कारवाई दरम्यान जीवघेणा हल्ला, सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांची दोन बोटे तुटली

अनधिकृत पध्दतीने रस्त्यावर विक्री करणार्या बेकायदा फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या ठाणे पालिकेच्या माजिवडा मानपाडा प्रभाग समितीच्या साहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर फेरीवाल्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात पिंपळे यांची दोन बोटे तुटली असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  घोडबंदर रोड येथील कासारवडवली परिसरात कल्पिता पिंपळे आज सायंकाळी पथकासह फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी या कारवाईला विरोध करणाऱ्या यादव या फेरीवाल्याने त्याच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात पिंपळे यांची दोन बोटे तुटली तर त्यांच्या सुरक्षा रक्षकाचेही एक बोट तुटले. या दोघांवर घोडबंदर रोड येथील वेदांत रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत फेरीवाल्याला ताब्यात घेतले आहे.


    अतिक्रमण विरोधी पथकामार्फत प्रभाग समितीनिहाय अनधिकृत फेरीवाले, हातगाड्यांवर धडक कारवाई सुरु असून आज हातगाड्या तसेच अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली.  मुंब्रा प्रभाग समितीमधील स्टेशन रोड परिसर व गुलाब पार्क, तनवर नगर नाका व कौसा परिसरातील  फेरीवाले हटविण्यात आले.  तसेच १३ हातगाड्या जप्त करून जेसीबीच्या सहाय्याने तोडण्यात आल्या. उथळसर प्रभाग  समितीमधील सिंघ नगर, सिद्धेश्वर तलाव व  कोलबाड तसेच नौपाडा कोपरी प्रभाग समितीमधील अनधिकृत फेरीवाले व हातगाड्यांवर धडक कारवाई करण्यात आली.  कळवा प्रभाग समितीमधील कुंभारआळी येथील राज वाईन्सच्या पाठीमागे ओम मयुरेश सोसायटीच्या  तळ अधिक ८ मजली अनधिकृत इमारतीच्या आठव्या मजल्याचे स्लॅब व अंतर्गत भिंती निष्कासित करण्यात आल्या.

         ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे, फेरीवाले तसेच हातगाड्यांवर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिल्यानंतर सदर निष्कासनाची कारवाई अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाच्या उप आयुक्त अश्विनी वाघमळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त सागर साळुंखे, शंकर पाटोळे आणि महेश आहेर यांनी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि पोलीस यांच्या साहाय्याने केली.


  


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA