Top Post Ad

भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी प्रागंतिक रिपब्लिकन पक्ष काम करणार- शामदादा गायकवाड


 वर्णवर्चस्ववादी, ब्राह्मणशाही आणि भांडवलशाहीच्या  हातमिळवणीने देशातील लोकशाही धोक्यात आली आहे. मागील काही वर्षापासून देशातील अराजक स्थिती पाहिल्यास अत्यंत घातक अश्या फॅसिस्ट आरएसएस  भाजपाचे इरादे स्पष्ट झालेले दिसत आहेत. कधी नव्हे इतक्या गंभीर व भयावह राजकीय स्थितीत भारतीय जनता आली आहे.  भारताचे संविधान नष्ट करण्याचा व लोकशाही संपुष्टात येवून चातुर्वर्ण्यधिष्टीत मनुवादी हुकूमशाही लादली जाण्याचा धोका मागील दहा वर्षात शतपटीने वाढला आहे. त्यामुळे कदाचित येणारी निवडणुक ही देशातील शेवटची निवडणुक ठरण्याची शंका निर्माण होत असल्याने याला प्रतिबंध करण्यासाठी,  भाजप, आरएसएसचे मनसुबे उधळण्यासाठी  केंद्रातील आरएसएस प्रणित भाजपा सरकार  घालवणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी आंबेडकरी विचारांच्या मान्यवर मंडळींना एकत्र करून आज प्रागतिक रिपब्लिकन पक्ष निर्माण करत असल्याची घोषणा मुख्य समन्वयक श्यामदादा गायकवाड व संजय अपरांती यांनी आज मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत केली.

 कुठलाही आंबेडकरवादी, बहुजनवादी पक्ष राज्यात स्वबळावर जिंकणे दूरच, पण मोदी आणि त्यांच्या भाजपला एकट्याने कदापिही पराभूत करू शकत नाही, असे सांगतानाच या लोकसभा निवडणुकीत बौद्ध समाजाने भाजपच्या पथ्यावर पडणारे आपल्या निर्णायक मतांचे विभाजन टाळावे आणि महाविकास आघाडीच्या प्रबळ उमेदवारांना विजयी करावे,  देशात लोकसभा २०२४च्या निवडणुकीचे वारे वहात असतानाच या पक्षाची स्थापना करण्यात येत असली तरी या निवडणुकीत पक्ष आपले उमेदवार जाहिर करण्यासाठी नाही तर इंडिया आघाडीतील महाविकास आघाडीच्या बाजूने भक्कमपणे उभे राहणार आहे. त्यामुळे दलित-बहुजन समाजाच्या मतांचे विभाजन न होता भाजपविरोधी उमेदवार निवडून येतील असा आशावाद ज्येष्ठ पँथर - रिपब्लिकन नेते श्यामदादा गायकवाड  यांनी व्यक्त केला 

यावेळची लोकसभा निवडणूक ही राज्यातील बौद्ध समाजासाठी आपले राजकीय उपद्रव मूल्य सिद्ध करून दाखवण्याची मुळीच नाही. या निवडणुकीत देशाचे संविधान आणि लोकशाही वाचवण्याचे मोठे आव्हान समोर उभे ठाकले आहे. मोदी आणि त्यांच्या भाजपला रोखणे ही काळाची गरज आहे,  बौद्ध समाजाच्या एकजुटीच्या निर्णायक मतांची ताकद ही नव्याने सांगण्याची वा दाखवण्याची गोष्ट राहिलेली नाही, आंबेडकरी समाजाने आपल्या मतांची उपयुक्तता आणि उपद्रवमूल्य आजवर अनेकदा सिद्ध केले आहे. १९९० सालात एकिकृत रिपब्लिकन पक्षानेच शिवसेना - भाजप युतीला सत्तेवर येण्यापासून रोखले होते. तसेच घाटकोपरच्या रमाबाई कॉलनीतील दलित हत्याकांडानंतर १९९९ सालात त्या युतीला सत्तेतून हद्दपारसुद्धा केले होते. त्याचीच पुनरावृत्ती या लोकसभा निवडणुकीत आपल्या मतांची विभागणी टाळून आंबेडकरी समाज घडवेल आणि भाजपला रोखेल, या विषयी आमच्या मनात तिळमात्र शंका नाही, असे गायकवाड, वाघमारे, सुराडकर,अपरांती, खोबरागडे यांनी एकसुरात सांगितले.

यावेळी आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ नेते (आयपीएस) सुधाकर सुराडकर,  सुनील खोब्रागडे, सयाजी वाघमारे, कॉ .सुबोध मोरे, अॅड.राजय गायकवाड,  दिवाकर शेजवळ,  सुमेध जाधव, जयवंत हिरे, चंदू जगताप, किरण चन्नै, सुनिल कदम, प्रकाश सोनावणे, संजय सावंत, गौतम सांगळे, विजय बागुल, अश्विन कांबळे, मिलिंद गायकवाड,  प्रा.अशोक बहिरराव,  रमेश चक्रे,  मिलिंद गायकवाड यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि निरनिराळ्या संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र हे कायद्याचे राज्य आहे.पण ते दिसत नाही.राज्यात अराजकता माजली आहे . पोलीस आणि न्यायालय स्वच्छ चारितत्र्याचे लोक अजूनही आहेत .परंतु काही गुन्हेगारी लोकांमुळे या संस्थेचे पावित्र्य नष्ट झाले आहे . अशांना येथून  बाहेर घालवण्याची वेळ आली आहे, असे आयपीएस अधिकारी सुधाकर सुराडकार म्हणाले.

प्रागतिक रिपब्लिकन पक्ष या निवडणुकीत उमेदवार उभे करणार नाहीत. पण दलित मतांचे विभाजन टाळण्यासाठी राज्यातील दलित वस्त्या,आदिवासी पाडे  या ठिकाणी जाऊन महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदार करा,असे आवाहन करणार आहोत,अशी माहिती संजय अपरांती यांनी यावेळी दिली.

काही आंबेडकरवादी, बहुजनवादी गट - संघटनांनी केवळ पक्षीय अस्तित्वासाठी या निवडणुकीत आपले उमेदवार उभे केले आहेत. त्यांनी संविधान आणि लोकशाहीच्या अस्तित्वाला प्राधान्य देवून माघार घ्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले  विदर्भातील पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वी आंबेडकरी समाजाची भाजपच्या पथ्यावर पडणारी मतविभागणी टाळण्यासाठी थोर विचारवंत डॉ. यशवंत मनोहर, डॉ. सुखदेव थोरात यांच्या नेतृत्वाखाली ८० संघटनांनी जनजागृती केली होती. त्यांनी देखील  पाठिंबा दिला  असून भाजपच्या पराभवासाठी राज्यभरात हे काम आंबेडकरी कार्यकर्त्यांनी सर्वत्र जोरात सुरू केले आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. या लोकसभा निवडणुकीत भाजपचा धुव्वा उडवण्याचे उद्दिष्ट साध्य केल्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला अस्सल रिपब्लिकन पक्ष उभा ठाकलेला दिसेल. त्यासाठी प्रागतिक रिपब्लिकन पक्षाची उभारणी आम्ही सुरू केली आहे, अशी घोषणा श्यामदादा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत केली.

पत्रकार परिषदेपूर्वी रिपब्लिकन - आंबेडकरवादी कार्यकर्त्यांची बोलावण्यात आलेली बैठक बेल्लॉर्ड इस्टेट येथे तब्बल चार तास चालली. मुंबई, ठाणे जिल्हा, नवी मुंबई, नाशिक येथून आंबेडकरी कार्यकर्ते या बैठकीसाठी आले होते.  अशी माहिती प्रोग्रेसिव्ह रिपब्लिकन पार्टी,  महाराष्ट्र राज्य. कार्यालयीन सचिव   महेंद्र पंडागळे यांनी दिली. 

हे पण वाचा....click here 👉 इतके गट असलेला समाज कसा सत्तेत येईल ?





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com