Top Post Ad

क्रांतिसिंह नाना पाटील., जी.डी.बापूंचे प्रतिसरकार


भारताला स्वातंत्र्य मिळून येत्या 15 ऑगष्ट 2022 रोजी75 वर्षे पूर्ण होतील.या 75 वर्षात भारत देशाने अफाट प्रगती जरी केली असली तरी अजूनही देशातील शोषण, गरीबी ,जुलूम ,गुंडागर्दी अन्याय ,अत्याचार,भ्रष्टाचार पूर्णतः संपलेला नाही हे वास्तव आहे..हे सर्व संपाव आणि लोकांनी आपलं जीवन आनंदानं जगावं यासाठीचे भव्य दिव्य स्वप्न उराशी घेऊन स्वातंत्र्यपूर्व काळात ज्या क्रांतिवीरांनी आपलं आयुष्य देशासाठी वेचले त्यातील प्रमुख क्रांतीवीर म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील.

  3 आँगष्ट -क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्मदिवस.  क्रान्तिसिंहाच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या व ज्याची ख्याती इंग्लैंड च्या संसदेपर्यंत पोहोचलेल्या सातारा प्रतिसरकारचा लढा म्हणजे स्वातंत्र चळवळीतील अक्षरशः सोनेरी पान आहे.इंग्रजांची गुलामगिरी फेकून द्या आणि स्वतंत्रपणे मुक्त स्वातंत्र्यात जगा असा मंत्र गाव खेड्यापासून देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणारा नेता म्हणून क्रांतिसिंह नाना पाटलांना ओळखले जाते.३ऑगष्ट १९०० रोजी वाळवा तालुक्यातील येडेमच्छिंद्र च्या जवळ क्रांतिवीराचा जन्म बहे येथे झाला.शेतकरी व वारकरी संप्रदाय आणि कुस्तीची परंपरा असणाऱ्या घराण्यात नाना पाटलांचा जन्म झाला. त्यामुळे त्याला साजेसे संस्कार नानांच्या वरती झाले. बालपणीच गळ्यात पंढरपूरची माळ आली आणि व्यायाम व कुस्तीची दीक्षा ही मिळाली.सातवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या या वीराने जेव्हा सत्यशोधकी जलसे पाहिले तेव्हा समाजातील दांभिकता अन्याय अत्याचाराचा पाढा समजून घेतला आणि मनात बंडखोर विचार येऊ लागले. तलाठ्याची नोकरी लागलेली असताना सुद्धा या नोकरीवर लाथ मारून महात्मा गांधीजींच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात या वीरांने स्वतःला झोकून दिलं. 1930 साली गांधीं च्या आवाहनाला प्रतिसाद देऊन असहकार चळवळीत उडी घेतली. तेव्हापासून आपल्या ग्रामीण बाज आणि ढंगाने बहरलेले पहाडी वक्तृत्व व क्रांतिकारी नेतृत्व या देशाला नाना पाटलांच्या रूपात पाहायला मिळाले.1932 साली कराडच्या जाहीर सभेत नाना पाटलांचे दीर्घ भाषण ऐकून पं.नेहरू म्हणाले होते की "आप जैसे पहलवान हमारे साथ है, तो दिल्ली अब दूर नही " 

अशा या क्रांतिवीराने आपले संपूर्ण आयुष्य देशासाठी वाहून घेतले. गाव, घरदार ,संसार साऱ्या साऱ्या गोष्टींचा त्याग केला आणि आयुष्याच्या अखेरपर्यंत फक्त देशाचा विचार केला.देशासाठी फकिरी पत्करलेला हा देशभक्त भारताच्या सर्वोच्च सभागृहात म्हणजेच संसदेत भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या विळा कणीस चिन्हावर  सातारा आणि बीड लोकसभासंघातून असे दोन वेळा प्रचंड बहुमताने निवडून गेले होते.अगदी ६ डिसेंबर १९७६ ला ते जेव्हा मरण पावले तेव्हा या क्रांतीवीराचे प्रेत आमच्या भूमीत नेणार म्हणून शेकडो लोकांचा अटीतटीचा झालेला वाद  हजारोनी पाहिला होता.येडेमच्छिंद्र,सांगली,वाळवा,हणमंतवडिये,पंढरपूर इथे नाना पाटलांचा देह नेण्याच्या मागण्या बाजूला सारुन आत्मदहनाचा इशारा देऊन क्रांतिवीर नागनाथ नायकवडी च्या माणसांनी विजय मिळवला आणि अखेर या क्रांती सिंहाचे प्रेत सांगलीतून वाळव्यात नेण्यात आले .सांगली ते वाळवा प्रेतयात्रा जाण्यासाठी तब्बल २७ तास लागले . हजारोनी या क्रांतीवीराचे अखेरचे दर्शन घेतले आणि अखेर वाळव्याच्या भूमीत हा भारतमातेचा सुपुत्र अनंतात विलीन झाला. याच वाळव्यातील त्यांच्या समाधीस्थळी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण करायला देशाचे प्रथम नागरिक , महामहीम राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील स्वतः आलेल्या होत्या.या क्रांतीवीराच्या आयुष्यातील देशासाठीची महत्वपूर्ण ठरणारी सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे त्यांनी स्थापन केलेले सातारा प्रतिसरकार .

