ये आझादी झुठी है, देश की जनता भूखी है

१५ ऑगस्ट रोजी भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाले आणि १६ ऑगस्टला ये आझादी झुठी है, देश की जनता भूखी है म्हणत या स्वातंत्र्यांविरोधात अण्णा भाऊ साठे यांनी मोर्चा काढला.  त्या साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची आज जयंती. 

  अण्णा भाऊ साठे यांचा जन्म वाटेगाव या छोट्याशा खेड्यात झाला. घरच्या गरीब परिस्थितीमुळे अण्णा भाऊंना फारसे शिक्षण घेता आले नाही. परंतु कुशाग्र बुद्धिमत्ता असलेल्या अण्णा भाऊंच्या जीवनात शिक्षण ही अडचण ठरली नाही. म्हणूनच त्यांनी उत्कृष्ट दर्जाचे साहित्य समाजाला अर्पण केले. मराठीतील एक प्रतिभावंत साहित्यिक म्हणून अण्णा भाऊ सार्या महाराष्ट्राला परिचित होऊन रशियापर्यंत पोहचलेले आहेत. त्यांनी अनेक कथा, कादंबर्या, काव्य, तमाशे, लावण्या व पोवाडे लिहिले. आपल्या साहित्यातून अनेक सामाजिक विषयांना वाचा फेडण्याचे काम केले. `फकिरा'सारख्या कादंबरीतून त्यांनी समाजाच्या वेदना, अन्याय, अत्याचार व भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध लढा देणारा नायक उभा केला. मातंग समाजाच्या वेदना शासन व समाज व्यवस्थेपुढे आणण्याचे काम अण्णा भाऊंनी केले. 

आपल्या साहित्यातून गरीब, शोषित, कष्टकरी महिला व वंचित घटकांच्या व्यथा मांडल्या. असे असताना मातंग समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, राजकीय व आर्थिक जडणघडणीचा विचार केल्यास हा समाज स्वातंत्र्यप्राप्तीच्या 60 वर्षांनंतरसुद्धा अनेक लाभांपासून वंचित राहिला आहे. अनुसूचित जातीत जवळपास 59 उपजातींचा समावेश होतो. त्यात प्रामुख्याने महार, मातंग, चांभार या प्रमुख जातींसह अनेक उपजाती आहेत. मातंग समाजात 24 उपजाती आहेत. साधारणपणे महाराष्ट्रात मातंग, आंध्र व कर्नाटक राज्यात मादिग तसेच गुजरात राज्यात मांगेला आदी नावांनी या जाती ओळखल्या जातात. महाराष्ट्रात मातंग समाजाच्या शैक्षणिक स्थितीचा आढावा घेतल्यास ती अतिशय चिंताजनक दिसते. कारण हा समाज गरीब आहे. दरिद्री स्थितीमुळे अनेक मुले शिक्षणापासून वंचित राहिली आहेत. म्हणून समाजातील विद्यार्थ्यांना मुख्य शिक्षण प्रवाहात आणणे आवश्यक आहे. त्यामुळे प्राथमिकपासून ते उच्चशिक्षणापर्यंत या समाजातील मुलांचे प्रमाण वाढण्यास मदत होईल. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात मातंग समाज वास्तव्यास आहे. बारा बलुतेदारांमधील महत्त्वाचा घटक म्हणून या समाजाने ग्रामीण भागात योगदान दिले आहे. तरीदेखील या समाजाची स्थिती दयनीय आहे. स्वत:ची उत्पन्नाची साधने उपलब्ध नसल्याने हा समाज आर्थिक प्रगती करू शकलेला नाही. म्हणून शासन स्तरावर मातंग समाजासाठी शेती व उद्योग व्यवसायासाठी खास करून योजनांची अंमलबजावणी व्हायला हवी. 

समाजातील तरुण-तरुणींना व्यावसायिक शिक्षण दिल्यास त्यांचा आर्थिक प्रश्न सुटण्याबरोबरच सामाजिक स्थितीतदेखील बदल घडून येईल. सामाजिक स्थितीचा विचार करताना विकास प्रक्रियेत या समाजाला बरोबरीने आणण्यासाठी शासनाने अनुसूचित जातींसाठी स्वतंत्र आरक्षणाची तरतूद केलेली असली तरी आरक्षणाचे धोरण राबवण्यात प्रशासकीय व्यवस्था उदासिन असल्याने शैक्षणिक, राजकीय व नोकर्यांमध्ये या समाजाला आरक्षणाचा फार फायदा झालेला नाही. ज्या समाजात कणखर व सर्वसमावेशक नेतृत्वाचा अभाव असतो त्या समाजातील विविध प्रश्न राजकीय पटलावर मांडले जात नाहीत. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी `समाज हा राज्यकर्ता बनला पाहिजे' म्हटले होते. या समाजातील राजकीय प्रवासाचा अभ्यास केल्यास महाराष्ट्रातून अनेक खासदार तसेच महाराष्ट्रातून विधानसभेत आमदार निवडून गेलेले आहेत. तरीही सर्वसमावेशक नेतृत्व करणारा व सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारा एकही नेता यशस्वी झालेला नाही. परिणामी ग्रामपंचायतीपासून विधानसभेपर्यंत राज्यकर्त्या समाजाने या समाजाची फारशी दखल घेतलेली दिसत नाही. त्यामुळे पंचायत समिती, महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद इत्यादींमध्ये आरक्षणाचा संपूर्ण फायदा समाजाला मिळालेला नाही. 

अण्णा भाऊ साठे जयंती साजरी करताना खरोखरच सामाजिक विकास प्रक्रियेचा एक भाग बनवायचे असेल तर  काही बदल घडवून आणावे लागतील. समाज एकसंघ बांधावा व उभा करावा लागेल. त्यासाठी... 

  • मातंग समाजाचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय रोजगारविषयक विकास साधण्यासाठी समान न्यायाच्या तत्त्वावर या समाजात आरक्षण धोरणाची अंमलबजावणी होत आहे किंवा नाही यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. . 
  •  समाजातील राज्यकर्त्यांनी, संघटनांनी, संस्थांनी आपले वैयक्तिक मतभेद व स्वार्थ बाजूला ठेवून `सामाजिक न्यायासाठी लढा' यासाठी एक सर्वसमावेशक नेतृत्व स्वीकारावे. 
  • या समाजाचा अभ्यास करण्यासाठी एका मंत्रिगटाची स्थापना व्हावी. या मंत्रिगटाने या समाजाचा जिल्हानिहाय अभ्यास करावा. 
  • निवृत्त न्यायमूर्तींमार्फत समाजाचा अभ्यास करण्यासाठी आयोगाची नेमणूक करण्यासाठी शासनास भाग पाडावे. 
  • शासन स्तरावर आपल्या न्याय्य मागण्या पूर्ण करण्यासाठी एका दबाव गटाची स्थापना करावी. 
  • समाजातील विविध क्षेत्रातील तज्ञांची समिती गठित करणे आणि त्या समितीने विविध प्रश्नांवर शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करणे. 
  • लहूजी साळवे आयोगाच्या आधारे दिलेल्या सामाजिक आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी शासनास भाग पाडावे. 
  • या समाजाने शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात एक विकास चळवळ उभी करावी.
  • गाव, तालुका, जिल्हा, राज्य अशी एकसंघ संघटनात्मक रचना उभी करून समाज जोडावा. 
  • सामाजिक आरक्षणात राजकीय, शैक्षणिक व नोकर्यांमधील आरक्षण धोरण राबविण्याकरिता  सर्वांना बरोबर घेऊन चळवळ उभी करावी. 

अण्णा भाऊंची जयंती ही समाज विकासाची चळवळ होणे काळाची गरज आहे.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या