Top Post Ad

महान क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद


  भारताच्या स्वतंत्र संग्रामामध्ये अनेक ज्ञात/अज्ञात क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली व आपले संपूर्ण जीवन देशासाठी समर्पित केले.यामध्ये प्रामुख्याने क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांचे नाव मोठ्या अभिमानाने आजही घेतले जाते.त्याचप्रमाणे अल्पवयात देशासाठी लढा उभारणारे महान क्रांतिकारक म्हणून चंद्रशेखर आझाद यांची ख्याती आहे.चंद्रशेखर आझाद यांचा जन्म 23 जुलै 1906 ला मध्यप्रदेशातील झाबुआ (अलिराजपूर) जिल्ह्यातील भावरा या गावी झाला.जन्मताच त्यांच्या हृदयात क्रांतिची जोत लखलखत होती.त्यांचे प्राथमिक शिक्षण भावरा या गावात झाले.परंतु आईच्या इच्छेनुसार ते वाराणसी येथील संस्कृत पाठशाळेत शिकत असताना सुद्धा त्यांच्यात क्रांतीची ज्वाला धकधकत होती.चंद्रशेखर आझाद यांचे बालपण भिल्ल जमातीच्या वस्तीत गेले त्यामुळे ते धनुष्य बाण उत्तम रीतीने चालवत म्हणजेच त्यांच्यात बालपणापासून लढवय्य व क्रांतिकारक वृत्ती होती.

 13 एप्रिल 1919 रोजी झालेल्या जालियनवाला बाग हत्याकांड घटनेचा चंद्रशेखर आझाद यांच्या मनावर चांगलाच परिणाम झाला.त्यानंतर चंद्रशेखर आझाद 1920 मध्ये महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखालील असहकार चळवळीचा एक भाग बनले आणि वयाच्या 15 व्या वर्षी त्यांना अटकही झाली.अशा परिस्थितीत ब्रिटन न्यायालयाने या छोट्याशा मुलाला 12 फटक्यांची अमानुष शिक्षा दिली.चंद्रशेखर आझाद यांचे मुळ नाव चंद्रशेखर सीताराम तिवारी होते.परंतु बालवयातील अमानुष शिक्षा पहाता ब्रिटिश न्यायालयात नाव नोंदविताना आपले आडनाव आझाद असल्याचे नोंदविले.तेव्हापासुन संपूर्ण हिंदुस्थानात चंद्रशेखर आझाद नावाने ओळखले जाऊ लागले.फटक्यांनी आझादांच्या मनात क्षोभ वाढुन तळपायाची आग मस्तकात गेली आणि त्याच क्षणी त्यांचा अहिंसेवरील विश्वास उडाला व क्रांतिकारक झाले.आझाद यांचा क्रांतीकारी हेतू पहाता 1922 साली महात्मा गांधीनी आझाद यांना असहकार चळवळीतून काढून टाकले.त्याचे आझाद यांना खुप वाईट वाटले.अशा परिस्थितीत त्यांनी गुलामगिरीत असलेल्या भारताला स्वातंत्र्य करण्याची शपथ घेतली.पुढे त्यांची भेट हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनचे संस्थापक राम प्रसाद बिस्मिल यांच्याशी झाली व क्रांतीची ज्योत आणखी प्रज्वलित झाली.क्रांतीची ज्वाला संपूर्ण भारतात पसरविण्याच्या दृष्टीने मातृभूमीच्या रक्षणार्थ अनेकांना आंदोलनात सहभागी होण्यास प्रेरित केले.

