Top Post Ad

शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या पाईपलाईनची दुरुस्तीसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे- जलसंपदा मंत्री

ठाणे - शहराची पाणीसमस्या सोडवण्यासाठी आधी निश्चित करण्यात आलेल्या सूत्रानुसार बारवी धरणातील 100 एमएलडी पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी ठाणे मनपा आयुक्त विपीन शर्मा यांनी केली. तर येऊरच्या पायथ्याशी असलेल्या भागांचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी वर जंगलात असलेल्या बंधारा बांधून तेथे पाणी अडवून पाणी द्यावे अशी मागणी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. त्यावर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिले. ठाणे जिल्ह्यातील जलसंपदा विभागाची आढावा बैठक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कोपर येथील सिंचन भवनात झाली. त्यावेळी पाटील यांनी ठाणे शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या पाईपलाईनची दुरुस्तीसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे. तसेच काळाची पावले ओळखून हे प्रकल्प टरशरी प्रकल्पांत रूपांतरित करून ते पाणी उद्योगासाठी वापरावे यासाठी महापालिका आयुक्तांनी प्रयत्न करावे असे निर्देश दिले.


 यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड, आमदार दौलत दरोडा, आमदार भरत गोगावले, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, जलसंपदा विभागाचे सचिव (जलसंपदा) अ. प्र. कोहिरकर, ठाणे महानगरपालिका आयुक्त बिपीन शर्मा, उल्हासनगर महापालिका आयुक्त डॉ. मंताडा राजा दयानिधी, मीरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले, कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक बसवंत स्वामी, कार्यकारी अभियंता नरेंद्र महाजन, अधीक्षक अभियंता श्री. सोनटक्के, ठाण्याचे उपविभागीय अधिकारी अविनाश शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.   भातसा, नामपाडा, पोवाले, काळू आणि शाई या धरणांच्या कामाचा आढावा घेण्यात आला. त्यासोबतच या धरणांच्या काम पुढे सरकावे यासाठी एमएमआरडीएच्या माध्यमातून त्यांना निधी उपलब्ध करून देता येणे शक्य आहे अथवा नाही याबद्दल चर्चा करण्यात आली. शहापूरचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी बाहुली धरणाच्या कामाला गती देणे व ते पूर्ण होण्यास विलंब लागणार असल्यास भातसा नदीतून उपसा करून पाणी योजना राबवण्याची परवानगी देण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला.

ठाणे जिल्ह्यातील अनेक शहरांना पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा व्हावा, यासाठी उपाय योजना सुचविण्यासाठी तसेच जिल्ह्यातील  प्रलंबित जलसंपदा प्रकल्पांच्या पाठपुराव्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचा टास्क फोर्स गठित करण्यात येत असल्याची घोषणा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज येथे केली. या टास्कफोर्सने उपाययोजना सुचविल्यानंतर मंत्रालयस्तरावर बैठक घेऊन त्याच्या अंमलबजावणीसंदर्भात निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. पाटील यांनी यावेळी जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा, मुमरी, नामपाडा, पवाळे, कुशिवली, काळू, शाई या प्रकल्पांच्या सद्य:स्थितीतील कामांचा आढावा घेतला. 

मुंबईच्या शेजारी असलेल्या पालघर व ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नागरिकरण वाढत आहे. या वाढत्या लोकसंख्येला पुरेसा पाणीपुरवठा होणे आवश्यक आहे. सध्या ठाणे जिल्ह्याला धरणातील पाणी अपुरे पडत आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या काळू व शाई प्रकल्पाच्या कामास वेग द्यावा. तसेच पुढील सन 2050 पर्यंतच्या लोकसंख्येचा विचार करून वाढती लोकसंख्या व पर्यायाने वाढत असलेली पाण्याची गरज तसेच जिल्ह्यातील ग्रामीण भागांना दिलासा देण्यासाठी कोणत्या प्रकारची पावले उचलावी लागतील याचा आराखडा तयार करावा. तसेच पिंजाळ, दमणगंगा पिंजाळ नदी जोड प्रकल्प, काळू प्रकल्प, कोंढाणे, सुसरी नदी प्रकल्प आदी प्रस्तावित प्रकल्पांची कामे सुरू करण्यासंदर्भात नियोजन करावे. जलसंपदा विभाग आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या अनेक सिंचन योजना पूर्ण होण्याला विलंब होत असल्याने त्याबाबत उपाययोजना करण्यासाठी टास्क फोर्सची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जलसंपदा, महसूल, वन विभाग, मुंबई महानगर विकास प्राधिकरण, जीवन प्राधिकरण आदीसंबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश या टास्कफोर्समध्ये करण्यात आला आहे. तसेच पाणी व पुरवठा विभागाच्या सचिवांनाही प्रलंबित प्रकल्पांसंदर्भात  सूचना केल्या असल्याचे  पाटील यांनी यावेळी सांगितले.

पाणी पुरवठ्यासाठी जिल्ह्यातील प्रकल्पांना वेग देण्याची गरज- पालकमंत्री एकनाथ शिंदे
            पालकमंत्री शिंदे म्हणाले की, ठाणे जिल्ह्यातील वाढत्या लोकसंख्येला पुरेसा पाणी पुरवठा होण्यासाठी जिल्हयातील प्रकल्पांना वेग देण्याची गरज आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील टास्क फोर्सने प्रलंबित कामांचा आढावा घेऊन येणाऱ्या अडचणी दूर कराव्यात. तसेच शहापूर व परिसरातील गावांचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना करावी. ठाणे जिल्ह्यातील महानगरपालिकानी आपल्याला हद्दीत दूषित पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी एसटीपी प्लांट सुरू केले आहेत. या प्लांटचे रूपांतर सेकंडरी प्लांट मधून टरशरी प्लांट मध्ये करण्याची सूचना यावेळी पालकमंत्री  शिंदे यांनी केली.

जलवाहिन्यांची दुरुस्ती करावी- गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड
            कळवा, मुंब्रा, नवी मुंबई यापरिसरात मोठ्या प्रमाणात डोंगर आहे. या डोंगरांवर कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधल्यास कळवा व मुंब्रा परिसरातील पाण्याचा प्रश्न मिटेल, असे गृहनिर्माण मंत्री डॉ. आव्हाड यावेळी म्हणाले. पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांची दुरुस्ती करण्यात यावी असे त्यांनी यावेळी सांगितले.

            यावेळी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी विविध प्रकल्पांचे सादरीकरण केले. श्री. सोनटक्के यांनी आभार मानले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com