स्वातंत्र्यलढ्याच्या अखेरच्या पर्वात 8 ऑगस्ट 1942 ला मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर महात्मा गांधींनी इंग्रजांना चले जाव चा नारा दिला आणि जनतेला करो अथवा मरो असे आवाहन केले. त्यामुळे स्वातंत्र्याचे वारे या देशात झपाट्याने वाहू लागले. बंगालमधील मिदनापुर ,उत्तर प्रदेशातील बलिया ,बिहारमधील पूर्णिया आणि महाराष्ट्रातील सातारा या जिल्ह्यामध्ये क्रांतीकारकानी प्रतिसरकारे स्थापन केली .त्यांपैकी सर्वात जास्त काळ टिकले ते म्हणजे सातारा प्रतिसरकार .सुमारे साडेतीन वर्षे या सांगली सातारा इंग्रजांचे राज्य राहिले नव्हते तर क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखालील स्वातंत्र्य योद्ध्यांचे प्रतिसरकार होते.गांधीनी ब्रिटिश सरकारला

चले जाव इशारा दिल्यानंतर गांधीजी सह अनेक नेत्यांची इंग्रजांनी धरपकड सुरु केली.तेव्हा सातारा जिल्ह्यात म्हणजे आत्ताच्या सांगली आणि सातारा भागात सर्व तालुक्यांमध्ये क्रांतीकारकांनी एका आठवड्यात 151 जाहीर सभा घेतल्या आणि त्या सभातून चलेजाव चा अर्थ लोकांना समजावून सांगितला. ठिकठिकाणी मिरवणुका काढल्या. तहसील कचेरीवर प्रचंड मोर्चे काढले.पणं ब्रिटिश सरकारनं निर्दयपणे गोळीबार करून अनेक स्वातंत्र्यवीरांना ठार केले. तेव्हा सातारा जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील भुमिगत कार्यकर्त्यांनी गुप्त बैठका घेऊन सरकारच्या विध्वंसाचा आणि लोकांच्या हिताचा कार्यक्रम आखला व तो तळागाळापर्यंत राबवला ते म्हणजे प्रतिसरकार.क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली सातारा प्रतिसरकारची स्थापना झाली होती. गांधीजींचे ग्राम राज्याचे स्वप्न साकारणं हा मुख्य हेतू प्रतिसरकार चा होता तर पोलीस गावगुंड व दरोडेखोरां पासून जनतेचे रक्षण करणे लोकाभिमुख असं समतेवर आणि सामाजिक न्यायावर आधारित आदर्श ग्रामराज्य उभारणं, ब्रिटिश सरकार हद्दपार करून देणं,कष्टकरी लोकांची सत्ता आणून नवसमाज निर्माण करणं, सशस्त्र दले उभा करणं, गाव पंचायतीमार्फत खटले चालू करून द्विभार्या प्रतिबंधक आणि दारूबंदीचा कायदा राबवणं, शिक्षणाचा सर्व थरापर्यंत प्रसार करणं यासारख्या धोरणावर हे प्रतिसरकार स्थापन झालं बी अन तसं काम केल बी होतं. 

