ठाण्यातील विविध लोकवस्तीच्या मुलांना त्यांचे स्वतःचे व्यासपीठ उपलब्ध करुन देणाऱ्या रत्नाकर मतकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या वंचितांच्या रंगमंच आयोजित नाट्यजल्लोषाचे १० वे पर्व काल ठाण्यात टाऊन हॉल येथे मोठ्या उत्साहात पार पडले. स्वातंत्र्य सेनानी आणि विचारवंत साने गुरुजींच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाने चालू केलेल्या साने गुरुजी १२५ अभियानाचा ठाण्यात नाट्यजल्लोष कार्यक्रमाने आरंभ झाला. सिने नाट्य सृष्टीतील आणि इतर क्षेत्रातील अनेक नामवंत मान्यवर या सोहोळ्याला हजर होते.
ठाण्यातील विविध लोकवस्तीतील मुलांनी त्यात मोठ्या उत्साहाने सहभाग घेऊन नाटिका, नृत्य, शॉर्ट फिल्म्स असा रंगारंग कार्यक्रम सादर केला. या वर्षी ‘ध्येयाच्या प्रवासात, उत्तराच्या शोधत’ या थीम वर प्रभावी नाटिका सादर करण्यात आल्या. या सर्व सादरीकरणात लिंगभेद, मानवता, मुलींचे शिक्षण, महिला सबलीकरण, प्रदूषण, स्वच्छता, राष्ट्रीय एकात्मता भेद रहित समाज अशा अनेक प्रश्नांना हात घातला गेला. राबोडीतील मुस्लिम समाजाच्या मुलांनी ‘इम्तिहान’ ही मुलींना शिक्षण देण्यासाठी पालकांनी पुढाकार येणे आवश्यक आहे हे बिंबवणारी नाटिका सादर केली. या नाटकात अभिनय करणाऱ्या मुलांनीच स्वत:चे संवाद लिहिले होते आणि ते सादर केले. इतकेच नव्हे तर ही शाळा या नाट्यजल्लोषात पहिल्यांदाच सहभागी झाल्याने त्यांच्या पालकांची हजेरी उल्लेखनिय होती. सावरकर नगर विभागाने ‘स्वप्नपूर्ती’ ही स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या धडपडीची कहाणी सादर केली. घणसोली येथील मुलींनी ‘शरीर विक्रय करणाऱ्या स्त्रियांच्या मुलींनाही शिक्षण घेऊन मुख्य प्रवाहात येण्याचे स्वप्न बघण्याचा हक्क आहे हे आपल्या नाटिकेतून नेटकेपणाने सादर केले.
किसन नगर विभागाने ‘मुखवटे’ ही स्त्रियांनी आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी निर्भय व्हावे हे प्रभावीपणे दाखवणारी एकांकिका सादर केली. साठे नगर च्या मुलांनी कचरा वेचक समाजाच्या अडचणी आणि व्यथा सांगणारी नाटिका सादर केली. ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रदूषण या विषयावर पथनाट्य सादर केले. याच बरोबर या वर्षी १० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांकडून नृत्य, गाणी, अभिवाचन यांचेही प्रभावी सादरीकरण करण्यात आले. सुप्रसिद्ध शाहीर दत्ता म्हात्रे यांनी गायलेल्या साने गुरुजींच्या ‘खरा तो एकाची धर्म...’ या प्रसिद्ध प्रार्थनेच्या हिंदी अनुवादाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानी वसंत बापट यांनी लिहिलेला स्वातंत्र्याचा पोवाडा ही सादर केला.
येऊर येथील करीना, वैष्णवी आणि साथींनी लोकनृत्य सादर केलं. घणसोली येथील मुलींनी कोळी नृत्य सादर केलं. साठे नगरच्या चिमुकल्या मुलींनी रंगीलो मारो... या गाण्यावर जोरदार नृत्य सादर केलं. दीपक वाडेकर, अनुजा लोहार, निलेश दंत, निशा माळी आदि कार्यकर्त्यांनी ‘ओ मितवा...’ या गाण्यावर बहारदार नृत्य सादर केलं, त्यावर सर्व मुलांनी ठेका धरला. श्रमिक जनता संघाच्या धनजी राठोड यानी राष्ट्रप्रेमाची गाणी सादर केली.
‘आज आम्ही १० वर्षांपूर्वी लावलेल्या छोट्याश्या बीजाचे सुंदर बहरलेले रूप पाहून समाधान वाटले,’ हे उद्गार काढले समता विचार प्रसारक संस्था पुरस्कृत वंचितांचा रंगमच अर्थात नाट्यजल्लोषाच्या १० व्या वर्धापन दिनाच्या सोहोळ्यात आवर्जून हजर असलेल्या प्रतिभाताई मतकरी यांनी! तर साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष प्रमोद निगुडकर म्हणाले, रत्नाकर मतकरी हे सामाजिक प्रश्नांबद्दल अतिशय जागरुक होते. वेळोवेळी त्यानी त्या त्या वेळेच्या ज्वलंत प्रश्नावर आपल्या लेखनाद्वारे जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. एड्स जेव्हा एक मोठी सामाजिक समस्या म्हणून पुढे येत होते तेव्हा मतकरींनी त्याबद्दल संवेदनशीलता निर्माण करण्यासाठी लिहिलेली ‘एड्स सोहम’ ही त्यांनी कविता सादर केली. साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाचे विश्वस्त विजय दिवाणे ही या वेळी उपस्थित होते. सिने नाट्य सृष्टीतील अनेक नामवंत मान्यवर या सोहोळ्याला हजर होते.
सुप्रसिद्ध नाट्यलेखक अरविंद औंधे या वेळी या उपक्रमाचे कौतुक करुन म्हणाले, या उपक्रमामुळे मुलांना त्यांचे विचार मांडण्यासाठी माध्यम उपलब्ध केले आहे. ठाण्यातील नाट्य लेखक श्रीरंग खटावकर यानी ‘कमजोर हातांचा पण बुलंद मनाचा सोहळा’ असे या नाट्यजल्लोषाचे वर्णन केले. मराठी मालिकेत झळकलेली अभिनेत्री रूपल नंद या वेळी उपस्थित होती, तिने वस्तीतील मुलांना त्यांचा मंच मिळवून देणाऱ्या या उपक्रमाचे कौतुक केले. जळगावचे सामाजिक कार्यकर्ते हर्षल पाटील हे खास नाट्यजल्लोष उपक्रमाबद्दल ऐकून आले होते. ते आजचा कार्यक्रम बघून भारावून गेले आणि जळगाव मधे अशा प्रकारचा उपक्रम सुरु करण्याची मनीषा त्यांनी व्यक्त केली. शेवटी संस्थेचे संस्थापक विश्वस्त संजय मंगला गोपाळ यानी सर्व कार्यकर्त्यांच्या साथीने सादर केलेल्या साने गुरुजींच्या ‘आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान...’ या शेतकरी कामकरी यांच्या लढ्याचे महत्व सांगणाऱ्या कवितेच्या गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाट्यजल्लोषच्या संयोजक हर्षदा बोरकर आणि एकलव्य कार्यकर्ती अनुजा लोहार यांनी सांभाळले.
0 टिप्पण्या