार्यरत असताना त्यांच्यावर दोषारोप सिद्ध करुन त्यांचे 1 मार्च 2016 रोजीचे निलंबन करुन 23 मे रोजी दोषारोप निश्चित करण्यात आले होते. असे असतानाही अवघ्या 80 ते 85 दिवसांत त्यांना पुन्हा सेवेत घेऊन अधीक्षकपदी तसेच प्रभारी सहाय्यक आयुक्तपदी नियुक्ती देण्यात आली. तसेच, बीएसयुपीच्या घरांच्या वाटपामध्येही लाभार्थी नसलेल्यांना घरे देण्यात आली आहेत. आहेर यांनी बायोमेट्रीकमध्येही घोटाळा केला असल्याचे दिसून आले आहे. मुंब्रा येथील फरझाना मंजील या इमारतीमधील घर क्रमांक 203 या वास्तूवर पावती क्रमांक 3428 आणि 3455 अन्वये अनुक्रमे शबाना अश्रफ अन्सारी आणि रहिम मोहम्मद अब्दूल लतीफ या दोघांच्या नावे बायोमेट्रीक सर्व्हे करण्यात आलेला आहे. त्याशिवाय, कारवार, कर्नाटक येथे राहणारे विशाल वसंत सावंत या इसमाला धर्मवीर नगर येथे; तर ज्याचा ठाण्याशी दुरान्वये संबध नाही अशा घाटकोपर येथील इसमाला धर्मवीर नगरच्या बी 3 मधील फेज 1, फेज दोनमध्ये 1102 आणि 1103 ही दोन घरे दिलेली आहेत.

महानगर पालिका हद्दीमध्ये विकासकामात बाधीत झालेल्यांचे पुन:र्वसन करण्यात येत असते. मात्र, पालिकेकडे बाधीतांना देण्यासाठी घरे शिल्लक नसल्यास रेंटल हाऊसिंगमध्ये 2 हजार रुपये भाडेतत्वावर घरे देण्याचे प्रस्तावित करण्यात येत असते. मात्र, महेश आहेर यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करुन दोस्ती रेंटलच्या इमारत क्रमांक 1 मध्ये 1617, 1618, 1528, 1204, 924, 925, 926, 927, 928, 902 ; इमारत क्रमाक 2 मधील 618, 617, 616, 503, 411, 410, 409, 408 ; इमारत क्रमांक 3 मधील 616, 405 आणि इमारत क्रमांक 4 मधील 1201, 1309, 1311, 1301, 1302, 1401, 1402, 1506, 1501, 1502, 1503, 1504, 1505, 1610, 1607, 1611 ही घरे शेट्टी लोकांना 4 हजार रुपये भाड्याने दिली आहेत. काही जणांकडून त्यांनी 3 वर्षांसाठी 3 लाख रुपये भाडे आकारुन त्यांचे करारपत्रही बनवून घेतले आहे, यासंदर्भातील पुरावेही परांजपे यांनी सादर केले. 

प्रत्येक शासकीय कर्मचार्‍यांनी त्यांच्या प्रॉपर्टीबाबतची सर्व माहिती संबंधीत विभागास देणे बंधनकारक आहे. महेश आहेर यांच्या नावे असलेली आणि त्यांनी सेवेत असताना खरेदी केलेली रुम नं. 104, वसंत लॉन्स, बिल्डींग क्रमांक 4, पॅरामॉस, वोल्टास प्रॉपर्टी, येथील अत्यंत महागडी मिळकत आणि त्यांच्या इतर मिळकतींची माहिती प्रशासनास दिली नसल्याची दाट शक्यता असून त्यांच्या सर्व ज्ञात आणि अज्ञात मिळकतींची सखोल चौकशी करण्यात यावी; महेश आहेर यांनी ठाणे तसेच शिळफाटा येथे असलेल्या दोस्ती रेंटलमधील घरांचे आणि गाळ्यांचे वाटप करताना मोठा गैरव्यवहार केला आहे, असे आरोप करुन महेश आहेर यांची ऐंटीकरप्शन खात्यामार्फत चौकशी करावी, त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आनंद परांजपे यांनी या सुनावणीमध्ये केली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या