इंग्रजांची गुलामगिरी फेकून स्वतंत्र म्हणून वावरणाऱ्या भारतीयांचं सरकार अशी नाना पाटलांची भूमिका त्याकाळी होती. नाना पाटील हे या प्रती सरकारचे प्रमुख.नाथाजी लाड हे प्रतिसरकारचे डिक्टेटर होते तर या प्रतिसरकारच्या सैन्यदलाचे म्हणजे तुफान सेनेचे फिल्डमार्शल म्हणून क्रांती अग्रणी  जी डी बापू लाड यांना नेमण्यात आले होते. हे वर्ष जी.डी.बापूंच्या जन्मशताब्दी चे वर्ष सुद्धा आहे.उत्तमराव पाटील हे खानदेशात काम पाहत होते.इथेच क्रांतीवीरांनी धुळे खजिना लुटला.सातारा प्रतिसरकार दीडशे गावात अठरा गटात विभागलेलं साडेचार वर्षे चाललंलेल जनतेच सरकार होतं. क्रांतीवीर नागनाथ नायकवडी ,बर्डे गुरूजी ,किसन अहिर ,धनवंतरी वैद्य ,दत्तोबा लोहार, किसनवीर यासारखे क्रांतिसिंह यांचे सहकारी या सरकारच्या कार्यकारी मंडळावर होते .सातारा प्रतिसरकारचे प्रचारप्रमुख म्हणून कुंडलचे क्रांती शाहीर शंकरराव निकम काम पाहत होते. 50 हजार सैनिकांच्या तुफान सेवादलात असणार्‍या स्त्री पलटणीचे प्रमुख लीलाताई पाटील होत्या.वाळवा गटात क्रांतिवीर नागनाथ नायकवडी नी सोनवडे तालुका शिराळा येथे सैनिकी प्रशिक्षणाचा तळ सुरू केला होता.नानकसिंग आणि मनसा सिंग या दोन आझाद हिंद फौजेतील पंजाबी सैनिकांना खास प्रशिक्षक म्हणून आणलं होतं.या सैनिकीतयारी शिवाय या प्रतिसरकारने न्यायदान,तुरुंग आणि प्रसिद्धी विभाग सुरू केला होता. स्वतःचे न्यायदान मंडळ असणार हे प्रतिसरकार  जमिनींचे व्यवहार, सावकारी खटले ,जमिनीच्या वाटण्या, वहिवाटीचा हक्क ,दत्तक प्रकरणी, चोर या अशा अनेक प्रकारचे खटले गावपातळीवरील न्यायदान मंडळापुढे या सरकारने चालवले.साडेचार वर्षाच्या काळात प्रतिसरकार पुढे दोन हजार खटले चालवले गेले 

त्यापैकी 1200 खटल्यांचा निर्णय दिल्याची नोंद आपल्याला इतिहासात आढळते.तुफान सेनेचे सरचिटणीस फिल्डमार्शल क्रांतीअग्रणी जी.डी.बापू लाड, कॅप्टन रामभाऊ लाड ,कॅप्टन आकाराम पवार व विविध गटातील कॅप्टन यांच्या धाकामुळे हे ग्रामराज्य चोर दरोडेखोर यांपासून सुरक्षित राहिले.सांगली सातारच्या ऐतिहासिक क्रांतीकारी मातीतून क्रांतिसिंह नाना पाटील यांनी चालवले्ल्या अन साडेचार वर्षे चाललेल्या प्रतिसरकारचा गवगवा केवळ भारतातच नाही तर इंग्लंडच्या संसदेपर्यंत पोहोचला होता. इंग्लंड मधील विरोधी पक्षाचे खासदार ब्रिटिश सरकारला प्रश्न विचारायला लागले की मुंबई इलाख्याच्या सातारा जिल्ह्यात आपले राज्य आहे का क्रांतिसिंह नाना पाटलांचे?असा हा सातारा प्रतिसरकारचा लढा रोमांचकारी आणि देशभक्तीने मंतरलेला काळ होता. या मंतरलेल्या काळातील क्रांतीवीर जवळ जवळ सर्व आपल्यातून निघून गेलेत. ज्यांनी देशासाठी सर्वस्व अर्पण केलं ते क्रांतिसिंह नाना पाटलांचे सहकारी   क्रांतीअग्रणी जी.डी.बापू लाड,क्रांतीवीर नागनाथ आण्णा,क्रॅ.रामभाऊ लाड,आकाराम पवार दादा,सदाशिव पवार,भगवानराव सव्वासे,भगवान बप्पा अशा महान माणसांना मलाभेटता आलं, बोलता आलं ,त्यांच्या सहवासात राहता आलं,त्यांच्या सोबत विविध कार्यक्रमात, आंदोलनात सहभागी होता आलं हे आम्ही आमचे भाग्य समजतो .सातारा प्रतिसरकारच्या तुफान सेनेचे फिल्डमार्शल क्रांती अग्रणी जी डी बापू लाड ,तुफान सेनेचे कॅप्टन रामचंद्र लाड भाऊ ,कॅप्टन आकाराम पवार दादा यांच्यासोबत बालपणापासून वावरलो,सतत घरी गेलो,सोबत एकत्र बसून जेवलो, त्यांच्यासोबत  विविध ठिकाणीं गेलो ,अनेक कार्यक्रम केले हे सगळं संचित खरोखरच माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय व अनमोल अशा घटना आहेत. 

प्रतिसरकारच्या सरकार मधील शेवटचा दुवा असलेले आणि शंभरीत असलेले कॅप्टन क्रांतिवीर रामचंद्र लाड भाऊ काही महिन्यापूर्वीच आपल्यातून निघून गेले .जेव्हा जेव्हा मी कँप्टन भाऊंकडे जायचो तेव्हा ते  आपल्या धारदार आवाजात तत्कालीन आठवणी सांगत असत.ऐकताना अंगावर रोमांच उमटत असायचा. मन भरून यायचं.अशा या सातारा प्रतिसरकारमधील  रोमहर्षक लढ्यातील सर्व शहिदांना व स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतीवीरांना स्वातंत्र्याच्या अम्रुतमहोत्सवी वर्षात अभिवादन पर अनेक उपक्रम  विद्रोही सांस्कृतिक चळवळ,राष्ट्र सेवा दल,आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेड ने  वर्षभर जनतेत जाऊन प्रबोधन मोहिमेच्या,मशालयात्रेच्या, बैठका,मेळावे अशा विविध प्रकारे राबवले आहेत.येणाऱ्या 8 व 9 आँगष्ट रोजी या तिन्ही चळवळीच्या वतीने जरा याद करो कुर्बानी असा नारा देत भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील शहीदांची सांगली जिल्ह्यातील असणाऱ्या हुतात्मा स्मारकांना भेटी देऊन हुतात्मा झालेल्या शहीद क्रांतीवीराच्या मातीस अभिवादन करणे साठी मोटरसायकल रँली काढली जाणार आहे.स्वातंत्र्य लढ्यातील, सातारा प्रतिसरकारच्या लढ्यातील  सर्व क्रांतिकारकांना माझे क्रांतिकारी अभिवादन. ज्या क्रांतिसिंहाच्या नेतृत्वाखाली हा लढा लढला त्या सिंहाने स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा जनतेच्या हितासाठी प्रचंड कामं केली.संयुक्त महाराष्ट्राच्या  लढ्यात क्रांतीसिहाने झोकून दिले होते..

नाना पाटील भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या तिकिटावर  सातारा व बीड मतदारसंघातून ते देशाच्या संसदेवर दोन वेळा खासदार म्हणून जेव्हा निवडून गेले होते तेव्हा हमालाच्या बैलगाडीतून  संसदेत पोचणारा,,शेतकर्याचं दुखणं पहिल्यांदा मराठीतून संसदेत मांडणार पहिला खासदार म्हणून क्रांतीसिहाची नोंद भारतीय इतिहासाने घेतली आहे.प्रतिसरकारचे सरसेनापती फिल्डमार्शल क्रांतीअग्रणी जी.डी.बापू लाड हे सुद्धा स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्र विधीमंडळात दोन वेळा आमदार होते..आज प्रतिसरकारचे संस्थापक क्रांतीसिंह नाना पाटील जयंतीच्या निमित्ताने क्रांतीसिहांच्या स्मृतीस  विनम्र अभिवादन करतो.प्रतिसरकारचे सरसेनापती नाना पाटलांचे साथी जी.डी.बापूंच्या स्मृती स,स्वातंत्र्य लढ्यातील सातारा प्रतिसरकारच्या  रोमहर्षक लढ्यातील सर्व क्रांतीवीरांच्या स्मृतीस विनम्र क्रांतिकारी अभिवादनासह लाल सलाम करतो 

कॉम्रेड मारुती शिरतोडे
वाझर तालुका खानापूर जिल्हा सांगली


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com