Top Post Ad

दीपावली, दीपदानोत्सव, दिवाळी...


   व्हॉट्स ऐप, फेसबुक आदि सामाजिक माध्यमातून  "बौद्धांनी दिवाळी साजरी करावी की करु नये"  या विषयावर भरपूर चर्चा होते. काही ग्रूप्स मध्ये सौम्य तर काही ठिकाणी अगदी हमरीतुमरी वर येईस्तव वादविवाद होतात. मतभिन्नतेची दोन टोकं होती आणि एक किल्ला प्रस्तुत लेखक म्हणजे मी (महेन्द्र राऊत) ही लढवीत होतो. सर्व पोस्ट्स मी अगदी शांतमनाने वाचल्यात आणि त्यावर विचारमंथन ही केले. यात दिवाळी अथवा दीपावली किंवा दीपदानोत्सव च्या समर्थनात आणि विरोधात जे तर्क देण्यात आले त्यांना सारांश रूपाने मी पुढे ठेवत आहे..

 प्रथम आपण समर्थनातील मुद्दे बघूया.. 

 १)  दिवाळी हा मूळातच हिंदू सण नाही.. तो बौद्ध सण आहे..

 २)  दिवाळी हा सण आश्विन अमावस्या ला येतो की कार्तिक अमावस्या ला येतो याबाबत जो संभ्रम आहे तो कालगणनेच्या दोन तत्कालीन परंपरा "शकसंवत" आणि "विक्रमसंवत" मधील तफावतीमुळे आहे.

 ३)  राम, रावण, कृष्ण, नरकासूर, बळीराजा आदी चरित्र हे पौराणिक आहेत, ऐतिहासिक नाहीत. ज्ञात इतिहासात त्यांच्या कालखंडाचा पुरावा उपलब्ध नाही. त्यामुळे ते काल्पनिक आहेत. त्यांच्यावर पुराणें (भाकडकथा) रचण्यात आलेल्या आहेत. दिवाळी जर रामराज्याभिषेकाचा उत्सव असेल तर या दिवशी रामाची पूजा का केली जात नाहीं..? रामायण ही एक प्रकारचे पुराण आहे परंतु त्यातही "दिवाळी" सणाचा उल्लेख नाही. (वाल्मिकी ने लिहलेले "रामायण" हे सर्वात पुरातन मानले जाते. तुलसीदास कृत "रामचरितमानस" हे फार नंतरचे आहे) या भाकडकथांना सत्य मानून त्याचा संबंध दिवाळी शी जोडणे चुकीचे आहे. म्हणुन दिवाळी हिंदूंची नाही..

 ४)  बौद्ध काळात, विशेषत: सम्राट अशोक च्या काळापूर्वी "दिवाळी/ दिवाली/ दीपावली या नावाने कुठलाही उत्सव साजरा होत असल्याचा उल्लेख सापडत नाही. पण विशिष्ट प्रसंगी दिवे लावून नगराला प्रकाशमान व सुशोभित करण्यात येत असे उल्लेख मात्र सापडतात. बुद्धत्व प्राप्त केल्यानंतर बुद्धाचे कपिलवस्तुमध्ये प्रथम नगरागमन झाले तेव्हांही लोकांनी संपूर्ण नगराला दीप प्रज्वलित करून सजविले होते, असा उल्लेख आहे. म्हणजेच दीप प्रज्वलन ही पुरातन भारतीय परंपरा आहे..

 ५)  अर्हत महामौग्गलायन यांची हत्या (आश्विन/ कार्तिक अमावस्येला..??) वैदिकांनी (हिंदूंनी) नव्हे तर निगंठनाथांच्या लोकांनी (जैन मतावलंबियांनी) केली होती असा उल्लेख बौद्ध वाड•मयात आलेला आहे. पण त्यांनी किंवा वैदिक हिंदूनी दिवे लावून दिवाळी साजरी केल्याचा उल्लेख कुठेही आढळत नाही.

 ६)  सम्राट अशोक यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला. बुद्धांने ८४०००  धम्मवचने प्रतिपादिली त्यामुळे अशोकने ८४००० बौद्ध स्तूप/ चैत्य आरामें उभारली आणि आश्विन (की कार्तिक) अमावस्येला त्यावर दीपमाला लावली, रस्ते दिव्याने सजविले, (दीपदान केले) भिक्षुंना आणि उपासकांना धन दान दिले.. तेव्हापासून दिवाळी/ दीपावली/ दीपदानोत्सव या उत्सवाची परंपरा सुरू झाली.. (सामान्यपणे इ.स. २५० च्या सुमारास)

..... आणि म्हणुनच दिवाळी/ दीपावली/ दीपदानोत्सव हा प्राचीन बौद्ध उत्सव आहे.

 आता आपण विरोधातील मुद्दे बघूया.. 

 १)  दिवाळी हा मुळातच हिंदू सण आहे... हा बौद्ध सण नाही..

 २)  याच दिवशी बळीराजा ची वामनाने हत्या केली होती आणि म्हणून ते बळीप्रतिपदा पाळतात. याच दिवशी कृष्णाने नरकासुराची हत्या केली होती. बळीराजा व नरकासूर हे असूर म्हणजे द्रविड /मूलनिवासीयांचे राजे होते ज्यांची हत्या करुन हिंदुंनी दिवाळी साजरी केली... म्हणुन दिवाळी ही बौद्धांची नाही.

 ३)  याच दिवशी लंकाविजयानंतर अयोध्येत परत आल्यावर रामाचा राज्याभिषेक झाला होता.. म्हणुन हिंदु लोकं दिवाळी साजरी करतात... तो त्यांचा सण आहे.. आमचा (बौद्धांचा) नाही..

 ४)  याच दिवशी (आश्विन/ कार्तिक अमावस्येला) महान बौद्ध भिक्षु अर्हत महामोग्गलायन, ज्यांनी फार मोठ्या प्रमाणावर घम्मप्रसार केला होता, त्यांची अत्यंत क्रूरपणे हत्या हिंदुंनी केली..  त्यांच्या हाडांचे तुकडेतुकडे करून मारले.. आणि म्हणुन हिंदु लोकं दिवाळी साजरी करतात... त्यामुळे दिवाळी हा बौद्धांचा दुक्खाचा दिवस आहे.. उत्सवाचा नाही.

 ५)  सम्राट अशोक यांनी त्यांच्या कुठल्यातरी शिलालेखावर किंवा स्तंभावर दीपदानोत्सव साजरा करण्याबाबत काही कोरलेले नाही. तेव्हां दीपदानोत्सव हा खोडसाळ प्रचार आहे आहे. या नावाचा कुठलाही बौद्ध सण इतिहासात सापडत नाही..

 ६)  परमपूज्य बाबासाहब आंबेडकर यांनी दिवाळी साजरी केली कां, किंवा दीपदानोत्सव साजरा करायला सांगितले काय...? मग आम्ही कां करावी..? बाबासाहबांनी कुठेतरी लिहुन ठेवले असेल तर सांगा..!

 ७)  आमच्या राजा महाराजांची हत्या, बौद्ध भिक्षुंच्या कत्तली करून हिंदुंनी दिवाळी ची परंपरा सुरू केली.. म्हणुन दिवाळी /दीपावली /दीपदानोत्सव हा बौद्धांचा सण नाही...

    विरोधकांचा एक असाही आरोप आहे की..    ज्या लोकांना जुण्या संस्कारामुळे दिवाळी साजरी करावी असं वाटते.. तेच लोकं दीपदानोत्सव या गोंडस नावाखाली दिवाळी चा प्रचार करत आहेत..

       या दोन्ही बाजूंचे तर्क-वितर्क तपासून पाहता काही बाबी ठळकपणे दिसून येतात... 

