सहाय्यक आयुक्त प्रणाली घोंगे यांच्या बदलीमागे राजकीय दबाव

 ठाणे - कोरोना महामारीत लावण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फायदा घेत ठाणे महानगर पालिकेच्या हद्दीत अनधिकृत  बांधकाम मोठ्या प्रमाणात झाले. सहा-सहा महिन्यात आठ-आठ मजली अनधिकृत टॉवर उभे रहात होते. कळवा प्रभाग समितीमध्ये सहाय्यक आयुक्त म्हणून प्रणाली घोंगे यांनी स्विकारल्यानंतर त्यांनी मोठ्या प्रमाणात घडक कारवाई करण्यास सुरूवात केली. आधी वर्तकनगर  प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त प्रणाली 'घोंगे यांना कळवा प्रभाग समितीचा कार्यभार स्विकारल्यानंतर अनेक बांधकामांवर कारवाई केली. त्यांच्या या कारवाईने ठाण्यातील राजकीय वरदहस्त असलेल्या बांधकामधारकांचे धाबे दणाणले. व त्यांनी  अखेर त्यांच्या बदलीसाठी प्रयत्न केलें असल्याची चर्चा ठाण्यात रंगली आहे. 

  या कारवाईमुळे महापालिका प्रशासनच अनधिकृत बांधकामांना पाठबळ देत असल्याचे बोलले जात आहे.  प्रणाली घोंगे यांच्या बदलीमुळे कळवा परिसरात बेकायदा बांधकामे उभारणाऱ्या माफियांना आता मोकळीक मिळाली आहे. त्यामुळे या भागात अनधिकृत बांधकामांचे इमले उभारले जातील.  अनधिकृत बांधकामांच्या पाठिशी राहणाऱ्या काही विशिष्ट नेत्यांच्या प्रभावाखाली महापालिका आयुक्तांकडून राजकीय अजेंडा राबविला जात आहे. या राजकीय नेत्यांच्या दबावापोटी आयुक्तांनी घोंगे यांची बदली केली, असा घणाघाती आरोप नगरसेवक संजय वाघुले यांनी केला आहे. 

घोलाईनगर येथील दरड दुर्घटनेनंतर अनधिकृत बांधकामांविरोधात वेगाने कारवाई करण्यासाठी कळवा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्तपदी प्रणाली घोंगे यांची नियुक्ती झाली होती. हितसंबंध दुखावलेल्या राजकीय नेत्यांच्या दबावामुळे प्रणाली घोंगे यांची अवघ्या महिनाभरातच बदली करण्यात आली. सहायक आयुक्तपदावर नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याला किमान दोन वर्षांचा कार्यकाळ दिला जातो. मात्र, आयुक्तांनी राजकीय दबावापोटी घोंगेंची बदली केली. तर सहायक आयुक्तपदाचा कार्यभार शंकर पाटोळे यांच्याकडे सोपविला. यापूर्वीही पाटोळे यांच्याकडे कळवा प्रभाग समितीची सुत्रे होती. त्यावेळीही मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे झाली होती. अशा परिस्थितीत अनधिकृत बांधकामे रोखणार कोण? असा सवाल संजय वाघुले यांनी केला आहे. 

पाटोळेंकडे एकाच वेळी  तीन कार्यभाराची `किमया'
महापालिकेच्या परिमंडळ २ च्या उपायुक्तपदाचा कार्यभार सहायक आयुक्त शंकर पाटोळे यांच्याकडे आहे. नौपाडा प्रभाग समितीचे सहायक आयुक्तपदी त्यांच्याकडेच आहे. नौपाडा परिसरातील नागरिकांना ते कधीही कार्यालयात भेटत नाहीत. या दोन पदांबरोबरच आता कळवा येथील सहायक आयुक्तपदाचा कार्यभारही सोपविला गेला. त्यामुळे एकाच अधिकाऱ्याकडे तीन पदांचा कार्यभार ठेवण्याची `किमया' महापालिका प्रशासनाने केली आहे. त्यामागील इंगित काय? प्रशासनाच्या दृष्टिकोनातून इतर अधिकारी अकार्यक्षम आहेत का? असा सवाल ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी केला आहे.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या