सुजल सलाम तूझ्या जिद्दीला आणि प्रामाणिकपणाला!

    दि. २२-०७-२०२१ व २३-०७-२०२१ रोजी कोकणात झालेल्या अतिवृष्टीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील मु. पोसरे, खेड येथील डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या बौद्धवाडीवर दरड कोसळून १३ बंधुभगिनींना जीव गमवावा लागला. त्या दूर्घटनेतून वाचलेले कु. सुजल वसंत मोहिते व राणी वसंत मोहिते या भावंडांचे संपूर्ण कुटुंब काळाच्या पडद्याआड गेले. एवढ्या मोठ्या दु:खातून स्वतःला सावरत आता आपणच आपले भवितव्य ठरवायचे आणि त्यासाठी शिक्षण घ्यावेच लागेल याची जाणीव झाली पण दरडीखाली सर्वस्व गेले असल्याने पुढे काय याची चिंता त्याने भेट देणाऱ्या अनेकांना बोलून दाखवली. आम्ही रविवार दि०८-०८-२०२१ रोजी कु. सुजल याची मु. अलोरे, चिपळूण येथे भेट घेतली तेव्हा तेथील समाजसेवक मा. रविंद्र कांबळे यांनी सदर बाब आमच्या स्वतंत्र म्युनिसिपल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य या कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या कानावर घातली. 

आम्हा सर्वांना त्याची समस्या जेव्हा कळली तेव्हा आमच्या संघटनेच्या वतीने आमच्याजवळ तात्काळ उपलब्ध असणारी आर्थिक मदत स्वतंत्र मजदूर युनियनचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष  सागर तायडे आणि स्वतंत्र म्युनिसिपल कामगार युनियन चे केंद्रीय अध्यक्ष श्री. गितेश सरिता गंगाराम पवार यांच्या हस्ते देण्यात आली. सदर वेळी स्वतंत्र म्युनिसिपल कामगार युनियन राज्य कार्याध्यक्ष . रणधीर आल्हाट, राज्य सरचिटणीस .रविंद्र सुर्यवंशी, राज्य कोषाध्यक्ष श्री. कालिदास रोटे, राज्य कार्यालयीन सचिव . निलेश नांदावडेकर, राज्य सहसचिव. नरेंद्र पवार हे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थित सर्व पदाधिकारी यांनी केलेल्या सुचनेनुसार दुसऱ्याच दिवशी म्हणजे सोमवार दि. ०९-०८-२०२१ रोजी सकाळी कु.सुजल ने चुलत भावाबरोबर बाजारात जाऊन त्याला भेट देणाऱ्या अन्य व्यक्तींनी केलेल्या आर्थिक मदतीतून ऑनलाईन शिक्षणासाठी नवीन मोबाईल घेतला आणि त्या मोबाईल सहित बिलाचाही फोटो पाठवून आपल्या प्रामाणिकपणाचा प्रत्यय आणून दिला.

 सुजल तूझ्या भावी शिक्षणासाठी तसेच वाटचालीसाठी स्वतंत्र म्युनिसिपल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य या कामगार संघटनेच्या वतीने हार्दिक व मंगलमय सदिच्छा! कु. सुजल वसंत मोहिते याला शिक्षणाकरता मदत केलेल्या परंतु आमच्यासाठी अज्ञात असणाऱ्या समाज बांधवांचे स्वतंत्र म्युनिसिपल कामगार युनियन, महाराष्ट्र राज्य या कामगार संघटनेच्या वतीने मनःपूर्वक आभार! तसेच कु. सुजल वसंत मोहिते व कु. राणी वसंत मोहिते ह्या भावंडांच्या शिक्षणासाठी मदत करण्याचे आव्हान आम्ही समस्त महाराष्ट्र राज्यातील जनतेला करतो. तसेच ज्यांना मदत करण्याची इच्छा असेल अशांनी स्वतंत्र म्युनिसिपल कामगार युनियन ह्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना तसेच चिपळूण तालुक्यातील समाजसेवक मा.रविंद्र कांबळे यांना संपर्क साधू शकता किंवा प्रत्येक्षात मु.पोसरे, खेड ह्या ठिकाणी परिस्थितीची माहिती घेऊन नंतर पोसरे बौद्ध वाडीतील लोकांची व्यवस्था केलेल्या चिपळूण तालुक्यातील मु.अलोरे ह्या ठिकाणी असलेल्या सरकारी इमारती मध्ये कु.सुजल मोहिते ची भेट घेऊन त्याला आर्थिक सहकार्य करावे असे नरेंद्र पवार, (राज्य सह सचिव) स्वतंत्र म्युनिसिपल कामगार युनियन  ९७६८८८७२०९ यांनी जाहीर आवाहन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या