आशादीप क्लिनिक्स आणि डॉ.दीपक हेडे यांची चौकशी करण्याची मागणी
सविस्तर वृत्त असे की, तुकाराम दत्तू घंटे यांना बरे वाटत नसल्यामुळे ते गावातील डॉ. दीपक हेडे यांच्या आशादीप क्लिनिकमध्ये ९ जुलै रोजी सायंकाळी जवळपास ५ च्या सुमारास गेले होते. जाताना ते स्वतःच चालत गेले होते. डॉक्टरांनी तपासल्यानंतर ते नॉर्मल असल्याचे सांगितले. केवळ सलाईन लावले की ठीक होतील. असे सांगून डॉक्टरांनी रुग्णाला एक सलाईन लावली. त्यानंतर लगेच २ री सलाईन लावली. मात्र सलाईन लावल्यानंतर एका तासातच म्हणजे ६ वाजण्याच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सदर डॉक्टर हा नशेमध्ये असल्याने चुकीच्या औषधोपचाराने मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे.
डॉक्टर उपचार करत असताना ते नशेमध्ये होते. संबंधित डॉक्टरकडे कोणतीही डिग्री व परवाना नसताना ते दवाखाना चालवत असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. डॉक्टरांच्या दबाबामुळे सदर मृताचे शवविच्छेदन देखील करण्यात आले नाही. संबंधित क्लिनीक्सची सखोल चौकशी करावी. डॉक्टरवर तात्काळ कारवाई करावी अन्यथा सदर क्लिनीकसमोर उपोषण आंदोलन करण्याचा इशारा मयत तुकाराम दत्तू घंटे यांची मुलं संतोष, प्रवीण, प्रशांत, तसेच मुलगी रेश्मा यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. सदर निवेदन जिल्हाधिकारी लातूर, तसेच माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर, पोलीस अधीक्षक लातूर, जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प. लातूर व तहसीलदार निलंगा यांना पाठविल्या आहेत.
0 टिप्पण्या