        दीपदानोत्सवाचे विरोधक हे या उत्सवाबाबत पुरावे मागत आहेत पण समर्थकाकडे स्पष्ट आणि पारदर्शी पुराव्यांचा अभाव आहे.

    अशोकवदान, महावंश आणि दीपवंश आदी ग्रंथांमध्ये चैत्य आणि स्तूपांवर दीप प्रज्वलन करण्याचे उल्लेख असले तरी "दीपदानोत्सव" चा स्पष्ट उल्लेख नाही.  परंतु "अशोकाने चैत्यांवर दीपदान केले होते" याला विरोधकांनीही नाकारले नाही.  पण विरोधकांचा आग्रह आहे की अशोकाने "दीपदानोत्सव " हा शब्द कुठेतरी "कोरलेला आहे काय " ते दाखवा किंवा कोणत्याही बौद्ध धर्मग्रंथात "आश्विन/ कार्तिक अमावस्येला दीपदानोत्सव साजरा करा" असे लिहले आहे काय, ते दाखवा.... म्हणजेच पुरावा हवा आहे..!

     प्रश्न असा आहे कि अमुक अमुक सण/ उत्सव साजरा करा, असे कोणत्या सणाबाबत कुठे लिहलेले असते काय.? वैशाख पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला, याच दिवशी बुद्धत्व प्राप्त झाले आणि याच दिवशी त्यांचे महापरिनिर्वाण झाले.. हे जरी खरे मानले.. तरी "बुद्ध जयंती" किंवा "लोकहो, या दिवशी बुद्ध जयंती साजरी करा" असे कोणत्या शिलालेखावर किंवा बौद्ध धर्मग्रंथात लिहले आहे काय.? तरी आपण बौद्ध पौर्णिमा/ बुद्ध जयंती साजरी करतोच ना.?

      १४ आक्टोबर १९५६ साली विजयादशमीच्या दिवशी बाबासाहबांनी धम्मचक्र प्रवर्तन केले.. म्हणुन आपण या दिवसालाही सण मानतो, उत्सव साजरा करतो.. पण "बाबासाहबांनी समाजाला हा उत्सव साजरा करा असा तोंडी/ लेखी निर्देश दिला आहे काय"... असा प्रश्न आपण कधी विचारतो काय..?

    परमपूज्य बाबासाहब आंबेडकर यांनी २२ प्रतिज्ञा दिल्यात पण त्यातही किंवा आपल्या इतर भाषणें किंवा लेखणात बौद्ध सण / उत्सवांच्या बाबतीत काहीच सागितले नाही.   त्यांनी पहिल्या १ ते ३ प्रतिज्ञात हिंदु देवीदेवता यांना न मानणे, ४ व ५ मध्ये अनिश्वरवाद, निरवतारवाद, ६ मध्ये श्राद्ध व पिंडदान निषेध, ७ मध्ये धम्मविरुद्ध वा विसंगत आचरण न करणे, ८ मध्ये ब्राह्मण निषेध, ९ व १० मध्ये समता, ११ मध्ये अष्टांग मार्ग, १२ मध्ये दहा पारमिता, १३ ते १७ मध्ये पंचशील पालन, १८ मध्ये धम्मतत्व, १९ ते २२ मध्ये हिंदू धर्म त्याग व नवजीवन आणि बुद्ध धम्माचा स्वीकार व पालन आदी सांगितले आहे. सगळ्या लहानसहान बाबी लिहल्या पण मी होळी/ पोळा / दसरा/ दिवाळी मानणार नाही असा स्पष्ट आदेश दिला नाही. द्यायला हवं होतं काय..?     दिवाळी/ दीपावली/ दीपदानोत्सवच्या समर्थकांकडे जसे "तो बौद्ध उत्सव असल्याबाबत" सबळ पुरावे नाहीत तसेच विरोधकांकडेही तो हिंदू सण आहे, बौद्ध उत्सव नाही हे ठरविण्याइतपत सबळ पुरावे नाहीत.

         ब्राह्मण पुष्यमित्र शुंग यांनी सम्राट अशोकाचा प्रप्रनातू सम्राट बृहदत्त मौर्य याची हत्या केल्यानंतर भारतात शुंगवंशाची राजवट जवळपास १२५ वर्षापर्यंत राहीली. याच काळात प्रतिक्रांती करण्यात आली. बौद्ध भिक्षुंच्या कत्तली करण्यात आल्या. चैत्य, विहारें, स्तूप नष्ट करण्यात आले. बौद्ध साहित्य नष्ट करण्यात आले. रामायण, महाभारत, शिवपुराण, विष्णुपुराण व मनुस्मृती सह अनेक पुराणांची व संहितांची रचना याच काळात करण्यात आली. बाबासाहेबांच्या शब्दात   Buddhism विरुद्ध Hinduism च्या Unending Battle  ची सुरूवात याच काळापासून झाली. या संघर्षात बौद्ध धम्माचे प्रचंड नुकसान झाले आणि सम्राट हर्षवर्धन च्या काळानंतर बौद्ध धम्म भारतातून जवळपास हद्दपार झाला..

हे ऐतिहासिक सत्य आपण नाकारतो काय..?

आणि हे जर सत्य आहे तर अश्या स्थितीत "पुरावे" राहणार आहेत काय..? जिथं नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला, उदंतपूरी सारखी महान बौध्द विद्यापीठे भस्मसात करण्यात आली.. जिथं सगळे बौद्ध स्तूप, चैत्य, लेण्यांना  जमीनदोस्त करण्यात आले... जिथं बुद्धाच्या मूर्त्यांचे प्रचंड विद्रूपीकरण आणि विनाश करण्यात आले... जिथं नावापुरते सुद्धा बौध्द भिक्षू आणि बौद्ध उपासक सापडेनासे झाले.... तिथं, पुरावे कोठून सापडणार..?

    आशिया खंडातील अनेक देशांमध्ये बुद्ध धम्माची मजबूत उपस्थिती आणि भारतात त्याचे काही (भग्न) अवशेष शिल्लक राहीले म्हणुन परमपूज्य बाबासाहेबांना बुद्ध सापडले. तसे वैदिक हिंदुवाद्यांनी बुद्धाला विष्णुचा नववा अवतार बनविले होतेच पण बाबासाहेबांनी त्यांच्या मगरमिठीतून बुद्धाला बाहेर काढले. बाबासाहेबांनी जर विष्णुपुराणातील अवतारवादाला खरे मानले असते... हिंदुंच्या भाकडकथांवर विश्वास ठेवला असता.. तर आम्हाला बुद्ध मिळाले नसते.. ही वस्तुस्थिती आपण विसरतो.

   दीपदानोत्सवच्या समर्थकांकडे प्रत्यक्ष प्रमाणांचा अभाव असला तरी प्रबळ अनुमान प्रमाण व तर्क प्रमाण आहेत.. संशोधनाची वृत्ती आहे. प्रमेय आहेत.

     होम, हवन आणि यज्ञयाग करणारे हिंदू, पशुहत्या करणारे, गोमांस भक्षण करणारे उच्छेदवादी व क्रूर वैदिक हिंदू लोकं "दिवाळी" सारख्या राष्ट्रव्यापी उत्सवाला जन्म देवू शकत नाही. वस्तुतः आर्य ब्राह्मणांनी काहीच निर्माण केले नाही.. त्यांनी प्रत्येक गोष्ठींवर छळाने अथवा बळाने कब्जा केलेला आहे. त्यांनी बुद्धाच्या अहिंसेच्या प्रभावामुळे मांसभक्षण सोडले. त्यांनी बुद्धाची तत्वे स्वीकारली पण बुद्धाला अवतार बनवून नामशेष केले. त्यांनी असंख्य बौद्ध  विहारांवर कब्जा करून त्याचे हिंदू मंदिरात रुपांतरण केले. त्यांनी इतिहासाचे विकृतिकरण केले. ऐतिहासिक घटनांना पुसुन टाकले आणि त्यांच्या भोवती पौराणिक कथांचे जाळे विणले. त्याचा परिणाम असा की शेकडो वर्षांपासून बहुजन समाज भ्रमित झालेला आहे.

    भारतातील सर्व उत्सवांचे जनक उत्सवप्रेमी मूलनिवासी द्रविड/ नाग/ बौद्ध समाज आहेत. सर्व सार्वजनिक सांस्कृतिक सण /उत्सव हे बहूसंख्यक लोकांनी, बहुजनांनी तयार केलेले आहेत. पण ब्राह्मण/ हिंदू / हिंदुत्ववादाची अशी दहशत मनावर बसलेली आहे कि जे आपलं आहे त्यालाही आपलं म्हणण्याचं धाडस राहीलेलं नाही. ही संपूर्ण भारतीय संस्कृती "हिंदू/ ब्राह्मणी संस्कृती" आहे असा गैरसमज हा समाज पाळत आहे. श्रमण संस्कृती ही येथे नांदत होती आणि तिची प्रबळस्थाने आपण शोधली पाहीजेत असं आम्हाला अजिबात वाटत नाही. त्यातल्या त्यात आमच्यापैंकी एखाद्याने जर असा धाडस केला की लगेच त्याला " बेईमान, गद्दार, समाज द्रोही, आंबेडकरद्रोही" ठरवायला आम्ही मागेपुढे पहात नाही.

    आम्हाला प्रत्येकच गोष्टींचे उत्तर बाबासाहेबांकडून पाहिजे आहे. हे योग्य आहे काय.? बाबासाहेबांनी आम्हाला जी दृष्टी दिली त्याचा उपयोग करायचा नाही काय.? आणि कोणी जर त्याच दृष्टीचा वापर करून नवीन संशोधन करीत असेल तर त्यांचेशी सम्यक चर्चा न करता " तू स्वतःला बाबासाहेबांपेक्षा मोठा विद्वान समजतोस काय " असा दम देणं योग्य आहे काय.? बाबासाहेबांनंतर बुद्धी आणि ज्ञानाची परंपरा संपली असं समजणे आणि स्वस्थ बसणे म्हणजे स्वत:वर एक मानसिक गुलामगिरी ओढावून घेणे नव्हे काय..?     स्वत: बाबासाहेबांनी असल्या व्यक्तिपूजेची घोर निंदा करून त्याला समाजासाठी व देशासाठी घातक म्हंटले आहे.

       आश्विन/ कार्तिक अमावस्येला जर बौद्ध उपासक आपल्या घरी  "दीपदानोत्सव" च्या नावाखाली दीप प्रज्वलन करून तथागत बुद्ध, प्रियदर्शी सम्राट अशोक, बोधिसत्व बाबासाहब यांच्या प्रतिमांवर श्रद्धासुमनें अर्पित करत असेल, त्रिशरण- पंचशील ग्रहण करीत असेल, दीपमालाने आपले घर परीसर प्रकाशित करत असेल आणि इतरांनाही तसे करण्यास प्रेरित करित असेल तर त्यात गैर काय आहे..?  असे केल्याने बौद्ध धम्म बुडतो, किंवा ती व्यक्ती बौद्ध रहात नाही.. हिंदू बनते.... असा जर आपला समज होत असेल तर आपण त्यासाठी स्वतंत्र आहात. मात्र आपल्या व्यक्ति स्वातंत्र्याएवढेच महत्वाचे इतरांचेही व्यक्ती स्वातंत्र्य असते... निदान हे तरी आपण स्वीकारावे..

 अत्त दीपो भव....! 

 शुभेच्छा सह सप्रेम जयभीम.. 

महेन्द्र ज. राऊत 

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

  1. हा इतिहास मला तर माहित च न्हवता आपण जो इतिहास लिहिला आहे तो आज मला समाजला आपला मी खूप आभारी आहे
    सप्रेम जयभीम नमो बुध्दाय

    उत्तर द्याहटवा

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com