दाभोलकर हत्या प्रकरणी तपासात होणाऱ्या दिरंगाईबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

   ठाणे -  महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष शहीद डॉ नरेंद्र दाभोलकर यांचा खून दि 20 ऑगस्ट 2013 रोजी झाला. या दुःखद घटनेला येत्या २० ऑगस्टला आठ वर्ष पूर्ण होत आहेत. तीन संशयित मारेकऱ्यांसह दोन मध्यमस्तर सहायक अशा पाच जणांची अटक, उच्च न्यायालयाची सहा वर्षांपासूनची करडी नजर आणि त्या माध्यमातून झालेल्या ४५ सुनावण्यांमधून “कट्टर हिंदुत्ववादी विचारांच्या गटाचा कट’ असल्याचे सीबीआयच्या तपासात निष्पन्न होणे या जमेच्या बाजू असल्या तरी डॉ. नरेंद्र दाभोलकर खून खटल्यातील “मूख्य सूत्रधार’ आठ वर्षांनंतरही पडद्यामागेच आहे. 

तसेच पाच महिन्यांपूर्वी उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही या खटल्याची सुनावणी अद्याप सुरू झालेली नाही. शहीद डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घृण  खुनाच्या तपासात होणा-या अक्षम्य दिरंगाई बाबत अंनिसने   ठाणे निवासी उप जिल्हाधिकारी यांना अंनिसच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी निवेदन देताना ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष राजेश देवरुखकर, राज्य सरचिटणीस सुरेखा भापकर, राज्य कायदा विभाग सहकार्यवाह,ऍड तृप्ती पाटील, निधी व्यवस्थापन विभाग सहकार्यवाह, सुधीर निंबाळकर, ठाणे जिल्हा कार्यकर्ता अमोल चौगुले विविध उपक्रम कार्यवाह ठाणे व अंनिसचे सदस्य उपस्थित होते.

यावेळी अंनिसचे कार्यअध्यक्ष  राजेश देवरुखकर म्हणाले की, आपण एका बाजुला महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे असे म्हणता आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रात पुरोगामी विचारवंतांचे खून पडतात हे महाराष्ट्रासाठी नक्कीच भूषणावह नाही. मुख्य धार्मिक मूलतत्त्ववादी सूत्रधारांना पकडण्या मध्ये ऊशीर होत आहे. जे लोक आणि संघटना या खूनांच्या मध्ये गुंतलेले आहेत त्यांना केंद्रीय यंत्रणांच्या मदतीने अटक करणे आवश्यक आहे यासाठी आणि तपासात निर्णायक गती येण्यासाठी विशेष तपास टीम गठीत करावी  सामाजिक कार्यकर्ते आणि समाजसुधारक यांचे होणारे खून थांबवण्यासाठी एका कडक तातडीच्या कायद्याची गरज आहे असे आमचे मत आहे. कारण सामाजिक कार्यकर्ते आणि समाजसुधारक याच्या जीवाला सध्या आपल्या समाजात उघड धोका आहे. असे झाले तर सर्व लोक राज्य घटनेत दिलेला अभिव्यक्ती स्वातंत्राच्या अधिकार उपभोगू शकतील.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला 8 वर्षे पूर्ण झाली तरीही या प्रकरणातील मुख्य सूत्रधार पकडले गेलेले नाहीत. त्यामुळे त्यांना पकडून त्यांच्यावर खटला चालवावा, अशी मागणी दाभोलकर यांची दोन्ही मुले म्हणजेच कन्या मुक्ता दाभोलकर आणि सुपुत्र हमीद दाभोलकर यांनी केली आहे. त्यांनी खटल्यातील दिरंगाईवर नाराजीदेखील व्यक्त केली. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपी विक्रम भावेला सशर्त जामीन मिळाला असल्याने खटला सुरू न झाल्यानं आरोपी जामिनावर सुटत असल्याचंही मत त्यांनी नोंदवलं आहे.

मुक्ता दाभोलकर म्हणाल्या, “डॉ. दाभोलकरांच्या खून प्रकरणातील संशयित आरोपी पकडले गेले आहेत. परंतु अद्याप खटला सुरू झालेला नाही. खटला सुरू होण्यास उशीर झाला तर त्याचा फायदा आरोपींना मिळून ते जामिनावर सुटतात. या खटल्यातील आरोपी विक्रम भावे अशाप्रकारे जामिनावर सुटलेले आहेत. आम्ही त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयातदेखील गेलो आहोत. 8 वर्षांनंतर तरी हा खटला ताबडतोब सुरू होणं गरजेचं आहे.” “दाभोलकरांच्या खुनानंतर गोविंद पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांचेही खून झाले. या सर्व खुनांचा आणि नालासोपारा येथे सापडलेला स्फोटकांचा प्रचंड साठा हे पाचही गुन्हे एकमेकांशी जोडलेले आहेत. तसेच या पाचही प्रकरणातील आरोपी आणि साक्षीदार समान आहेत. 

या प्रकरणात केवळ काही तरुण आरोपी पकडले जाणं पुरेसं नाही. त्यांना पैसे पुरवणारं कोण आहे? हा मोठा कट तयार करणारे कोण आहेत? एकूणच या संपूर्ण कटाचे सूत्रधार कोण आहेत? हे समोर येणं गरजेचं आहे. मुंबई उच्च न्यायालयानेही वेळोवेळी हा व्यापक कटाचा भाग असल्याचं निरीक्षण नोंदवलंय. म्हणूनच या कटाच्या मुळांशी पोहोचणं गरजेचं आहे. लवकरात लवकर खटला सुरू व्हावा. लवकरात लवकर खुनाच्या सूत्रधारांपर्यंत पोहोचावं, अशी आमची मागणी आहे. अशाप्रकारची विचारसरणी बाहेर राहिल्याने अनेक विवेकवादी लोकांच्या जीविताला धोका आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर जे अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करत होते, ते काम पुढेही सुरूच ठेवणं हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल,” असंही मत त्यांनी व्यक्त केलं.

२० ऑगस्ट २०१३ रोजी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक आणि विवेकवादी चळवळीचे प्रणेते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्यानंतर कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी आणि गौरी लंकेश अशा तिघांच्या हत्या करण्यात झाल्या. दरम्यान, दाभोलकर आणि पानसरे कुटुंबीयांच्या याचिकेमुळे २०१५ पासून उच्च न्यायालयाच्या निगराणीखाली एकत्रितपणे करण्यात आलेल्या तपासात पाचही गुन्ह्यांमधील धागेदोरे जुळत असल्याचे पुढे आले. त्यातून वीसहून अधिक संशयित आरोपी गजाआड झाले आणि या हत्या कडव्या हिंदुत्ववादी विचारांच्या गटाने रचलेल्या “कट कारस्थाना’चा भाग असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.

 दाभोलकर खून खटल्यातील संशयित आरोपी सचिन अंदुरे, शरद कळसकर आणि डॉ. वीरेंद्र तावडे कारागृहात आहेत, तर त्यांना मदत करण्याच्या संशयावरून अटक करण्यात आलेले विक्रम भावे व अॅड. संजीव पुनाळेकर जामिनावर बाहेर आहेत.  जामिनावर असताना दाभोलकर खुनाचा कट रचल्यावरून भावेंच्या जामिनाविरोधात सीबीआयने आक्षेप याचिका दाखल करणे अपेक्षित होते. मात्र त्यांनी न केल्याने दाभोलकर परिवाराने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने याच आठवड्यात तावडेला नोटीस पाठवली आहे. 

  • आठ वर्षांतील आठ महत्त्वाचे टप्पे
  • - जानेवारी २०१४ : पुणे पोलिसांकडून मनीष नागोरी व विलास खंडेलवाल यांना अटक
  • - जून २०१४ : तपास सीबीआयकडे हस्तांतरित; नागोरी, खंडेलवालांचा संबंध बाद
  • - २०१५ : न्यायालयाच्या “निगराणी’खाली तपास सुरू
  • - फेब्रुवारी २०१५ : कॉ. गोविंद पानसरेंची कोल्हापुरात हत्या
  • - सप्टेंबर २०१६ : सचिन अंदुरे, शरद कळसकर, डॉ. वीरेंद्र तावडेसह सनातन संस्थेचे फरार साधक सारंग अकोलकर आणि विनय पवारचा सीबीआयच्या तपासात समावेश
  • - ऑगस्ट २०१८ : संशयित मारेकरी सचिन अंदुरे व शरद कळसकर यांना सीबीआयकडून अटक
  • - मे २०१९ : विक्रम भावे व अॅड. संजीव पुनाळेकर यांना सीबीआयकडून अटक
  • - मार्च २०२१ : तपास सुरू राहूदे, सुनावणी सुरू करा - उच्च न्यायालयाचा आदेेश

डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाच्या गुन्ह्यातील संशयित मारेकरी जरी पकडले गेले असले तरी यामागचे सूत्रधार अजून पडद्यामागे आहेत. त्यांना लवकरात लवकर पकडले जावे आणि हा खटला तातडीने चालू करावा, अशी मागणी आम्ही करत आहोत. - डॉ. हमीद दाभोलकर, अंधश्रद्धा निर्मूलन समिती


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

👋👋👋
सुबोध शाक्यरत्न
:
8108658970......

You may support us in the progress of our services
 Donate us,,,  
G PAY : 8108603260

दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी
Follow this link to join our WhatsApp group: 👇
https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA

Watch our You Tube channel @janata2010 👇
https://www.youtube.com/channel/UCC-G5bJ0b4kFYfA6UW23t1w

आपल्या परिसरातील, विभागातील जनहिताच्या बातम्या तसेच
संस्था संघटनांचे विविध लोकोपयोगी कार्यक्रमांचे वृत्त प्रसिद्धीकरिता 
खालील इमेलवर पाठवा....👇👇👇
Email - pr.janata@gmail.com

प्रजासत्ताक जनता वर्तमानपत्राचे प्रतिनिधी होण्यासाठी
खालील लिंकवर जाऊन आपला अर्ज भरा....
https://docs.google.com/forms/d/12mZjiz8CXKgopLUTbwz5aCkIF0-ZRJlPfpNb8s6WX6g/edit?pli=1