बाबासाहेबांच्या चरित्र लेखणाच्या अनुषंगाने जे नवीन संशोधन होत आहे,
त्याबबद्दल आपण जागरूक असायला हवे...
डॉ. धनंजय कीर लिहितात की 'आंबेडकर गुरुजींनी भीमासाठी आणखी एक संस्मरणीय अशी गोष्ट केली. भीमाचे आडनाव आंबडवेकर हे आडनीड होते; म्हणून त्यांनी आपले आंबेडकर हे सुटसुटीत नाव लावावे असे एकदा आंबेडकर गुरुजीनी भीमाला सांगितले. लागलीच शाळेच्या दप्तरामध्ये तशी त्यांनी नोंदही करुन टाकली." (डॉ. बाबासाहेब आंबेडकर-धनंजय कीर. ४ थी आवृत्ती पृ. २०) कीर यानी या गुरुजींबद्दल विशेष तपशील दिला नाही. चां. भ. खैरमोडे यांनी ही तसेच केले म्हणून मी या गुरुजींचा शोध घेतला. आता माझे शोध कार्य संपले असून मला प्राप्त झालेला तपशील सर्व पुराव्यांनिशी देत आहे. तो असा आंबेडकर गुरुजींचे आंबेडकर हे आडनांव मु. आंबेड (खुर्द) ता.संगमेश्वर जिल्हा-रात्नागिरी या गांवावरुन असून त्यांचे मूळ आडनांव मुळये हे आहे..
१९८३ साली माझी बदली बँक ऑफ इंडिया, साटविली शाखा, ता. लांजा येथे झाली. तेथील माझ्या चांगल्या कामगिरीमुळे १९८५ साली मुंबई-गोवा महामार्गावरील संगमेश्वर या शाखेत बदली झाली. या संगमेश्वर शाखेच्या कार्यक्षेत्रात मु. आंबेड (बुद्रुक) व आंबेड (खुर्द) ही दोन गावे होती. महाराष्ट्रात एकाच नावांची अनेक गावे असल्यामुळे आणि या गावांतील लोकांचे आडनाव मुळये असल्यामुळे त्या गावाचा बाबासाहेबांचे गुरुजी असलेल्या आंबेडकर •गुरुजींचा काही संबंध नसावा असे मी गृहीत धरले. परंतु आंबेडकर गुरुजींचा शोध सुरुच राहिला. सातारा-सांगली परिसरात एखादे आंबेड गाव आहे का याचा शोध घेत असताना त्या नावाचे एकही गाव वा वाडी सापडली नाही म्हणून मी भारतीय बौध्द महासभेचे माझे सहकारी ज. भा. कदम यांची मदत घेतली. त्यांनी माझ्या सांगण्यानुसार आंबेड गाव गाठले. तेथे त्यांनी अनेकांच्या भेटी घेतल्या. परंतु आंबेडकर गुरुजींचा थांगपत्ता लागेना. नयन मुळये नावाचे एक गृहस्थ भेटले. त्यांनी आंबेडकर गुरुजी हे आमच्याच आंबेडचे होते असे सांगितले जाते असे सांगितले. परंतु शंभर-सव्वाशे आधी त्यांनी गाव सोडले, परंतु ते कधी आलेच नाहीत. त्यामुळे त्यांचे कोण वशंज आहेत हे सांगू शकले नाहीत. परंतु भारतीय घटनाकारांचे शिक्षक असल्याबध्दल आम्हाला अभिमान वाटतो हे सांगितले. बाबासाहेबांना सुध्दा आंबेडकर गुरुजींचा अभिमान वाटत होता. आदर वाटत होता. जाती प्रथेच्या कडक उन्हाळ्यात गुरुजींचे प्रेम हे त्याना हिरवळीसारखे सुखद वाटत होते. बाबासाहेब गोलमेज परिषदेला जात आहेत हे गुरुजीना कळल्यावर त्यांचे काळीज सूपा एवढे झाले आणि ते स्वत:हून आपल्या या विद्यार्थ्याचे कौतुक करायला मुंबईला आले. बाबासाहेबानी आपल्या जागेवरुन उठून गुरुजीना मिठी मारली. त्यांचा यथोचित सन्मान केला, पुन्हा भेटू असा आशावाद जोपासला परंतु तो यशस्वी झाला नाही. १९३१ साली ही भेट झाली अन् १९३४ साली त्यांचे निधन झाले. साताऱ्यात असताना साताऱ्याचे टिळक म्हणून ज्याना ओळखले जायचे. हे सातारी टिळक पुणेरी टिळकांच्या पुण्यात स्थायिक झाले होते. पण पुण्यात आंबेडकर कुटुंब कोठे राहते हे माहित नव्हते.
पुण्याचे ‘सिम्बायोसिस.’ डॉ. एस्.एस्. मुझुमदार हे त्याचे प्रमुख. डॉ. माईसाहेब आंबेडकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मिळालेलं 'भारतरत्न' चे मानचिन्ह 'सिम्बायोसिस' कडे ठेवल्याचे वर्तमानपत्राद्वरे कळले. त्यांच्याकडे बाबासाहेबांच्या इतर साहित्या बरोबरच आंबेडकर गुरुजींचं छायाचित्र असल्याचे कळले. याच दरम्यान आंबेडकरी साहित्याचे अभ्यासक सुहास सोनावणे यांचा 'चित्रलेखा' या अंकाच्या ८.१२.१९९७ मध्ये लेख प्रसिध्द झाला. त्यात गुरुजींच्या चित्रासंदर्भात विजय सुरवाडे यांचा संदर्भ मिळाला. मुझुमदारांच्या पत्नी या सातारच्याच असल्यामुळे त्यांनी बराच शोध घेतला आणि गुरुर्जीचे नातू रमेशचंद्र आंबेडकर पर्यंत पोहोचल्या.नातू रमेशचंद्र यांनीच आजोबांचा फोटो दिल्यामुळे विश्वासार्हतेचा प्रश्न मिटला. गुरुजींच्या मुलांची, नातवांची नावे कळली परंतु त्यांचे पत्ते मिळत नव्हते अखेर मी केशव वाघमारे यांची मदत घेतली. त्यांना 'सिम्बायोसिस' कडे पुन्हा पुन्हा जायला सांगितले. अखेर अनुराग आंबेडकर हे नाव कळले. त्यांचा पूर्ण पत्ता मिळाला नाही. परंतु त्यांना अर्धवट पत्यावर पत्र पाठविले. ते पत्र त्यांच्या पर्यंत पोहोचले, अनुराग यांनी आपल्या काकी अनुराधा आंबेडकर यांचा मोबाईल नंबर दिला. कारण त्या काही माहिती पुरवू शकतील असे सांगितले. मधल्या काळत माझ्या ओळखीच्या मुळये आडनाव असणाऱ्यांना आणि देवरुखे ब्राम्हण त्यांच्या समाजाचे देवार्षि नावाचे नियातकालीके चाळली. देवरुखे ब्राम्हण सहाय्यक संघ, पत्रकार जान्हवी मुळे, पत्रकार कोकजे इत्यादिना फोन करुन त्रास दिला. त्यातून अत्यंत विश्वासार्ह वृत्त मिळाले ते असे.
आंबेडकर गुरुजींच्या पूर्वजांचे मूळ गाव आहे वांदरी, ता. संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी. बाव नदीच्या काठावरील हे गाव. या गावातील देवरुखे ब्राम्हणांचे मूळ आडनांव मुळये. पेशवाईच्या काळात त्यांच्या पूर्वजांनी काही पराक्रम केल्यामुळे पेशव्यानी त्याना आंबेड या गावाची सनद दिली. ते आंबेड येथे स्थायिक झाले. आंबेडला असताना कृष्णाजी केशव तत्कालीन व्हर्नाक्यूलर म्हणजे इयत्ता ७ वी पास झाले. शिक्षक पेशासठी ही किमान पात्रता होती. त्यांनी हा पेशा स्वीकारायचे ठरविले. तेव्हा त्यांची नेमणूक सातारा येथील सॅल्वेशन आर्मी म्हाणजे लष्करी शाळेत झाली. तिथे जात-पात धर्म भेदाभेद नव्हता. केशवराव आंबेडकर आता केशवराव मुळये नव्हते. त्यामुळे कृष्णाजी सुध्दा आंबेडकर झाले. केशवराव साताऱ्यातील एका शिवमंदिरात पूजा करीत असत. अनुराधा आंबेडकर यांनी अनुराग यांना जे मी पत्र पाठविले तेच जसेच्या तसे whatsup वर पाठविले. दि.१९/०७/२०२२ रोजी पाठविलेल्या पत्राला whatsup वरच त्यांनी दि. २९/०७/२०२१ रोजी उत्तर दिले. ते अस होते. आदरणीय श्री पवार सर सन्मान पूर्वक नमस्कार -
आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे गुरु म्हणजे माझे आजे-सासरे वंदनीय कृष्णाजी केशव आंबेडकर यांचे बाबत सखोल अभ्यास कारुन त्यांचेवर समाजाला ज्ञात होईल असे लिखाण करीत आहात हे ऐकून आम्हास खूप अभिमान वाटतो की या आदर्श घरातील आपण एक भाग आहोत.
माझे चूलत सासरे नारायण कृष्णाजी आंबेडकर यांनी त्यांच्या पुतण्यालाम्हणजे कै. यशवंत दत्तात्रेय आंबेडकर याना दि. ११.२.१९८४ रोजी लिहिलेल्या पत्रात नमूद केल्या अनुषंगाने कै. कृष्णाजी केशव आंबेडकर यांची जन्मतारीख असमासे १८५५ असावी व मृत्यू दि. २२.१२.१९३४, मिती मार्गशिर्ष वद्य ३ अशी आहे. शिक्षण मराठी ७ वी पास. सातारा कँप स्कूल, सदर बाझार येथे हेड मास्तर. मा.बाबासाहेबांचे मराठी ४ थी पर्यंत शिक्षण त्या स्कूलमध्ये झाले. आजोबा म्हणजे कृष्णाजी केशव आंबेडकर यांचे हिंदी, पारशी, गुजराथी, मराठी भाषा व मोडी लिपीवर प्रभुत्व होते. त्या शाळेत आजोबा २०/२५ वर्षे हेडमास्तर होते. नंतर मिशनस्कूल सातारा येथे १०/१२ वर्षे हेड मास्तर होते. आजोबांची सर्व नोकरी ब्रिटीश कारकिर्दीत झाली. त्यांना साताऱ्याचे टिळक म्हणत असा उल्लेख आहे.
आंबेडकरांचे मूळ गाव वांद्री जि. रत्नागिरी हे आहे. आम्ही गेलो नाही पण माझे चुलत दीर सुरेश दत्तात्रेय आंबेडकर, नारायणगाव हे आणि यशवंत दत्तात्रेय आंबेडकर यांची सून नयना मूळ दैवत सोमेश्वर, वांद्री, रत्नागिरी येथे दर्शन घेऊन आलेत. ऍड. विनायक (सतीश) यशवंत आंबेडकर यांचा फोन न. ७०२१९४६*** असा आहे. त्यांच्याकडे संपर्क साधून अधिक माहिती मिळू शकते. या वयातही आपण लोक संपर्कात राहून अभ्यास व जिज्ञासा पूर्ती लेखन करीत आहात त्या साठी आपणा उभयतांना शतशः वंदन. या संदर्भात विनायक (सतीश) यशवंत आंबेडकर यांचेशी दि. ६.८.२०२१ रोजी मोबाईल नं. ७०२१९४६*** वर बोललो. त्यांनी मान्य केले की वांद्री गावच्या आमच्या पूर्वजाना आंबेड गावाचे वतन मिळाले होते आणि त्यांनी तेव्हाच आपले आडनाव आंबेडकर असे लावले. सन्मानपूर्वक मूळ आडनाव मुळ्ये हे होते. देवरूखे ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक संघ होता. त्यांचे देवार्षे" नावाचे नियतकालिक असायचे. या संघटनेतील ब्राम्हण हा शब्द गळला परंतु त्यांचे विद्यार्थी सहाय्य कार्य चालूच राहिले. अनुराधा आंबेडकर यांनी ज्या ११.२.८४ च्या पत्राचा उल्लेख केला ते हस्तलिखीत पत्र सोबत जोडले आहे. त्या मध्ये त्यांनी असा उल्लेख केला आहे की आजोबांचे बाबासाहेब हे हुशार असल्यामुळे त्यांचेवर विशेष प्रेम होते. त्यांना दशमी द्यायचे वगैरे अनेक बाबी लिहील्या आहेत. परंतु याच बरोबर बाबासाहेबांनी आजोबांना तुमचे आडनाव मी घेतो असे म्हटलेले आहे व त्यांनी प्रेमाने संमती दिली. या बाबतीत बाबासाहेबानी सांगितलेली एक आठवण अशी आहे 'आंबेडकर मास्तर आपल्या बरोबर भाजी-भाकरी बांधून आणित असत व रोज मधल्या सुटीत कधी न चूकता मला बोलावून आपल्या फराळापैकी भाजी-भाकरी मला खायला देत. अर्थातच शिवाशिव होऊ नये म्हणून ते आपली भाकरी वरुनच माझ्या हातावर टाकीत. मला सांगायला अभिमान वाटतो की त्या प्रेमाच्या भाजी-भाकरीची गोडी काही अविट असे. खरोखरच आंबेडकर मास्तरांचे माझ्यावर फार प्रेम होते. एके दिवशी त्यांनीच मला सांगितले की हे तुझे आंबडवेकर आडनाव आडनीड आहे त्या पेक्षा आंबेडकर हे माझे नाव छान आहे. हेच तू या पुढे लाव आणि कॅटलॉगमध्ये तशी नोंदही करुन टाकली. (नवयुग- १३.४.१९४७) बाबासाहेबांनी सांगितले की आंबेडकर गुरुजींनी सांगितले, एक मात्र खरे. आंबेडकर या नावाचे शिल्पकार आंबेडकरच होते. इथे एक संभवते की कीर यांनी आंबेडवेकर हे आडनाव आडनीड आहे असे म्हटले . ते आंबवडेकर नसून आंबडवेकर हे असावे. कीर यांनीच गावाचे नाव आंबवडे केले. आंबडवेकर हे आडनीड असू शकते, आंबवडेकर हे नाही. सुभेदार मेजर रामजी सकपाळ यांनी शाळेत नाव घालताना आंबडवेकर असे घातले होते. आंबवडेकर असे नव्हे.
• आंबेडकर गुरुजींच्या वारसांचा मी शोध घेतलेला आहे. त्यांनी आपले सामाजिक दायित्व पार पाडले असे ही दिसते. उदा. विनायक आंबेडकर यानी मुंबईच्या लघुवाद न्यायालयाच्या बारं रुम मध्ये लावण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे १२ फुटी तैलचित्र भेट दिले. राजीव आंबेडकर हे आय.डी.बी.आय. येथे अधिकारी होते. तेथील आंबेडकर जयंतीसाठी त्यांचा मोठा सहभाग असे. कॅ. रमेशचंद्र शंकर आंबेडकर यानी (गुरुजींचा तिसरा मुलगा शंकर) सिम्बॉयोसिसच्या डॉ. एस्.एस् मुझुमदार यांना बाबासाहेबांची हस्तलिखीते दिली शिवाय मुझुमदारांच्या पत्नी संजीवनी यांना बाबासाहेबांवर पुस्तक लिहिण्यासाठी काही कागदपत्रे पुरविली. गुरुजींचे नातेवाईक विरार व बोरीवलीला राहतात. माझा त्यांच्याशी संपर्क आहे. अनुराग वा अनुराधा हे पुण्याला रहतात. त्यानी एक नैतिक कर्तृत्व म्हणून फार जुने संदर्भ दिले. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्रकारांनी मोकळी सोडलेली जागा म्हणजे आंबेडकर गुरुजींचे मूळ गाव, सन्मानीत गाव व मूळ आडनाव ही जागा मी भरुन काढली याचे माला समाधान आहे. मी काही संशोधक नाही, तसा माझा दावा ही नाही परंतु बाबासाहेबांच्या चरित्रातल्या त्रुटी मी भरुन काढण्याचा ध्यास घेतला आहे.
- __ज. वी. पवार
- साभार : Dandge Chandramani सर
टीप : वरील लेखात आलेल्या मोबाईल क्रमांकातील शेवटची तीन अंक (मी स्वतः प्रशीक आनंद यांनी) दडवून ठेवली आहेत. कारण तो त्या व्यक्तीचा 'सार्वजनिक' मोबाईल क्रमांक नसून 'खाजगी' बाब आहे याचे आपण आंबेडकरानुयायांनी भान बाळगले पाहिजे
0 टिप्पण्या