- - ठाण्यातील विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत दिडशेहून अधिक संस्थांचा पुढाकार
- - डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात जनसत्कार सोहळा संपन्न होणार
- - मुख्यमंत्र्यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन; गौरवग्रंथाचेही होणार प्रकाशन
ठाण्याला लोकनेते एकनाथजी शिंदे यांच्या रूपात मुख्यमंत्रीपदाचा प्रथमच बहुमान मिळाला आहे. यानिमित्ताने ठाण्यातील विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असणाऱ्या सेवाभावी संस्थांच्या तर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शनिवारी, 13 ऑगस्ट रोजी भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे. डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात संपन्न होणाऱ्या या जनगौरव सोहळ्याचे नियोजन पूर्ण झाले असून शनिवारी होणाऱ्या सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सत्काराबरोबरच, त्यांची प्रकट मुलाखत, गौरवग्रंथाचे प्रकाशन, गौरवगीताचे सादरीकरण होणार आहे, तसेच सोहळ्याआधी मुख्यमंत्र्यांच्या भव्य मिरवणुकीचेही आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ‘मुख्यमंत्री जनगौरव समिती’चे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी दिली.
ठाण्यातील कला, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, वैद्यकीय, औद्योगिक आदी विविध क्षेत्रांतील दिडशेहून अधिक संस्थांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा जाहीर नागरी सत्कार करण्यात येत आहे. ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात 13 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याला ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, त्र्यंबकेश्वरच्या अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे पिठाधीश गुरुमाऊली श्री आण्णासाहेब मोरे आणि कोल्हापूरच्या कणेरी येथील सिद्धगिरी मठाचे मठाधिपती अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या सोहळ्यास ठाण्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांबरोबरच नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री उदय सामंत आणि रवींद्र चव्हाण हेही अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात येईल. या सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकट मुलाखत ज्येष्ठ माध्यमतज्ज्ञ डॉ. उदय निरगुडकर हे घेणार आहेत. तसेच मुख्यमंत्र्यांवरील गौरवग्रंथाचेही प्रकाशन यावेळी करण्यात येणार आहे. सोहळ्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानापासून कार्यक्रमस्थळापर्यंत त्यांच्या मिरवणुकीचेही आयोजन करण्यात येणार असल्याचे, जनगौरव समितीचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी सांगितले.
- असे आहे जनगौरव सोहळ्याचे स्वरूप…
- - सोहळ्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानापासून कार्यक्रमस्थळापर्यंत मिरवणूक काढण्यात येणार आहे. यात रिक्षा, मोटारसायकल ताफा आणि ढोल-ताशा पथकांचा समावेश असणार आहे.
- - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे व्यक्तिमत्त्व आणि आजवरचा प्रवास यांचे दर्शन घडवणारे कवी प्रा. अशोक बागवे लिखित आणि संगीतकार कौशल इनामदार यांनी संगीत दिलेले गौरवगीत यावेळी सादर होणार आहे.
- - विविध क्षेत्रांतील ज्येष्ठ मान्यवरांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांचा नागरी जनसत्कार करण्यात येणार असून यावेळी त्यांची प्रकट मुलाखतही घेतली जाणार आहे.
- - ठाण्यातील विविध क्षेत्रांतील अभ्यासक, कार्यकर्ते, मान्यवरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर लिहिलेल्या लेखांचा समावेश असणारा गौरवग्रंथही यावेळी प्रकाशित करण्यात येणार आहे.
- - पर्यावरणपूरकता जपत पुष्पहार-पुष्पगुच्छ यांऐवजी मुख्यमंत्र्यांना बीजहार देण्यात येणार असून त्यातील बियांची लागवड केली जाणार आहे.
- - तसेच सहभागी संस्थांकडून, व्यक्तींकडून शुभेच्छारूप पुस्तकभेट स्वीकारण्यात येणार असून ही पुस्तके ग्रामीण आणि आदिवासी भागातील शाळा व ग्रंथालयांना भेट दिली जाणार आहेत.
- - सहभागी संस्थांचे त्यांच्या क्षेत्रातील मागण्या-कार्यसूचनांचे निवेदन कार्यक्रमस्थळी स्वीकारून ते मुख्यमंत्र्यांना सुपूर्द करण्यात येणार आहे.
.....................
ठाण्याला मुख्यमंत्रीपदाचा बहुमान मिळवून दिल्याबद्दल लोकनेते एकनाथ शिंदे यांच्याप्रति प्रेम आणि अभिमान व्यक्त करण्यासाठी ठाण्यातील विविध सेवाभावी संस्थांनी एकत्र येत आयोजित केलेला हा हृद्य सोहळा आहे. तो ठाणेकरांच्या आजवरच्या परंपरेला साजेसा आणि ऐतिहासिक ठरेल, यादृष्टीने आमचे सर्व नियोजन पूर्ण झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आजवरचा प्रवास आणि त्यांनी ठाण्याच्या सर्वांगीण विकासात दिलेले अमूल्य योगदान यास मानवंदना देणे, हा या सोहळ्यामागील निखळ हेतू आहे.
- प्रा. डॉ. प्रदीप ढवळ, कार्याध्यक्ष, मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे जनगौरव समिती
बंडखोर शिवसैनिक... https://www.prajasattakjanata.page/2022/06/blog-post_85.html
0 टिप्पण्या