ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी शासने मंजुरी द्यावी
आरोग्य व बांधकाम समिती सभापती कुंदन पाटील
राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन दिले निवेदन
ठाणे - देशात, राज्यात व पर्यायाने सर्व जिल्हयात सद्या कोविड -१९ या संसर्गजन्य रोगाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलेले असून जागतिक आरोग्य संघटना, केंद्र शासन व राज्य शासनाने नेमून दिलेल्या उपाययोजना राबवून ही साथ आटोक्यात आणण्यासाठी ठाणे जिल्हयात कसोशीने प्रयत्न करण्यात येत आहेत. परंतु आरोग्य विभागातील रिक्त पदांचे प्रमाण जास्त असल्याने सद्या कार्यरत कर्मचाऱ्यांकडून प्रभावी उपाययोजना राबविणेवर मर्यादा येत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य विभागातील आरोग्य सेवक ( महिला ) संवर्गातील १४४ रिक्त पदे कंत्राटी (आऊटसोसींग) पध्दतीने तात्पुरत्या स्वरुपात जि. प. स्वनिधीतुन भरण्याची परवानगी मिळावी यासाठी आरोग्य व बांधकाम समिती सभापती कुंदन पाटील यांनी आज राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन निवेदन दिले.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत एकूण ३३ प्राथमिक आरोग्य केंद्र व १९० उपकेंद्र मंजुर आहेत. आरोग्य सेवक ( महिला ) गट क वर्गातील एकूण मंजूर पदे ३४६ असून २०२ पदे भरलेली आहेत तर १४४ (४२ %) पदे रिक्त आहेत. ठाणे जिल्हा परिषदे अंतर्गत एकूण ०५ तालुके असून त्यापैकी शहापूर हा तालुका १०० % पेसा क्षेत्र आहे. तर भिवंडी व मुरबाड हे दोन तालुके पेसा व नॉनपेसा आहेत. नॉनपेसा क्षेत्राची लोकसंख्या स्थलांतरीतांमुळे व वाढत्या शहरीकरण्यामुळे झपाटयाने वाढलेली असून या क्षेत्रातील वैद्यकीय संस्था व आरोग्य संवर्गातील पदे मात्र सन २००१ च्या लोकसंख्येवर आधारीतच आहेत. जिल्हा परिषद सर्वसाधारण सभा, स्थायी सभा व आरोग्य समिती सभेत एएनएम संवर्गाची रिक्त पदे तात्काळ भरणेसाठी अनेक वेळा चर्चा झालेल्या असून शासनाकडून नियमित पदांची भरती होईपर्यन्त जिल्हा परिषद सेस फंडातुन एएनमची रिक्त पदे तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पध्दतीने आऊटसोसींगने मानधन तत्वावर भरणेसाठी ठराव देखील मंजूर झालेला आहे.
ठाणे जिल्हा परिषदेअंतर्गत आरोग्य सेवक ( महिला ) संवर्गाची एकूण रिक्त असलेली १६६ पदे किंवा प्रत्यक्ष रिक्त असलेली १४४ पदे कोविड - १९ संसर्गजन्य रोगाचा संसर्ग आटोक्यात येईपर्यन्त अत्यंत तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी आऊटसोसींग पध्दतीने सेस फंडातील अनुदानातुन मानधन तत्वावर भरणेसाठी विशेष बाब म्हणून शासनाची मान्यता मिळावी, जेणे करुन कोविड - १९ महामारीवर नियत्रंण मिळविण्यासाठीच्या उपाययोजना राबविणे व शासन निर्देशानुसार नागरिकांचेकोविड - १९ लसीकरणाचे कामकाज यशस्वीरित्या पूर्ण करणे या जिल्हा परिषदेस सोईचे होईल.अशी मागणी श्री. पाटील यांनी आरोग्य मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
ही आहेत आरोग्य सेवक ( महिला ) कर्मचाऱ्यांची कामे- कोविड - १९ रोगांतर्गत गावपातळीवर सर्व गाव /पाडे /वाडी /वस्तीचे सर्वेक्षण करणे, रुग्ण शोधणे, उपाययोजना करणे, कंटेनमेंट झोन तयार करणे, कोविड - १९ पॉझीटीव रुग्णांवर औषधोपचार करणे व कोविड - १९ प्रतिबंधात्मक लसीकरण करणे, नियमित अहवाल तयार करुन वरिष्ठांना सादर करणे इ. कोविड - १९ संदर्भातील अतिरिक्त कामकाजासह प्रा.आ.केंद्राचे /उपकेंद्राचे नियमित कामकाजामध्ये प्रा.आ.केंद्र /उपकेंद्र स्तरावर ग्रामस्थांना वैद्यकिय सेवा पुरविणे, गाव पाडयांतर्गत फिरती व सर्वेक्षण करणे, नेमुन दिलेले देनिक / साप्ताहिक / मासिक अहवाल तयार करुन वरिष्ठांना सादर करणे, गरोदर मातांची नियमित तपासणी , औषधोपचार व प्रसुती करणे, २४ तास रुग्णालय सुरु ठेवण्यासाठी दिवसपाळीसह रात्रपाळी करणे, पल्स पोलिओ व त्यासारख्या शासनाच्या विविध योजना राबविणे, शालेय विदयार्थी तपासणी, आश्रमशाळा विद्यार्थी तपासणी इ. कामकाज.
0 टिप्पण्या