दहीहंडीवरून शिवसेनेची कोंडी

 

  मुंबई  : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दहीहंडीच्या परवानगीच्या मुद्द्यावरून शिवसेनेची मुंबई-ठाण्यात कोंडी केली आहे. दहीहंडीचा राजकीय लाभ उठवण्याच्या तयारीत सर्वच पक्ष आजपर्यंत अग्रेसर होते. मात्र सत्ता हाती असल्यामुळे शिवसेनेने हा मुद्दा आता बाजूला ठेवला असला तरी कोणत्याही परिस्थितीत   दहीहंडी  साजरी करणारच, असे सांगून मनसे नेते शिवसैनिकांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करत आहेत.  सत्ताधारी शिवसेनेचे नेते एकीकडे आणि शिवसैनिक दुसरीकडे अशी अवस्था करून ठेवण्याचा मनसेचा मनसूबा आहे. यासाठी मनसेने हिंदुत्वाचा नारा दिला आहे.

राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या बरोबर सत्तेचा पाट लावून शिवसेनेने सोडून दिलेले हिंदुत्व आता मनसेच्या दहीहंडीतून प्रकटणार असल्याची चर्चा ठाण्यात रंगली आहे.  मनसेने दहीहंडी कोणत्याही परिस्थितीत साजरी करायचीच असा निर्धार केला आहे. ठाण्यापासून मुंबईपर्यंतच्या सर्व पट्ट्यामध्ये मनसेने आक्रमकरित्या दहीहंडीचे बॅनर्स लावून आपले इरादे स्पष्ट केले आहेत. शिवसेनेने आपल्या पक्षाची दहीहंडी सत्तेवर डोळा ठेवून रद्द केली. आपल्याच पक्षाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दहीहंडी सोहळा साजरा न करण्याचे आवाहन केल्यानंतर शिवसैनिकांना दुसरे गत्यंतर उरले नाही. नेमका शिवसैनिकांच्या याच मानसिक कोंडीचा फायदा मनसेने उचलला आहे. शिवसैनिकांना अधिकृतरित्या शिवसेना पक्षाच्या बॅनरखाली दहीहंडी साजरी करता येणार नाही, हे मनसे कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळेच शिवसेनेने हिंदुत्व सोडल्याचा जोरदार प्रचार मनसेचे नेते करत आहेत. शिवसेनेनेही सोडलेले हिंदुत्व आता आपणच पुढे नेहू असा संदेश मनसेचे नेते यातून देत आहेत.

अमेय खोपकर, अविनाश जाधव,  मंगेश देसाई हे ठाण्या-मुंबईतले नेते यात आघाडीवर आहेत. केवळ शिवसेना सत्तेवर असल्याने अधिकृतरित्या शिवसैनिक दहीहंडी साजरी करू शकणार नाहीत पण मनसेच्या कार्यक्रमांमध्ये मात्र ते शिवसेनेचे झेंडे बाजूला ठेवून सहभागी होऊ शकतात. अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.  शिवसेना आज जरी राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्याबरोबर सत्तेत असली तरी आपले मूळचे हिंदुत्व इतक्या सहज सोडू शकणार नाही आणि ते सोडले तर ते आयते मनसेच्या हातात पडू शकते, याची शिवसेना नेतृत्वाला नसली तरी शिवसैनिकांना पक्की जाणीव आहे.

 त्यामुळेच मनसेने आपले राजकीय आकर्षण वाढविण्यासाठी दहीहंडी सणाचा वापर हिंदुत्व ठसविण्याचा दृष्टीने करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिसांचे दडपण आले तरी किंवा मनसेच्या नेत्यांना अटक केली तरी दहीहंडी कोणत्याही प्रकारे साजरी केल्याचा मनसेला राजकीय फायदा होणार आहे. हा त्या पक्षाच्या नेत्यांचा होरा आहे आणि त्यातूनच एकीकडे शिवसेनेची कोंडी करून दुसरीकडे दहीहंडीच्या निमित्ताने आपल्या पक्षवाढीचा विचार मनसेने केला असल्याची चर्चा  रंगली आहे.

ठाणे:  मनसेने दहीहंडी करिता नौपाडा येथील भगवती मैदानात स्टेज बांधला होता. तसेच मनसेचे नेते अविशान जाधव यांच्या नेतृत्वाखाली मनसैनिकांनी ठिय्या आंदोलनसह आमरण उपोषण सुरू केलं होतं. याबाबत पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी यांनी घटनास्थळी जावून अविनाश जाधव यांना समजावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध नोंदवला. अविनाश जाधव यांना जरी ताब्यात घेतलं असल तरी मनसेकडून ठाण्यात दहीहंडी साजरी करणारच, असं मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले. एकतर दहीहंडी होईल किंवा मनसैनिक जेलमध्ये जातील. कोणाकोणाला जेलमध्ये टाकताय त्यांना टाका असं आव्हान मनसेकडून देण्यात आलं. नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा असो किंवा शिवसेनेने केलेली आंदोलन असो त्यावेळी कोरोना कुठे गेला होता? शिवसैनिकांना कोरोना होत नाही का? 

कोव्हिडच्या नियमांचे उल्लंघन करत दहीहंडी साजरी करण्यासाठी मनसे कार्यकर्त्यांची तयारी सुरू होती, असं पोलिसांकडून सांगण्यात येतं. तर आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. दहीहंडी साजरी होणारच. आम्ही कायदा हातात घेतला नाही. आम्हाला नियम द्या, आम्ही नियमांचं पालन करून दहीहंडी साजरी करायला तयार आहोत, - अविनाश जाधव

दहीहंडी उत्सवावर जरी सरकारने निर्बंध घातले असले तरी मनसेकडून आयोजित करण्यात आलेला दहीहंडी उत्सव आम्ही साजरा करणारच अशी भूमिका मनसेने घेतली आहे. मनसेने अगदी मोजक्याच ठिकाणी योग्य ती काळजी घेऊन हे आयोजन केलेलं होत. मात्र मुख्यमंत्री फक्त हिंदू सणांवर निर्बंध घालतात. त्यापेक्षा उपाययोजना केल्या असत्या तर बरं झालं असत - संदीप देशपांडे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA