अंधाराने सूर्य पाहिला तेव्हा शब्द हुंकारले,
नरकाच्या कोंडवाड्यात किती दिवस रहायचे आम्ही?
लक्तरांत गुंडाळलेली आमुची अब्रू
गोलपिठ्यावर नागवणाऱ्यांनो तुमचा ऱ्हास जवळ आलाय,
अशा शब्दांचे सुरुंग पेरत प्रस्थापित व्यवस्थेला हादरे देणारे आणि मराठी साहित्य विश्वात धरणीकंप घडवून आणणारे विद्रोही कवी-लेखक, 'दलित पँथर' या लढाऊ संघटनेचे संस्थापक आपल्या शब्दांशब्दांतून विद्रोहाचा, जातीअंताचा अंगार पेरणारे महाकवी पद्मश्री नामदेव ढसाळ अर्थात विद्रोहाचे वादळ. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शब्दकळेने, साहित्यनिर्मितीने शोषणकर्त्यांशी अखंड झुंजणा-या या महाकवीची शेवटच्या क्षणी मृत्यूशीही झुंज द्यावी लागली. मात्र ती अपयशी ठरली आणि मृत्यूने आणखी एक प्रतिभावंत साहित्यिक, विचारवंत समाजातून ओढून नेला. मायस्थेनिया ग्रेव्हिस या आजाराने ग्रस्त असताना त्याच्याशी झुंजत असतानाच त्यांना कर्करोग झाल्याचे निदान झाले. पुन्हा त्याच्याशी लढणे सुरू झाले. मात्र काळाने त्यांना हिरावून नेले.
15 फेब्रुवारी 1949 रोजी पुणे जिह्यातील एका खेडेगावात अत्यंत गरीब कुटुंबात नामदेव ढसाळ यांचा जन्म झाला. मुंबईतील गोलपीठा भागातील झोपडपट्टीत अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत त्यांचे बालपण गेले. सुरुवातीच्या काळात त्यांनी उदरनिर्वाहासाठी मुंबईत टॅक्सीही चालवली. याच काळात त्यांच्यातील एक साहित्यिक घडत गेला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर श्रध्दा असणा-या नामदेव ढसाळ यांनी साहित्याच्या माध्यमातून दलितांच्या व्यथा, वेदनांना वाचा फोडली. द पोएट ऑफ अंडरवर्ल्ड म्हणून ओळखले जाणारे ढसाळ अनियतकालिकांच्या चळवळीत आघाडीवर होते. एक प्रखर क्रांतीकारी कवी, दलित पँथरचे संस्थापक अध्यक्ष असलेल्या ढसाळ यांच्या प्रतिभेची दखल अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय सन्मानांनी घेतली गेली होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनानंतरचा काळात, म्हणजे 60 च्या दशकात दलितांवरील अन्याय-अत्याचाराने कळस गाठला होता. हा अन्याय बघून अस्वस्थ झालेल्या तरुणांपैकी नामदेव ढसाळ एक होते. पुणे जिल्ह्यातील एका खेड्यात जन्मलेल्या नामदेव यांनी वडिलांबरोबर मुंबई गाठली. कामाठीपुरातील कुबट आणि दाहक जगण्याचा अनुभव घेत असतानाच ते किशोर वयातच शब्दांचे मनोरे रचत रस्त्यावच्या चळवळीत ओढले गेले. प्रजा समाजवादी पक्षात काम करता करता पुढे दलितांवरील अन्याय-अत्याचाराच्या विरोधात जशास-तसे उत्तर देणारी संघटना त्यांच्या डोक्यात घोंघावत होती. त्यातूनच 1972 मध्ये त्यांच्या पुढाकाराने अमेरिकेतील 'ब्लॅक पँथर'च्या धर्तीवर 'दलित पँथर'ची स्थापना झाली आणि महाराष्ट्रात आणि पुढे काही वर्षांतच या संघटनेने देशभर एक वादळ उठविले. अमेरिकेतील ब्लँक पॅंथर चळवळीपासून प्रेरणा घेऊन त्यांनी या संघटनेची स्थापना केली होती. महाराष्ट्रात दलितांशी संबंधित अनेक प्रश्नावर दलित पँथरने आक्रमक आंदोलने केली. पुढे 1982 मध्ये दलित पँथरमधील नेत्यांमध्ये मतभेद होऊन पँथरमध्ये फूट पडली. काही नेते दुस-या पक्षात गेले काहींनी स्वतंत्र चूल मांडली मात्र नामदेव ढसाळ यांचे अखेरपर्यंत दलित पँथरशी नाते कायम होते.
ढसाळ यांच्याबरोबरच राजा ढाले, ज. वि. पवार, भाई संगारे, अविनाश महातेकर, लतिफ खाटिक आदी दमदार तरुणांनी आपल्या आक्रमक लेखणीने आणि वत्तृत्वाने प्रस्थापित साहित्य, संस्कृती, समाजकारण आणि राजकारणालाही धक्के द्यायला सुरुवात केली. 1970 च्या दशकातील नामदेव ढसाळ हे अशा एका विद्रोही विचार पर्वाचे शिल्पकार होते. रिपब्लिकन नेतृत्वाच्या सत्तालोलुप आणि गटबाजीच्या राजकारणाला दलित जनता कंटाळली होती. त्याच वेळी आक्रमकपणे मैदानात उतरलेल्या दलित पँथरच्या मागे दलित जनता भक्कमपणे उभी राहिली. दलित युवकांच्या लढाऊ संघटनेचे ढसाळांनी काही काळ नेतृत्व केले. परंतु पुढे ढाले यांच्याबरोबर वैचारिक वाद झाल्याने पँथरचेही अनेक गटात तुकडे झाले.दलित चळवळीला नवी दिशा देणारे ते कृतिशील नेते होते... शोषित, पीडितांच्या हक्कासाठी ते आयुष्यभर लढले... त्यांनी क्रांतीची भाषा शिकवली, ते धगधगता अंगारच होते... आमच्यासाठी ते दीपस्तंभच होते... त्यांनी खूप मोठे कार्य करून ठेवले आहे... त्यांचे हे योगदान कोणालाही विसरता येणार नाही...
नामदेव ढसाळ यांच्या पहिल्याच 'गोलपिठा' कविता संग्रहाने मराठी साहित्यात भूकंपच घडवून आणला. त्यानंतर मराठी साहित्यात आणि वेगळ्या वाटने निघालेल्या दलित साहित्यात ढसाळांच्या विद्रोही शब्दांची नक्कल करण्याची स्पर्धाच सुरू झाली. परंतु अशी नक्कल करण्रायांना त्यांच्या प्रतिभेची बरोबरी करता आली नाही. अथवा ती उंचीही गाठता आली नाही. महानगरीय जीवन आणि बोली भाषा या विषयावरील मराठीतले महत्त्वाचे लेखन त्यांनी केले. त्यांच्या साहित्यातील योगदानाची दखल घेऊन केंद्र सरकारने 1999 साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. 2004 साली त्यांना साहित्य अकादमी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
1973 मध्ये त्यांचा पहिला कवितासंग्रह 'गोलपीठा' प्रकाशित झाला. यानंतर 'मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले' (माओईस्ट विचारांवर आधारित), 'तुझी इयत्ता कंची?', 'खेळ' (शृंगारिक), आणि 'प्रियदर्शिनी' (इंदिरा गांधी यांच्या विषयीचा), या सत्तेत जीव रमत नाही, मी मारले सूर्याच्या रथाचे घोडे सात, तुझे बोट धरुन चाललो आहे, आमच्या इतिहासातील एक अपरिहार्य पात्र : प्रियदर्शिनी, गांडू बगीचा आदी कवितासंग्रह प्रसिद्ध झाले. याचबरोबर अंधार यात्रा हे नाटक लिहले. हाडकी हाडवळा, निगेटिव्ह स्पेस् या कादंबरीही लिहल्या. आंधळे शतक- मी भयंकराच्या दरवाजात उभा आहे हा निवडक कवितांचा संग्रह त्यांनी प्रसिद्ध केला होता.
साहित्य आणि नाट्य क्षेत्रातील योगदानामुळे त्यांना 2004 मध्ये साहित्य जीवन गौरव पुरस्कार, बुद्ध रोहिदास विचार गौरव पुरस्कार मिळाला होता. भारत सरकारने त्याना पद्मश्री पुरस्कार देऊनही गौरव केला होता. गोलपिठानंतर, पुढे खेळ, मूर्ख्र म्हात्रायाने डोंगर हलविले, खेळ, प्रियदर्शनी, तूही यत्ता कंची, गांडू बगीचा इत्यादी कविता संग्रहांनी मराठी साहित्यात खळबळ माजवून दिली. त्यानंतर दलित साहित्यात विद्रोहाची एक प्रचंड अशी मोठी लाटच आली आणि त्याने मराठी साहित्यालाही आपली कूस बदलायला भाग पाडले. सर्व प्रकारचे इझम आडवे पाडून त्यांच्या पुढे जाणारा एक विद्रोही कवी म्हणून ढसाळ प्रसिद्धीच्या शिखरावर गेले. अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले.
0 टिप्पण्या