Top Post Ad

संविधान बदलायला निघालेल्यांना तथाकथित आंबेडकरवादी व पोटार्थी पँथरचीही साथ....!

 


संविधान बदलायला निघालेल्या संघ, भाजपला तथाकथित आंबेडकरवादी व पोटार्थी पँथरची ही साथ.......!

 मनुवादी व्यवस्थेने या देशाला कधीच एकसंघ ठेवले नाही की, देशवाशियांमध्ये राष्ट्रीय प्रेम निर्माण होऊ दिले नाही. त्यामुळेच साता समुद्र व वाळवंट पार करुन आलेल्या विदेशी शक्तींनी या देशावर शेकडो वर्ष राज्य केले. या मनुवाद्यांनी या शक्तींशी समझोता करुन या देशाला व देशातील जनतेला गुलाम बनविले. हा पराभूत भारताचा इतिहास आहे. मग या देशाला शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या बलिदानाने, काँग्रेस, महात्मा गांधी यांच्या संघर्षाने स्वातंत्र्य मिळवून दिले. तर या स्वातंत्र्य देशाला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान व लोकशाही या दोन अनमोल गोष्टी दिल्या. स्वातंत्र्य भारत डॉ. आंबेडकरांनी दिलेल्या संविधानावर चालत असून याच संविधानाने या देशातील नागरिकांमध्ये राष्ट्रीय भावना पहिल्यांदाच निर्माण केली. सर्व नागरिकांना एका समान पातळीवर आणले. हेच इथल्या मनुवाद्यांना खटकत आहे.समतेच्या तत्वाला विरोध असल्यानेच त्यांनी संविधानाला ते तयार होत असल्यापासून विरोध केलेला आहे. हा पण एक इतिहास आहे. याच मनुवादी शक्तींचा तिरंगी ध्वजाला विरोध आहे. सर्व नागरिकांना सर्व प्रकारची संधी देणाऱ्या लोकशाहीला विरोध आहे. डॉ. आंबेडकरांनी दिलेल्या या दोन्ही गोष्टी संपवून त्यांना या देशात पुन्हा हिंदू राष्ट्राच्या माध्यमातून मनुवादी व्यवस्था आणायची आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपचा हा उघड व जाहीर अजेंडा आहे. अन् त्यासाठीच त्यांना ४०० पेक्षा अधिक जागा हव्या असून तथाकथित काही आंबेडकरवादी व  पोटार्थी पँथर अशा वेळी ही भाजपसोबत आहेत, हे फार मोठे दुर्दैव आहे.

        देश, समाज कुठला ही असो. तेथे दोनच विचारधारा प्रामुख्याने काम करतात. शोषण करणाऱ्यांची एक विचारधारा असते. अन् त्या शोषणातून मुक्तीचा लढा, संघर्ष करणारी दुसरी विचारधारा असते. प्रतिक्रांती - क्रांती, क्रांती - प्रतिक्रांती असे आपण त्यास म्हणू शकतो. आपल्या देशात आज प्रतिक्रांतीचे नेतृत्व संघ, भाजप करीत असून तिचा चेहरा मोदी व भागवत आहे. तर क्रांतीचे नेतृत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर करीत असून संविधान, लोकशाही अन आंबेडकर स्वतःच क्रांतीच्या लढयाचे चेहरा आहेत. हे सत्य इतके उघड असताना रिपब्लिकन पक्ष, दलित पँथर अन् डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव व फोटो वापरून काही दलाल भाजपच्या ४०० पार नाऱ्याची साथ देत आहेत. हा निर्लज्जपणाचा कळस आहे, हे खेदाने नमूद करावे लागते. तसेच हे फारच क्लेशकारक असल्याच्या भावना आंबेडकरी समाज व चळवळीतील कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.

       संविधान, लोकशाही, देशाची एकता, अखंडता अन या देशातील १४० कोटी पेक्षा अधिक नागरिकांचे भवितव्य ठरविणारी निवडणूक देशात होत आहे. संविधान बदलून मनुवाद आणण्यासाठी भाजपला ४०० पेक्षा अधिक जागा हव्या आहेत. त्या मिळविण्यासाठी ते करो अथवा मरोची लढाई लढत आहेत. पुढील वर्षी संघाच्या स्थापनेला १०० वर्ष पूर्ण होतील, तेव्हा त्यांना या देशाला हिंदु राष्ट्र घोषित करायचे आहे. ते होईल तेव्हा संविधान, लोकशाही व संवैधानिक अधिकारांना आपण मुकलेलो असू. याचे स्पष्ट संकेत मोदीने आपल्या १० वर्षाच्या सत्ताकाळात दिले आहेत. विषाची परिक्षा घेण्यात शहाणपण नसते. तरी ही निळे ध्वज, झेंडे घेऊन काही रिपब्लिकन नेते, पँथरचा काहीही संबंध नसलेले तथाकथित पँथर तुकड्यासाठी संघ व भाजपला साथ देत आहेत. हे खुलेआम पहायला मिळत आहे.

           डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पश्चात दशकभरातच सत्तेच्या तुकड्यासाठी काही नेत्यांनी आंबेडकरी विचार व चळवळीशी गद्दारी केली. पण ती पोकळी भरून काढणारी दुसरी फळी लगेच तयार झाली व तिने या चळवळीचे नेतृत्व आपल्या हाती घेतले. यामध्ये पँथरचा प्रामुख्याने विचार करावा लागेल. ऐतिहासिक ब्लॅक पँथरपासून प्रेरणा घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा व सामाजिक न्यायाचा लढा पुढे घेऊन जाण्याचे तितकेच ऐतिहासिक काम या पँथरने केले. पँथरची स्थापना व विसर्जन हा काळ केवळ दोनच वर्षाचा राहिला असला तरी पँथरचा ठसा, दहशत अन् दरारा कायम  धर्मांध व जातीयवादी शक्तीं समोर राहिला.

      १९७०, ८० अन् ९० च्या दशकापर्यंत पँथरचा वचक राहिला. या चळवळीने अनेक नेते, साहित्यिक, विचारवंत अन् पँथर निर्माण केले व घडविले. नामदेव ढसाळ, राजा ढाले,भाई संगारे, अविनाश महातेकर यांना नेते, विचारवंत, साहित्यिक ही ओळख याच पँथरने दिली. अन्याया विरोधात लढण्याचे बळ ही नावं सतत आंबेडकरी विचारांच्या तरुणांना देत राहिली. मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा लढा हेच तरुण जीवाची पर्वा न करता लढले. पुढील पिढीत गंगाधर गाडे, प्रा .अरुण कांबळे यांनी या चळवळीचे नेतृत्व यशस्वीपणे केले.

     आपल्या न्याय, हक्क, अधिकारांसाठी मरायला व मारायला  ज्या चळवळीत तरुण तयार असतात, ती चळवळ कधीच आपली लढाई हारत नाही. पराभव तिला मान्य नसतो. पण ती चळवळ ही प्रस्थापित व सत्तेची बटिक होते. त्यावेळी तिचे काय होते. ते आपण ९० च्या दशकापासून पाहत आहोत. स्वतःला पँथर म्हणणारे अनेक लाचार पँथर व रिपब्लिकन नेते संविधान बदलायला निघालेल्या भाजपला चिंधीसाठी साथ देताना आज दिसत आहेत. हेच पाहण्यासाठी शहीद भागवत जाधव, पोचीराम कांबळे आदींनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले का ? याच साठी पँथर नेते भाई संगारे यांनी शहादत दिली का ? हे प्रश्न उभे राहतात. मनाला खूप अस्वस्थ अन् बैचन करतात, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी ही इतके कृतघ्न वागणारे लोक याच आंबेडकरी विचारांच्या चळवळीचे भाग आहेत, ही चिंतेचा भाग तर आहेच पण हे ऐकायला ही भयंकर वाटते. 

  • राहुल गायकवाड,
  • महासचिव, समाजवादी पार्टी, महाराष्ट्र प्रदेश
,........................
ऐक्यवादी रिपब्लिकन पार्टी व दलित पँथरचा महायुतीला जाहिर पाठिंबा 
मागील १० वर्षामध्ये भाजपा महायुतीने देशाचा संपूर्ण चेहरामोहरा बदलला असून देशाला विकासाच्या उंचीवर नेले आहे. त्यांच्या नेतृत्वात भारतीय अर्थव्यवस्थेने घेतलेली झेप भारताला विकसीत राष्ट्रांच्या बरोबरीने नेणारी असून देशातील बेकारी, गरीबी नष्ट होण्यात त्याचा नक्कीच फायदा झालेला आहे. त्यामुळे पुढील ५ वर्षात त्यांच्या नेतृत्वात देश अधिक विकसीत व मजबूत होईल असा विश्वास व्यक्त करीत ऐक्यवादी रिपब्लिकन पार्टी व दलित पँथरंचा महायुतीला जाहिर पाठिंबा दिल्याचे आज दिलीप जगताप (अध्यक्ष- ऐक्यवादी रिपाई) सुखदेव (तात्या) सोनावणे (अध्यक्ष - दलित पँथर, महाराष्ट्र राज्य) यांनी जाहीर केले. याबाबत आज मुंबई पत्रकार संघात पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यावेळी दिनेश गोडघाटे, शुभम सोनावणे, सोमनाथ सोनावणे, प्रकाश साळवे, मनोहर कटके, सुनिल इलमकर, उमेश वाव्हळ, राहूल केदार यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
नरेंद्र मोदी यांनी पुढील २५ वर्षाचे देशाचे विकासाचे संकल्प कार्यक्रम तयार केले असून भारत नजीकच्या काळात सर्व अर्थाने महासत्ता होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या अडीच वर्षामध्ये अनेक मोठे प्रकल्प महाराष्ट्रात आणून महाराष्ट्राला अग्रेसर राज्य असल्याचे दाखवून दिले. अनेक योजना राबवून महाराष्ट्र शासन अधिक लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न केला. उपमुख्यमंत्र देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासक नेतृत्वामुळे गेल्या १० वर्षापासून महाराष्ट्रामध्ये मेट्रोचे प्रचंड जाळे निर्माण झाले. मुंबई नागपूर समृध्दी महामार्ग, अटल सेतु, अनेक एक्सप्रेस वे या पायाभुत सुविधांसह महाराष्ट्राला विकासाच्या महामार्गावर नेण्याचे काम होत आहे. त्याचप्रमाणे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्री रामदास आठवले यांनी या महायुतीला पाठिंबा देण्याची जी भूमिका घेतलेली आहे. त्याला संपूर्ण पाठिंबा देवून संपूर्ण समाजाच्या व राष्ट्रहिताच्या भूमिकेतून सक्रिय पाठिंबा जाहीर करत असल्याचे दिलीप जगताप यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले. 

----------------------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com