९० टक्के अनधिकृत इमारतीवर सुमारे १४८२ मोबाईल टॉवर्स

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये ९० टक्के इमारती बेकायदा असून अशा इमारतींवर जवळपास १४८२ मोबाईल टॉवर्स आहेत. मोबाईल टॉवर कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी केली की या कंपन्या न्यायालयात जाऊन स्थगिती घेतात. महापालिकेचा विधी विभाग या प्रकरणात फक्त बघ्याची भूमिका घेतो.  ठाण्यातील अशा बेकायदा इमारतींवरील मोबाईल टॉवरवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते संजीव दत्ता यांनी केली आहे.   सध्या पावसाळा सुरू असून बेकायदा इमारत पडल्यास जिवित आणि वित्तहानी होऊ शकते. पण यावर ठाणे महापालिकेकडून कधीही बोललं जात नाही. मोबाईल कंपन्यांनाही बेकायदेशीर इमारतींवर टॉवर असल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल अशा नोटीसा महापालिका बजावत नाही. यामुळं आर्थिक नुकसान होण्याबरोबरच नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. त्यामुळं अशा बेकायदा इमारतींवरील मोबाईल टॉवर्सवर कारवाई करण्याची मागणी संजीव दत्ता यांनी केली आहे.त्यांच्या मागणीमुळे ठाणे शहरात सध्या मोबाईल टॉवरचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ठाण्यात हा प्रश्न गंभीर स्वरुप धारण करीत आहे. स्टेशन परिसरासह छोट्या छोट्या इमारतीवर हे टॉवर उभे रहात आहेत. 

  दूरसंचार सुविधांच्या जाळ्यासाठी व बेस स्टेशन उभारणीसाठी सर्वसमावेशक नियमावली राज्य सरकारने 4 मार्च, 2014 रोजी मंजूर केली आहे. मोबाइल टॉवर उभारण्राया कंपनीने अर्ज केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966च्या कलम 44 ते 47 नुसार मंजुरी देणे बंधनकारक आहे. या कलमानुसार कोणत्याही बेकायदा, 30 वर्षांपेक्षा जुन्या इमारतींवर मोबाइल टॉवर उभारणीला परवानगी देता येत नाही. स्टॅण्डिंग अॅडव्हायजरी कमिटी फॉर फ्रीक्वेन्सी अलोकेशन (एसएसीएफए), वायरलेस प्लॅनिंग कमिशनची परवानगी, टेलिकॉम एन्फोर्समेंट रीसोर्स अॅण्ड मॉनेटरिंग सेलचा (टीईआरएम) रेडिएशन नियंत्रणात असल्याचा अहवाल, नागरी हवाई उड्डाण मंत्रालय, प्रदूषण नियंत्रण मंडळ, फायर ब्रिगेड यांच्यासह राज्य सरकारच्या संबंधित विभागांच्या परवानग्यासुध्दा बंधनकारक करण्यात आल्या आहेत. त्याशिवाय टॉवर्सची संख्या, त्यांचे अंतर, सुरक्षेच्या उपाययोजना याबाबतची नियमावलीसुध्दा कठोर आहे. मात्र याचे कोणत्याही प्रकारे पालन होत नसल्यामुळे ठाणे महानगर पालिकेच्या हद्दीत दिवसेंदिवस टॉवरच्या संख्येत वाढच होत आहे. 

ठाण्यात  माजीवडा, उथळसर, वर्तकनगर, नौपाडा, रायलादेवी, वागळे इस्टेट, कोपरी, कळवा, मुंब्रा या ठिकाणी  गृहनिर्माण सोसायट्यांच्या गच्चीवर हे टॉवर बिनदिक्कतपणे उभे आहेत. यापैकी माजीवडा परिसरात याची संख्या जास्त आहे. तर  मुंब्रा परिसरामध्ये  अनधिकृत इमारतींवरच नव्हे तर धोकायदायक इमारतींवर हे टॉवर  उभारण्यात आले आहेत. याशिवाय कोणत्याही परवानगी विना सध्या उद्यानातूनच टॉवर उभे करण्यास खाजगी कंपन्यांनी सुरुवात केली आहे. ठाण्यातील कासारवडवली येथील जैवविविधता उद्यानामध्ये उभारण्यात येणाऱया मोबाईल टॉवरचे काम  स्थानिक रहिवाशांनी वेळीच आक्रमक भूमिका घेऊन बंद पाडले. तसेच कोपरीच्या उद्यानामध्ये देखील अशाच प्रकारे मोबाईल टॉवर उभारण्याच्या कामासही सुरुवात झाली होती. त्याठिकाणी देखील स्थानिकांनी  एकत्र येऊन येथे आंदोलन करून काम बंद केले. खेळायच्या उद्यानात टॉवर उभारण्यास या कंपन्यांना कोणी परवानगी दिली असा सवाल करीत  स्थानिकांनी हे काम बंद पाडले.  प्रशासनाने ठोस भूमिका घेऊन या टॉवर्स कंपन्यांना नागरी परिसरातून हद्दपार करावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA