रयतेचा राजा राजर्षि शाहू


आपले राजेपण हे मिरविण्यासाठी नसून लोकांच्या सेवेसाठी आहे. राजेपद हे शाहू महाराजांच्या दृष्टीने नगण्य होते. मात्र लोकसेवेसाठी ते टिकविणे जरूरी होते. त्यातूनच राजर्षी शाहू महाराजांनी लोकसेवेचा नवा आदर्श निर्माण केला. अफाट कर्तृत्ववान असलेला हा राजा. ज्याच्या कार्यकर्तृत्वाला मर्यादा  नव्हत्याच. त्यांची कार्यशक्ती जबरदस्त होती. ध्येय दृष्टी निश्चित होती. सुक्ष्म निरीक्षण आणि दाट अवलोकन यांचे सुयोग्य मिश्रण होते, म्हणूनच ते लोकनेता होते.  महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या तीन महान व्यक्तींमुळे आपणास सामाजिक न्यायाचा पाठ अनुभवयास मिळतो. सामाजिक समतेची एक मोठी शिकवण यांनी आपणास दिली. यातील प्रत्येकाचे कार्य हे आभाळापेक्षाही मोठे आहे. असे म्हटले तर ते अतिशयोक्ती नसेल. आपल्या जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी, उन्नतीसाठी जे-जे काही करता येईल त्या-त्या बाबींकडे अत्यंत जागरुकतेने लक्ष देऊन त्यांची पूर्तता करण्याचे काम राजर्षीनी केले. शिक्षण, सामाजिक समता, जाती निरपेक्षता यांच्याकडे पाहण्याची ज्यांची दृष्टी ही खूप वेगळी व तेजस्वी होती. शिक्षण, समाज, धर्म, हक्क, अर्थ अशा विविध घटकांचा विचार करून राजर्षी शाहू महाराज लोकसेवा करीत असत.

स्वयंप्रेरणेचा मंत्र
स्वातंत्र्यपूर्वीच्या काळात जेव्हा आपण  ब्रिटीशांच्या गुलामगिरीत होतो. त्यावेळी ती नष्ट करण्यासाठी असलेल्या डोळस नेतृत्वाच्या गरजेबद्दल राजर्षी शाहू महाराजांचे सडेतोड आणि स्पष्ट विचार सर्व काही सांगून जातात. हिंदुस्थानातील जीवघेणी गुलामगिरी नष्ट करण्यासाठी तोंडाने बडबडणारे पुढारी आम्हास नको आहेत. कृतीने जातीभेद मोडून आम्हास मनुष्याप्रमाणे वागवतील "असे पुढारी पाहिजेत. अस्पृश्यांसाठी काय ? किंवा इतर कोणासाठी काय? कुठलीही विधायक गोष्ट घडवायची असेल तर कृतीशील मानवतावादी पुढारीच हवा आहे, असे ते म्हणत. कुणावरही न विसंबता स्वत:च स्वत:च्या पायावर उभे राहण्याचा 'स्वंयप्रेरणेचा मंत्र' हा शाहू महाराजांच्या कार्याचा मूलमंत्र आहे.

लोकनेता  राजर्षी शाहू महाराज यांनी अनेक वेळा आपले विचार लोकांच्या समोर अत्यंत प्रखरतेने व प्रगटपणे मांडले. त्यांच्या प्रत्येक भाषणातून लोकांच्याप्रती, समाजाच्याप्रती असलेला त्यांचा आप्तपणाचा भाव स्पष्टपणे दिसून येतो. अशाच एका भाषणाच्या प्रसंगी ते म्हणतात, आपण मला आज आपला असे म्हटले आहे. त्याचप्रमाणे शेवटपर्यंत प्रेम दृढ ठेवा, मी देखील कितीही अडचणी आल्या, कितीही त्रास झाला, तरी त्याला न जुमानता उन्नतीच्या महात्कार्यास शक्य तेवढा हातभार लावण्यास कधीही माघार घेणार नाही, असे आश्वासन देऊन मी आपले भाषण संपवितो. 

राजर्षी शाहू महाराजांच्या भाषणांच्या टीकाटिप्पणीसह चिकित्सक अभ्यास असलेल्या क्रांतिसुक्ते: 'राजर्षि छत्रपती शाहू' या ग्रंथाच्या प्रारंभी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष य. दि. फडके यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, आधुनिक काळात महाराष्ट्राची जडणघडण करणाऱ्या महान नेत्यांमध्ये कोल्हापूरचे राजर्षी शाहू महाराज यांचे स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे. एकोणिसाव्या शतकात महात्मा  ज्योतिराव फुले यांनी स्वाभिमानाचे व समतेचे बी पेरुन जो वृक्ष लावला त्याला खतपाणी घालून काळजीपूर्वक वाढविले ते शाहू छत्रपतींनी. या वृक्षाला कर्मवीर भाऊराव पाटील, केशवराव जेधे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वाच्या रुपाने पुढील काळात नवनवीन धुमारे फुटले. शेकडो वर्षे जे ज्ञान, सत्ता, संपत्ती यापासून वंचित राहिले त्यांना माणूस म्हणून स्वाभिमानाने जगता यावे, शिकता यावे आणि विकासाच्या वाटा खुल्या व्हाव्यात असा शाहू छत्रपतींनी आयुष्यभर ध्यास घेतला होता. राजकीय स्वराज्य मिळविण्याचा प्रश्न त्यांना गौण वाटला. सामाजिक व धार्मिक समतेची प्रस्थापना करण्याच्या प्रश्नाला त्यांनी नेहमीच अग्रक्रम दिला. २६ जून हा त्यांचा जन्मदिवस. पुरोगामी महाराष्ट्रात हा दिवस 'सामाजिक न्याय दिन म्हणून मोठ्या गौरवाने साजरा केला जातो.

    

(संदर्भ- क्रांतिसुक्ते राजर्षि छत्रपती शाहू. संपादक : डॉ. एस. एस. भोसले)

डॉ. राजू पाटोदकर, मुंबई

----------------------------

  हजारो राजे झाले, मात्र माणसातला राजा, राजातला माणूस हाच आणि असा सन्मान लाभणारा हाच राजा.! 

       वारसा नेमका कशाचा असतो हे लख्खपणे समजलेला राजा.!
आजच ह्या राजाला का आठवायच.?
       जेव्हा महाराष्ट्रातल्या आदिवासी, डोंगराळ, दुर्गम, ग्रामीण भागातल्या शाळा 'परवडत नाहीत‘ म्हणून नादान राज्यकर्ते बंद करायला निघतात तेव्हा तब्बल शंभर वर्षापूर्वी प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारा कायदा मंजूर करून अंमलात आणणारा हा राजा आठवायचा...
       जेव्हा शिक्षण व्यवस्था भांडवली हातात देऊन बटिक करायला राज्यकर्ते आतुर झालेले आहेत तेव्हा महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात बहुजनांच्या शिक्षणासाठी बोर्डिंग, शाळा उघडायला सढळ हस्ते मदत करणारा राजा आठवायचा...
       संपूर्ण मुंबई इलाख्याचे शिक्षणाचे बजेट होते त्यापेक्षा जास्त तरतूद आपल्या राज्यात करून ते पैसे शिक्षणावर खर्च करणारा खरा शिक्षणमहर्षी !!
       जेव्हा दलित समाजातल्या माणसाला घोड्यावरून मिरवणूक काढली म्हणून मारहाण केली जाते तेव्हा शंभर वर्षापूर्वी दलित माणसाला आपल्या गावात हॉटेल काढून देऊन तिथे चहा प्यायला जाणारा राजा आठवायचा...
       जेव्हा ऑनर किलिंग सारखा हिडीस प्रकार बोकाळलेला असताना, पोटच्या लेकरांचे जीव घेणारे हैवान असताना शंभर वर्षापूर्वी आपल्याच घरात मराठा धनगर विवाहाला पुढाकार घेणारा राजा आठवायचा...
       मुलींच लग्नाचं वय कायद्याने वाढवून, सज्ञान मुलांना स्वतःच्या लग्नाचा हक्क कायद्याने देणारा तोही १०० वर्षांपूर्वी, दूरदृष्टी असलेला राजा.!
       जेव्हा मागासवर्गीय विद्यार्थ्यांना फीचे पैसे सरकारने दिले नाहीत म्हणून पदवी प्रमाणपत्र मिळायला अडवल जात तेव्हा डॉक्टर आंबेडकरांच्या मागे उभा राहणारा राजा आठवायचा... 
       जेव्हा महाराष्ट्रात लेकीबाळी हंडाभर पाण्यासाठी पाच पाच किलोमीटर पायपीट करतात तेव्हा दूरदृष्टी दाखवून धरण बांधून सिंचनाची सोय करणारा राजा आठवायचा...
       जेव्हा लोकशाही मार्गाने लोककल्याणकारी राज्यव्यवस्था राबवणे अपेक्षित असलेल सरकार भांडवलदारांच्या तुंबड्या भरण्यात दंग होत तेव्हा मर्यादित अधिकार आणि संसाधन असताना लोककल्याण साधणारा राजा आठवायचा...
       पिढीजात वारसा, संपत्ती काहीही पाठबळ नसताना केवळ ज्ञानाच्या जोरावर संपत्ती आणि अधिकार मिळवता येतो हे सांगणारा राजा आठवायचा...


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA