शाळा सुरू करण्याच्या पार्श्वभूमीवर साफसफाई व स्थापत्य कामे तात्काळ करण्याचे आदेश

  
ठाणे : शासनाच्या आदेशानुसार 4 ऑक्टोबरपासून ठाणे शहरातील इयत्ता 8 वी ते 10 वीच्या शाळा सुरू करण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर आज महापौर नरेश म्हस्के व शिक्षण समिती सभापती योगेश जानकर यांनी  ठाणे महापालिकेतील शिक्षण विभागासमवेत बैठक घेवून शाळांची साफसफाई, रंगरंगोटी व सर्व शाळांची पाहणी करुन आवश्यक ती स्थापत्य कामे तात्काळ करुन घेण्याचे आदेश सर्व संबंधित विभागाला दिले. या बैठकीस सभागृह नेते अशोक वैती, शिक्षण समिती सभापती योगेश जानकर, उपमहापौर पल्लवी कदम,  अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, उपायुक्त मनिष जोशी, नगरअभियंता अर्जुन अहिरे, शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, गटअधिकारी संगीता बामणे, अस्लम कुंगळे, नियंत्रक प्रकाश बावीस्कर, चेतन देवरे आदी उपस्थित होते.

          कोरोनाच्या महामारीमुळे गेल्या दीड वर्षाहून अधिक काळ शाळा बंद आहेत.  शासनाच्या आदेशानुसार 4 ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. ठाणे शहरात आठवी ते दहावी या इयत्तांचे ठामपा शाळांचे एकूण 7,674 विद्यार्थी तर सर्व खाजगी शाळांचे मिळून एकूण 1 लाख 21 हजार इतके विद्यार्थी आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शहरातील सर्व शाळांची साफसफाई प्राधान्याने करुन घेणे अत्यावश्यक आहे. शाळांमधील पिण्याच्या पाण्याच्या टाक्या अत्याधुनिक पदधतीने साफ करुन घ्याव्यात. सर्व शाळांमध्ये सॅनिटायरची फवारणी शाळेची रंगरंगोटी व इतर स्थापत्य कामे तात्काळ करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. तसेच शाळा सुरू झाल्यावर सर्व विद्यार्थ्याचे स्क्रिनींग, मास्क यावर प्राधान्याने लक्ष देण्यात यावे. तसेच एखादा विद्यार्थी आजारी असल्यास तात्काळ त्याच्या पालकांशी संपर्क साधून जवळच्या आरोग्यकेंद्रावर त्याची तपासणी करण्याबाबतच्या सूचनाही शिक्षण विभागाला दिल्या आहेत. 

सर्व शिक्षकांनी लसीकरण करुन घेतले आहे का, याबाबतची चौकशी करुन ज्या शिक्षकांनी अद्याप लसीकरण करुन घेतले नसेल त्यांना तातडीने लसीकरण करुन घेणेबाबत सूचना द्याव्यात असे शिक्षण समिती सभापती योगेश जानकर यांनी यावेळी नमूद केले.   गेले अनेक  दिवस प्रत्यक्ष शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत आहेत.  यापुढे शिक्षकांनी विद्यार्थ्याची मानसिकता समजून घेवून त्यांना शिकविणे गरजेचे आहे, यासाठी सर्व शिक्षकांसाठी एक दिवसाचे समुपदेशनपर चर्चासत्र घेण्याचे आदेश महापौर नरेश म्हस्के यांनी शिक्षण विभागाला दिले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या