लॉकडाऊनमुळे गावाकडे परतणाऱ्या परप्रांतीयांची लूट

 धमकावत उकळले जातायेत पैसे

लॉकडाऊनमुळे गावाकडे परतणाऱ्या परप्रांतीय मजुरांकडून पुणे रेल्वे स्टेशनवर धमकावून पैसे घेतले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हे पैसे रेल्वे पोलिसांचे कर्मचारी घेत असल्याचा आरोप होतो आहे. तर दुसरीकडे पैसे घेणारे लोक हे पोलिसांच्या वेशातील भामटे असल्याचा दावा रेल्वे पोलिसांनी केलाय. महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या प्रकारानंतर पुणे रेल्वे स्टेशनमध्ये तैनात असलेल्या 22 पोलीस कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.

लॉकडाऊनमुळे रोजगार गमवावा लागल्याने आधीच अडचणीत सापडलेल्या या मजुरांची घरी परतताना देखील लूट केली जात आहे. घरी परतण्यासाठी हे मजूर पुणे रेल्वे स्टेशन येथे आले की त्यांच्याकडे असलेलं रेल्वेचं तिकीट पाहून त्यांना प्लॅटफॉर्मवर प्रवेश दिला जातो. परंतु तिथून पुढे रेल्वेमध्ये प्रवेश करण्यास त्यांच्याकडे आधार कार्ड आणि इतर कागदपत्रांची मागणी केली जाते आणि ती नाहीत हे कारण देत त्यांच्याकडे पैशांची मागणी केली जात आहे.

रेल्वे प्रवासी सल्लागार समितीला याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आधी रेल्वे अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. पण हा पोलिसांचा विषय आहे असं म्हणत त्यांनी जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. रेल्वे पोलीस अधीक्षक सदानंद वायसे पाटील यांच्याकडे याची तक्रार पोहोचताच त्यांनी रेल्वे स्टेशनवर नेमणुकीस असलेल्या 22 पोलीस कर्मचाऱ्यांची पोलीस मुख्यालयात बदली करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर रेल्वे स्टेशनवर बंदोबस्तासाठी असलेल्या एक पोलीस उपअधीक्षक, दोन पोलीस निरीक्षक, दोन पोलीस उपनिरीक्षक आणि चार सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदलीचे आदेश दिले आहेत.

-----------------------

आरोग्य सुविधांअभावी रस्त्यावरच तडफडत जीव सोडणारे रुग्ण, जीवनावश्यक औषधांचा काळाबाजार या आणि अशा अनेक माणुसकीचे अध:पतन करणाऱ्या घटना गेल्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळाल्या आहेत. यामध्ये आता आणखी एका घटनेची भर पडली आहे. धुळ्यातील एका रुग्णालयात उपचाराधीन असलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी त्याच्या खिशातील पैसे चोरल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे माणुसकी खरंच संपली आहे की काय, असा प्रश्न पुन्हा एकदा उद्भवला आहे

धुळ्यातील श्री गणेशा मल्टी स्पेशालिटी दवाखान्यात हा प्रकार घडला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. यामध्ये रुग्णालयातील एक कर्मचारी मृताच्या खिशातील पैसे काढताना दिसत आहे. मृतदेह नातेवाईकांकडे सोपवण्यापूर्वी तो व्यवस्थित पॅक करण्यात आला. रुग्णालयातील चार तरुण कर्मचाऱ्यांनी हे काम केले. त्यावेळी या तरुणांनी मृतदेह ठेवण्यात आलेल्या बॅगची चेन उघडून रुग्णाच्या खिशात असलेली रोकड काढून घेतली.  त्यानंतर मृतदेह नातेवाईकांकडे सोपवण्यात आला. ही गोष्ट नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी रुग्णालय प्रशासनाला याबद्दल कळवले. त्यांच्या दाव्यानुसार, मृत रुग्णाच्या खिशातील 35 हजार रुपये लंपास करण्यात आले आहेत.

काही दिवसांपूर्वी नाशिकच्या रुग्णालयातही मृत महिलेच्या गळ्यातील अडीच तोळ्यांची सोन्याची पोत चोरी झाल्याचा प्रकार समोर आला होता. स्पंदन रुग्णालयात हा प्रकार घडला होता. मृत महिलेल्या मुलाने याप्रकरणी पोलिसांत फिर्याद नोंदविली होती. गौरव शिंदे यांच्या आई कल्याण शिंदे यांची कोरोनामुळे तब्येत खालावली. त्यांना कुटुंबीयांनी राजीव गांधी भवन परिसरातील स्पंदन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचार सुरु असताना, त्यांचा मृत्यू झाला. हॉस्पिटलने मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. मात्र, शिंदे यांच्या गळ्यातील तब्बल अडीच तोळ्यांची सोन्याची पोत चोरीला गेल्याचे उघडकीस आले. ही बाब गौरव शिंदे यांनी हॉस्पिटल प्रशासनाच्या लक्षात आणून दिली. हॉस्पिटल प्रशासनाने उपस्थित कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली. सीसीटीव्ही तपासले. मात्र, त्यातून चोरी गेलेली पोत सापडत नसल्याने गौरव शिंदे यांनी सरकारवाडा पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA