श्रमिकांवरील अन्याया बाबत सरकार गंभीर दिसत नाही. त्यामुळे आपली एकजूट करून सतत लढावे लागेल, कंत्राटी कामगार हा असंघटित नसून असुरक्षित आहे. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी श्रमिक जनता संघ युनियन कटिबध्द आहे. मात्र कामगारांनी युनियनची सभासद वर्गणी दिली म्हणजे लगेच सर्व प्रश्न सुटतील असे नाही. शिकलेल्या कामगार कार्यकर्त्यांनी विविध कामगार कायद्यांचे वाचन केले पाहीजे. स्वतः आपले प्रश्न कायदेशीरपणे मांडले पाहिजे. समाजातील अन्याय अत्याचारा बाबत संवेदनशील राहून व्यापक लढाईतही सहभागी झाले पाहिजे, असे आवाहन मेधा पाटकर यांनी केले. ठाण्यातील मराठी ग्रंथ संग्रहालयात ४ जानेवारी रोजी श्रमिक जनता संघ युनियनच्या वतीने कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नावर लढा उभारण्यासाठी निर्धार मेळावा आयोजित केला होता त्यावेळी भरगच्च सभागृहात त्या बोलत होत्या.
विचार मंचावर युनियनचे उपाध्यक्ष डॅा. संजय मंगला गोपाळ, सरचिटणीस जगदीश खैरालिया आणि चिटणीस सुनील कंद उपस्थित होते. ठाण्यातील महापालिकेच्या पाणी पुरवठा, शिक्षण विभाग, मलनिःसारण, यांत्रिक, घनकचरा व्यवस्थापन आणि पाणी पुरवठा विभागातील कामगारांसह प्रादेशिक मनोरूग्णालयातील सफाई कामगार आणि रेल्वे मधील कंत्राटी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अनेक सरकारी अधिकाऱ्यांबाबत चांगले अनुभव नसतात. परंतु काही अभ्यासू आणि संवेदनशील अधिकारी मात्र याला अपवाद ठरतात. ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर हे अभ्यासू आणि अत्यंत संवेदनशील असल्याचे वाटते, असे मत त्यांनी व्यक्त केले. ठाणे महापालिकेच्या विविध विभागातील कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी मेळाव्याआधी महापालिका मुख्यालय येथे श्रमिक जनता युनियन संघाच्या अध्यक्ष मेधा पाटकर यांनी उपाध्यक्ष संजय मंगला गोपाळ, सरचिटणीस जगदीश खैरालिया आणि कामगार प्रतिनिधीसह आयुक्त अभिजीत बांगर भेट घेतली होती. कंत्राटी कामगारांना त्यांचे कायदेशीर वेतन व सोयीसुविधा पुरवण्या साठी महापालिका प्रशासन बांधील असल्याचे आश्वासन आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले. ठाण्यातील विविध विभागात काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या व्यथा आयुक्तांसमोर मांडण्यात आल्या. ठेकेदारांकडून होत असलेली कामगारांची आर्थिक पिळवणूक कथन केली. तसेच या समस्येतून कंत्राटी कामगारांची सुटका करावी अशी विनंती केली. त्यावर आयुक्त बांगर यांनी तात्काळ याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. ठेकेदाराने कंत्राटी कामगारांना न्याय दिला नाही तर त्यांचा ठेका रद्द करा, अशा सूचना दिल्या असल्याची माहिती मेधा पाटकर यांनी मेळाव्यात दिली.
कंत्राटी कामगारांना मृत्यू किंवा वयोमानानुसार कामावरून कमी केल्यानंतर उपदानाची ग्रॅच्युईटी (Gratuity) मिळाली पाहिजे, भरपगारी रजा किंवा त्याचे वेतन, सार्वजनिक सुट्टीचे वेतन मिळाले पाहिजे, पीएफ, वैद्यकीय उपचार सुविधा, गणवेश, वेतनस्लिप आणि सुरक्षिततेची साधने नियमित व नियमानुसार द्यावे, किमान वेतन कायद्यानुसार वेतन, भत्ते आणि बोनस फरकाची थकीत रक्कम पूर्वलक्षी प्रभावाने अदा करा आदी मागण्यांसह कामगारांची पिळवणूक करणाऱ्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्टेड करून कामगारांना महापालिका प्रशासनाने वेतन व सुविधा द्या आदी मागण्यांचे निवेदन आयुक्तांकडे सादर करण्यात आले आहे.
मेळाव्यात सुरुवातीला प्रमुख कार्यकर्त्यांनी वर्षभरात आपल्याला विभागातील कामाचा अहवाल सभेत मांडला. त्यात संतोष देशमुख, दीनानाथ देसले, वीरेंद्र सावंत, गणेश चिंदरकर, गणेश पवार सुनील कंद आदींनी सहभाग घेतला. युनियनचे नवनियुक्त कार्यकारी सचिव अजय भोसले यांनी शेवटी आभार व्यक्त केले. मेळावा यशस्वी करण्यासाठी सुनील दिवेकर, अर्चना पवार, स्वाती सावंत, गणेश चव्हाण, सचिन राठोड, सुरज वाल्मिकी, सुभाष खानेकर, कल्लू मेडवाज, आशिष परब, समीर शेख आदी कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या