इंग्रजांना आर्थिक दृष्ट्या कमजोर करण्याच्या हेतूने व क्रांतिकारकांची भिती इंग्रजांमध्ये निर्माण व्हावी या उद्देशाने आझाद यांनी आपल्या बळावर काकोरी ट्रेन लुटली आणि व्हाइसरॉयच्या ट्रेनला उडविण्याचा देखील प्रयत्न केला.इंग्रजांच्या असेम्ब्लीत बॉम्ब फोडण्याच्या घटनेत चंद्रशेखर आझाद यांनी भगतसिंग यांना पुरेपूर मदत केली.चंद्रशेखर आझाद हे भगतसिंग यांचे मुख्य सल्लागार होते.भगतसिंग यांना अटक झाल्यानंतर त्यांना सोडविण्यासाठी देखील आझाद यांनी भरपूर प्रयत्न केलेत.अशा परिस्थितीत इंग्रजांना नेहमी प्रमाणे चकमा देतच होते.दिनांक 27 फेब्रुवारी 1931 रोजी अलाहाबाद मधील अल्फ्रेड पार्क येथे राजगुरू हे जेलमध्ये असतांना त्यांच्या आईला आर्थिक मदत व्हावी यासाठी ते एका क्रांतिकारक सहकाऱ्याला भेटण्यासाठी गेले असता, एका अज्ञात खबऱ्याने इंग्रजांना चंद्रशेखर आझाद असल्याची वार्ता दिली आणि मोठा घात झाला.इंग्रजांना वार्ता मिळताच मैदानाला वेढा घातला. अशा परिस्थितीत चंद्रशेखर आझाद व इंग्रज सैन्य यांच्यात गोळीबार झाला.अशावेळी आझाद यांनी तीन इंग्रजांना धाराशाही केले.आपल्या जवळच्या गोळ्या संपत आहे हे त्यांच्या लक्षात आले.अशा परिस्थितीत त्यांना इंग्रजांच्या हातुन मरने पसंत नव्हते शेवटच्या गोळीने स्वतःला मारून घेतले आणि क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद देशांच्या स्वतंत्र लढ्यासाठी शहीद झाले.भारत स्वतंत्र होण्यासाठी ज्यांनी कशाचीही पर्वा न करता आपल्या प्राणांची आहुती दिली अशांमध्ये आघाडीवर घेतले जाणारे नाव म्हणजे क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद. त्यामुळे भारतीय स्वातंत्र्य संग्रामात अनेक ज्ञात/अज्ञात क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली व देश स्वतंत्र झाला.त्यामुळे त्यांच्या बलिदानाची पावती आजच्या राजकीय पुढाऱ्यांनी देणे गरजेचे आहे. 

देशातील राजकीय पुढाऱ्यांनी लक्षात ठेवले पाहिजे की देश स्वतंत्र करण्यासाठी क्रांतिकारकांनी घरदार सोडून,आपला परिवार सोडून आणि आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या प्राणांची आहुती  दिली.त्यांची पुर्तता करण्याचे काम आज राजकीय पुढाऱ्यांचे आहे.कारण देशातील जनता सुखी-समृध्दी आणि समाधानी रहावी म्हणून देश स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारकांनी लढा उभारला होता.आता देश स्वतंत्र झाला आहे तरी देशात बेरोजगारी, भुकमरी,महागडे शिक्षण, रोजगार या सर्वांचा सामना गरीब व सर्वसामान्यांना करावा लागतो आहे.आज 140 करोड लोकसंख्येच्या देशात करोडोंची संपत्ती आहे यात दुमत नाही.परंतु मुठभर राजकीय पुढाऱ्यांनी (आजी-माजी आमदार-खासदार, मंत्री,लोकप्रतिनिधी) देशांच्या करोडोंच्या संपत्तीवर आपली पकड मजबूत ठेवली आहे.यामुळे हा पैसा 140 कोटी जनतेपर्यंत पोहचत नाही.यामुळे आर्थिक उलाढाल खोळंबत आहे व यातुनच देशात अनेक नवीन-नवीन समस्या निर्माण होतांना दिसतात व याचा फटका सरळ सर्वसामान्य व गरीब लोकांना भोगावा लागत आहे.

त्यामुळे दिवसेंदिवस गरीब हा गरीब होत आहे तर श्रीमंत हा दिवसेंदिवस श्रीमंत होत आहे ही स्वतंत्र भारताची शोकांतिका म्हणावी लागेल.त्यामुळे राजकीय पुढाऱ्यांना माझी विनंती आहे की क्रांतिकारकांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले त्याचा फायदा गरीब व सर्वसामान्यांना व्हावा या उद्देशाने कार्य केले पाहिजे. त्याचबरोबर राजकीय पुढाऱ्यांनी वाममार्गाने कमविलेली संपूर्ण संपत्ती सरकारी तिजोरीत जमा करून देशाच्या व सर्वसामान्यांच्या विकासासाठी हातभार लावला पाहिजे.तेव्हाच राजकीय पुढाऱ्यांकडुन क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांना खरी श्रद्धांजली ठरेल.त्याचप्रमाणे देशात वाढते प्रदुषण पहाता क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण व्हायला हवेत.यामुळे संपूर्ण देशात वातावरण प्रफुल्लित राहील व ऑक्सिजनची मात्रा वाढेल आणि मुख्यत्वेकरून या दिवशी केलेले वृक्षारोपण अनंत काळापर्यंत आपल्याला ग्यात राहिल व प्रत्येक झाडाच्या पानात, फुलात, फळात व मुळांमध्ये आपल्याला क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांची क्रांतीची ज्वाला धकधकतांना दिसेल. क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांना कोटी-कोटी प्रणाम.जय हिंद!

रमेश कृष्णराव लांजेवार
(माजी विद्यापीठ प्रतिनिधी, नागपूर)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com