Top Post Ad

मुंबई, ठाण्यासह महाराष्ट्रात 'बंद' ला समिश्र प्रतिसाद, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची बंदसाठी शहरभर संयुक्त रॅली

ठाणे -  ठाण्यात आज सकाळपासून बंदला उत्तम प्रतिसाद मिळाला. सकाळपासून परिवहन सेवेची एकही बस रस्त्यावर धावली नाही. त्यामुळे सकाळी सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले. इतर वाहनेही रस्त्यावर दिसत नसल्याने ठाणेकर प्रवाशी चांगलेच वैतागले होते. या शिवाय ठाण्यातील दुकानेही बंद होती. तर तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून केंद्र सरकारचा निषेध करत होते. पालघर जिल्ह्यात डहाणू, कासा ,तलासरी, चारोटी इत्यादी भागातही कडकडीत बंद पुकारण्यात आला आहे. . राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी थेट रस्त्यावर उतरुन नागरिकांना बंद पाळण्याचे आवाहन केले. त्यामुळे ठाणे शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. दरम्यान, नागरिकांना बंद पाळण्याचे आवाहन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने सबंध शहरभर संयुक्त रॅली काढली. या रॅलीमध्ये महापौर नरेश म्हस्के हे देखील सहभागी झाले होते. 

 राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयापासून सकाळी 9 वाजता रॅली काढण्यात आली. या रॅलीचे नेतृत्व आनंद परांजपे यांनी केले. यावेळी राष्ट्रवादीच्या महिलाध्यक्षा सुजाता घाग, युवक अध्यक्ष विक्रम खामकर, विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल्ल कांबळे, युवती अध्यक्षा पल्लवी जगताप, ओबीसी सेलचे अध्यक्ष गजानन चौधरी, सामाजिक न्याय सेलचे अध्यक्ष कैलास हावळे, व्यापारी सेलचे अध्यक्ष दीपक क्षत्रिय, लीगल सेलचे अध्यक्ष विनोद उत्तेकर, असंघटीत कामगार सेलचे अध्यक्ष राजू चापले यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. ही रॅली जांभळी नाका येथे आली असता महापौर नरेश म्हस्के, शिवसेनेचे शहर प्रमुख रमेश वैती यांच्या नेतृत्वाखाली अनेक शिवसैनिक रॅलीमध्ये सहभागी झाले. ही रॅली सबंध शहरभर फिरविण्यात आली.

 ठाण्यात ठिकठिकाणी बंद सुरू असतानाच पोलिसांनी एका रिक्षा चालकाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांशी हुज्जत घातली म्हणून रिक्षा चालकाला पोलिसांनी त्याला व्हॅनमध्ये घालून बेदम मारहाण केली. यावेळी माध्यमांना चित्रीकरण करण्यापासूनही रोखण्यात आलं. त्यामुळे या घटनेवर ठाण्यात संताप व्यक्त केला जात आहे. ठाण्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने बंद पुकारला. त्यामुळे सकाळपासूनच ठाण्यात दुकाने बंद होती. वाहतूकही तुरळक प्रमाणात सुरू होती. त्यावेळी एक रिक्षा चालक रस्त्यावर पोलिसांशी हुज्जत घालत होता. त्यामुळे पोलिसांनी या रिक्षा चालकाला पोलीस व्हॅनमध्ये टाकले आणि त्याला बेदम मारहाण केली. या घटनेची माहिती मिळताच पत्रकारांनी घटनास्थळी धाव घेऊन या घटनेचं चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी कॅमेऱ्यावर हात ठेवून हे चित्रीकरण थांबवले.

पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात बाजारपेठ व्यापारी वर्गाने बंद ठेवत उत्फुर्त प्रतिसाद दिला. तलासरी, डहाणू भागात बाजार पेठ, भाजी मार्केट कडकडीत पूर्णतः बंद ठेवण्यात आले आहेत. महाविकास आघाडीतिल शिवसेना ,काँग्रेस तसेच डाव्या आघाडीतील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्त्यानी  रस्त्यावर उतरून केंद्रातील भाजप सरकारचा निषेध करत भाजप विरोधी घोषणा दिल्या. यावेळी पालघरचे सेनेचे आमदार श्रीनिवास वणगा, तलासरी पंचायत समिती सभापती नंदकुमार हाडळ, जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती रामू पागी, माकप जिल्हा सेक्रेटरी बारक्या मांगात यांनी रस्त्यावर उतरत केंद्राचा विरोधात निषेध व्यक्त केला. वसई, विरार आणि नालासोपाऱ्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. वसई रोड रेल्वे स्टेशन परिसरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन करुन रस्ता रोको करण्याचा केला प्रयत्न. यावेळी रस्त्यावर उतरुन आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना माणिकपूर पोलिसांनी घेतले ताब्यात घेतले.

मुंबईतही आज बेस्टची वाहतूक रस्त्यावर तुरळक प्रमाणात धावत होती. बेस्ट बसेसवर दगडफेक झाल्याने बेस्ट प्रशासनानं पोलिस संरक्षणाची मागणी केली आहे. पोलीस संरक्षण मिळाले की बेस्ट सेवा पूर्ववत केली जाणार आहे. आतापर्यंत 8 बेस्ट गाड्यांची तोडफोड झाली आहे. धारावी, शिवाजी नगर, देवनार, मालवणी येथे बेस्ट बसेसची तोडफोड करण्यात आली.
प्रत्यक्षात बेस्टच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आज पहाटे धारावी, मानखुर्द, शिवाजी नगर, चारकोप, ओशिवरा, देवनार आणि इनॉर्बिट मॉलजवळ नऊ बसेसचे नुकसान झाले आहे. यामध्ये भाडेतत्त्वावर घेतलेल्या बसचाही समावेश आहे. ते म्हणाले की, बेस्ट प्रशासनाने पोलीस संरक्षणाची मागणी केली असून परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर सर्व आगारातून बसेस चालवल्या जातील. दरम्यान, सत्ताधारी पक्ष शिवसेनेशी संलग्न असलेल्या बेस्ट कामगार सेनेचे नेते सुहास सामंत यांनी रविवारी एका व्हिडिओ क्लिपमध्ये बेस्टच्या सर्व कर्मचाऱ्यांना बंदला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. बेस्ट बस आणि अनेक पारंपरिक ‘काळ्या-पिवळ्या टॅक्सी’ रस्त्यांपासून दूर असताना उपनगरीय रेल्वे स्थानकांवर लोकल ट्रेनमध्ये आणि ये-जा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होती, त्या वेळापत्रकानुसार धावत होत्या.



शहापूर मध्ये महाविकास आघाडीचा बंद यशस्वी
शहापूर - महाराष्ट्र बंद ला शहापूर तालुक्यात उस्फुर्त  प्रतिसाद मिळाला असून शहापूर सह सर्व किन्हवली, वासींद,खर्डी,कसारा या मुख्य बाजारपेठ बंद ठेवण्यात आल्या होत्या,  ठाणे जिल्हा ग्रामीणच्या वतीने शहापूर शहरात महाविकास आघाडी व मित्र पक्षांच्या वतीने रॅली काढून हत्याकांडात मृत झालेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शिवतीर्थ शहापूर येथे सभा घेण्यात आली   यावेळी आमदार दौलत दरोडा,माजी आमदार पांडुरंग बरोरा,काँग्रेसचे ठाणे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरघे, राष्ट्रवादी चे जिल्हा अध्यक्ष दशरथ तिवरे, कृषी पशुसंवर्धन सभापती संजय निमसे,याप्रसंगी शिवसेनेचे तालुका प्रमुख मारुती धिर्डे, राष्ट्रवादी चे तालुका अध्यक्ष मनोज विशे,काँग्रेसचे तालुका अध्यक्ष महेश धानके,बविआ चे तालुका अध्यक्ष योगेश हजारे,प्रहार जनशक्ती चे तालुका अध्यक्ष वसंत पानसरे,आर पी आय सेक्युलर चे केशव साबळे,राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे प्रकाश भांगरथ,विद्या वेखंडे,कॉ आत्माराम विशे,कॉ विजय विशे,उपसभापती जगन्नाथ पष्टे,कॉ संभाजी भेरे,सुभाष विशे, अपर्णा खाडे, संध्या पाटेकर,रवींद्र परटोळे,लक्ष्मण घरत,अंकुश भोईर,असिफ शेख यांच्यासह शिवसेना, राष्ट्रवादी, आय काँग्रेस ,प्रहार,भाकप, माकप, मित्र पक्षांचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


उरणमध्ये बंदला जनतेचा 100% प्रतिसाद.
 महाविकास आघाडीचे प्रमुख नेते, पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उत्तरप्रदेश घटनेचा निषेध करत उरण मध्ये कडकडीत बंद पाळला.उरण मधील विविध सामाजिक संस्था संघटना, व्यापारी संघटना,टॅक्क्षी संघटना, वाहतूक संघटना यांनी आपले दुकानें, वाहने बंद करून कडकडीत बंद पाळला.उरण शहर, उरण ग्रामीण भाग,पूर्व विभाग,द्रोणागिरी नोड विभाग आदी विभागात कडकडीत बंद पाळण्यात आला. महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी उरण बाझारपेठ, गणपती चौक, राजपाल नाका, गांधी चौक आदी ठिकाणी रॅली काढून उत्तर प्रदेश मधील लखीमपूरला शेतकऱ्यांना चिरडून मारणाऱ्या केंद्र सरकार व योगी सरकारचा निषेध केला.
एकंदरीतच उरण मध्ये बंदला जनतेचा, नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला असून हा बंद 100% यशस्वी झाला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख मनोहरशेठ भोईर,काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत,काँग्रेस रायगड जिल्हा उपाध्यक्ष -मिलिंद पाडगावकर,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जे डी जोशी,शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस मेघनाथ तांडेल या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी  दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com