!! विट !!
मिलिंद लाॅ कॅलेजच्या वसतिगृह परीसरात फेरफटका मारताना सहजच अडगळीत दृष्टीस पडलेली एक विट. जवळ जाऊन पाहिले त्यावर P E S कोरल होत.मग कळालं हि काही साधारण विट नाहीये हि आमच्या बापानं स्वतः भट्ट्या लावून हजारो वर्षांचा मागासलेपणा, जातीय अत्याचार,माणुस म्हणुन जगण्याचा कधी न मिळालेला हक्कांना भट्टीत भाजून स्वतःच्या हातानं एक एक करत रचलेल्या वंचित घटकांच्या लढ्याची, त्यांच्या शैक्षणिक क्रांतीच्या इमारतीचा पाया आहे. ती इमारत म्हणजेच 'people's Education society'
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वंचित समाजाला सतत शिकण्याची हाक दिली कारण शिक्षणामुळेच आपल्या जगण्यात आमूलाग्र बदल होऊ शकतो, हे त्यांनी जाणलं होतं.बाबासाहेबांचा शिक्षणविषयक दृष्टिकोन आधुनिक आणि व्यापक होत. बाबासाहेबांना उच्चशिक्षणाद्वारे समता, स्वातंत्र्य, बंधुभाव ही मानवी मूल्ये स्वीकारलेला एक स्वाभिमानी आधुनिक समाज निर्माण करायचा होता. ज्ञाना अभावी व्यक्ती आणि समाजाचे नुकसान जसे होते, तसेच एखादी व्यक्ती वा समूहाला शिक्षण नाकारणे म्हणजे माणूस म्हणून त्याचे अस्तित्व नाकारून त्याच्या क्षमता मारून टाकणे होय; अशी बाबासाहेबांची शिक्षण विषयक धारणा होती.
मिलिंद महाविद्यालयाच्या शिलान्यास प्रकरणी बोलताना बाबासाहेब म्हणूनच म्हणतात, ‘हिंदू समाजाच्या अगदी खालच्या थरातून आल्यामुळे शिक्षणाचे महत्त्व किती आहे हे मी जाणतो.खालच्या समाजाची उन्नती करण्याचा प्रश्न आर्थिक असल्याचे मानण्यात येते. पण हे चूक आहे. कारण भारतातील दलित समाजाची उन्नती करणे म्हणजे त्यांच्या अन्न, वस्त्र, निवाऱ्याची सोय करून पूर्वीप्रमाणे त्यांना उच्चवर्गाची सेवा करण्यास भाग पाडणे नव्हे. खालच्या वर्गाची प्रगती मारून त्यांना दुसऱ्याचे गुलाम व्हावे लागत असल्यामुळे त्यांच्यात निर्माण होणारा न्यूनगंड नाहीसा करणे, हे खरे शिक्षणाचे ध्येय आहे. आमच्या सर्व सामाजिक दुखण्यावर उच्चशिक्षण हेच एकमेव औषध आहे.’
बाबासाहेबांनी १९ जून १९५० साली औरंगाबादेत मिलिंद महाविद्यालयाच्या रूपाने मराठवाड्यात उच्चशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.बाबासाहेबांचे शैक्षणिक कार्य बघता मराठवाड्यानेच काय तर प्रत्येक वंचित घटकाने बाबासाहेबांच्या कायम ऋणात राहिले पाहिजे इतके उच्चकोटीचे आहे.निजामाच्या हैदराबाद संस्थानात शिक्षणाची प्रचंड आबाळ होत होती.शिक्षणाचा प्रसार मंद होता विद्यालय महाविद्यालयांची संख्या नगण्य होती आणि प्राथमिक शिक्षण उर्दूमध्ये होते.अनुसूचित जातींच्या मुलांची व मुलींच्या शिक्षणाची स्थिती बिकट होती. बाबासाहेबांनी अशा प्रतिकूल स्थितीत औरंगाबादेत मिलिंद महाविद्यालयाची उभारणी करून मराठवाड्याच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक जीवनात परिवर्तन घडविणारा देदीप्यमान इतिहास निर्माण केलाय.
जातिव्यवस्थेला पायदळी तुडवायचे असेल तर उच्चशिक्षण किती महत्त्वाचे आहे हे पटवून देताना बाबासाहेब म्हणतात, "समाजातील उच्चनीचता दृढमूल होण्यासाठी जातिव्यवस्था तर जबाबदारच आहे. पण जातीच्या गुणवैशिष्ट्यामुळेही तीस चिरस्थायीत्त्व मिळते. उदा. सरकारी नोकऱ्या, मामलतदारी किंवा पोलिस अधिकारी वगैरे सारख्या जागी अस्पृश्य समाजास मज्जाव आहे. अस्पृश्य समाजाची यामुळे अवहेलना होते. ही स्थिती बदलावयाची तर आपण माऱ्याच्या जागा मिळविल्या पाहिजेत व शिक्षणाशिवाय हे होणार नाही हे स्पष्ट आहे".
बाबासाहेबांनी अलीकडील शिक्षणसम्राटांप्रमाणे त्यांनी आपल्या शैक्षणिक संस्थेस स्वतःचे नाव दिले नाही. त्यांचे वडील सुभेदार रामजी आंबेडकर वा त्यांच्या आई भीमाई यांचे नावही ते आपल्या संस्थेस देऊ शकले असते. पण त्यांनी असे केले नाही. तर संस्थेस पीपल्स एज्युकेशन सोसायटी व महाविद्यालयांना सिद्धार्थ, मिलिंद ही नावे दिली. औरंगाबादच्या १५० एकर विस्तीर्ण परिसरास नागसेनवन नाव दिले. पीपल्स, सिद्धार्थ, मिलिंद, नागसेन ही नावे लोकशाही, विचारस्वातंत्र्य, चिकित्सा व प्रामाणिक बौद्धिक वादविवादाची प्रतीके आहेत.
महत्त्वाचं म्हणजे तिथे शिक्षण घेत असलेल्या मित्रांशी चर्चा करताना एक गोष्ट जाणवली की तिथे कोणत्याही इतर समाजाचा विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येवो त्याला आंबेडकरी चळवळीच खरं रूप कळत.परत जाताना बाबासाहेब आणि त्यांच्या कार्याची महानता अंगी साठवूनच बाहेर पडतो.तो कधीच बाबासाहेब आंबेडकरांचा द्वेष करताना दिसणार नाही.
फॅड्री सिनेमात जसा झब्या जाती व्यवस्थेवर दगड भिरकावतो तशीच हि वीट आहे जी बाबासाहेबांनी जाती व्यवस्थेचा कणा मोडण्यासाठी आपल्या समाजाला उच्चशिक्षण घेऊन शासनकर्ती जमात बनवण्यासाठी हाती उचलली होती.
ती विट बघताना आम्ही सगळे भावुक झाले होतो
गर्वाने उर भरून आला अन् आपसुकच डोळे पाणावले होते.
वंचितांचे मुक्ति दाते परमपुज्य विश्वरत्न डाॅ. डाबाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी वंदन
- राहूल कांबळे
0 टिप्पण्या