काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार, एकनाथ गायकवाड यांचं कोरोनामुळं निधन


 मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार, एकनाथ गायकवाड यांचं कोरोनामुळं निधन झालं. मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. तिथंच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बुधवारी सकाळी 10 वाजता त्यांचं निधन झाल्याचं म्हटलं जात आहे. मागील काही दिवसांपासून त्रास होत असल्यामुळं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण, डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही त्यांचे प्राण वाचवता आले नाहीत. रुग्णालयामध्येच एकनाथ गायकवाड यांचं पूर्ण कुटुंब असून, दुपारनंतर त्यांच्या कुटुंबाकडे पार्थिव सुपूर्द करण्यात येणार असल्याचं कळत आहे. ज्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. थोड्याच वेळात काँग्रेसचे ज्येष्ठ नेतेही रुग्णलायात आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी पोहोचणार असल्याचं कळत आहे. 

एकनाथ गायकवाड हे काँग्रेसचे मुंबईचे माजी अध्यक्ष होते. राज्य मंत्रिमंडळात त्यांनी मंत्रिपद भूषविलं होतं. काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते म्हणून त्यांची ओळख होती. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची त्यांची वृत्ती होती. साधी राहणीमान असलेले गायकवाड विक्रोळीत राहत होते. मात्र, त्यांनी धारावीवर आपली पकड ठेवली होती. धारावीतील प्रत्येक चाळीतील लोकांना ते नावाने ओळखत होते. गायकवाड हे काँग्रेसमधील असले तरी दलित चळवळीशी त्यांचं सख्य होतं. दलित चळवळीतील कार्यकर्तेही त्यांना मानत होते. सर्वच रिपब्लिकन नेत्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमात ते हिरहिरीने भाग घेत होते.

एकनाथ गायकवाड यांनी दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून शिवसेना नेते आणि लोकसभेचे माजी सभापती मनोहर जोशी यांचा पराभव केला होता. जोशींचा पराभव करून ते जायंट किलर ठरले होते. त्यानंतर दोनवेळा ते दक्षिण मध्य मुंबईतून विजयी झाले होते. मात्र, नंतर शिवसेनेचे नेते राहूल शेवाळे यांनी गायकवाड यांचा पराभव केला होता. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आणि मुंबई प्रदेश काँग्रेसची मोठी जबाबदारी त्यांनी आपल्या खांद्यांवर घेतली होती. काँग्रेसला महाराष्ट्रात पुढे नेण्याच्या कामात त्यांचा मोलाचा हातभार लागला होता. मुंबईमध्ये त्यांच्या नावाला असणारं वजन पाहता, मुंबई प्रदेश काँग्रेससाठी हा मोठा धक्का आहे. शिवाय त्यांच्या निधनामुळं काँग्रेससह संपूर्ण राजकीय वर्तुळातून दु:ख व्यक्त केलं जात आहे. 

'मागील 20- 25 वर्षे आम्ही युवा नेते त्यांच्याकडे ज्येष्ठ नेते या नजरेतून पाहत होतो, त्यांच्या जाण्यामुळे मुंबई प्रदेश काँग्रेसमध्ये नक्कीच एक पोकळी निर्माण झाली आहे. सर्वांना सोबत नेऊन जाणारं एक नेतृत्त्वं म्हणून त्यांच्याकडे पाहिलं गेलं. आजारपणावर मात करुन ते पुन्हा रुग्णालयातून बाहेर येतील पण, असं काही झालं नाही', असं म्हणत पाटील यांनी दु:ख व्यक्त केलं. राजकीय कारकिर्दीत कष्ट करण्याती तयारी, एखाद्या गोष्टीच्या पूर्ततेसाठीचा अट्टहास अशा अनेक गोष्टी त्यांच्याकडून शिकण्याजोग्या होत्या. - राज्याचे गृहराज्यमंत्री आणि काँग्रेस नेते सतेज पाटील 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मानहानी खटल्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात शिवडी कोर्टात सुनावणी सुरु होती. त्यावेळी राहुल गांधी कोर्टात हजर राहिल्यानंतर राहुल गांधींविरोधातील वॉरंट रद्द केलं होतं. 15 हजाराच्या हमीनंतर कोर्टाने राहुल गांधींविरोधातील वॉरंट रद्द केलेलं. मुंबईतील काँग्रेसचे माजी खासदार एकनाथ गायकवाड यांनी राहुल गांधींसाठी कोर्टात हमी दिली होती.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA