ब्रम्हांड कट्टयाच्या तपपूर्ती सोहळयाची काव्यमय 'आनंदयात्रा'

दिशदिशांत रोवला ध्वज किर्तीचा.
नेत्रदिपक सोहळा रंगला तपपूर्तीचा! 


ठाणे : 

ब्रम्हांड कट्टा हे नाव गेली १२ वर्षे ठाणेकरांच्या मनावर  अधिराज्य गाजवत आहे.  नवनवीन कलाकारांमधील गुण हेरुन व त्यांना प्रोत्साहन देऊन आपली ही सामाजिक व सांस्कृतिक चळवळ ब्रम्हांडकट्टयाने अविरत चालु ठेवली आहे आणि हाच समाजसेवेचा वसा पुढे नेत दिनांक २१ मार्च २०२१ रोजी ब्रम्हांडकट्टयाचा हर्षोल्हासित तपपूर्ती सोहळा अॉनलाईन माध्यमातून पार पडला. ब्रम्हांडकट्टयाचे संस्थापक  राजेश जाधव यांनी त्यांचे कुटुंब तसेच ब्रम्हांड कट्टा परिवारातील सर्व सदस्यांचे आभार मानत कट्ट्याच्या इथवर प्रवासाची व भविष्यातील योजनांची माहिती दिली. वर्धापनदिनाची सुरुवात संगीत विशारद  रविंद्र देसाई यांच्या सुश्राव्य गायनाने झाली. राग वृदांवनी सारंग सरगम गीत व तराणा यांची झलक देऊन त्यांनी रसिकांना तृप्त केले.


वर्धापनदिन सोहळयाला चारचांद लावले ते प्रसिद्ध कवि, गीतकार, स्तंभलेखक, निवेदक, मोटिवेशन स्पीकर व आनंदयात्रा या जगप्रसिद्ध  एकपात्री कार्यक्रमाचे कर्ताधर्ता  प्रसाद कुलकर्णी यांनी. ब्रम्हांड कट्टयाचे अध्यक्ष  महेश जोशी यांनी प्रसाद कुलकर्णी यांची अतिशय खुमासदार तसेच माहितीपर मुलाखत घेतली. 'प्रेम म्हणजे काय रे, दुधावरची साय रे. आपुलकीची उब मिळताच, सहज उतू जाय रे.' ह्या हृदयाला हात घालणाऱ्या कवितेने सुरु झालेला मुलाखतीचा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगतच गेला. मनामनावर उत्कटतेचे अत्तर शिंपडणाऱ्या अनेक कविता  कुलकर्णी यांनी सादर केल्या. 'आई' या कवितेने रसिकांची मने व्याकुळ केली तर प्रेयसीला आर्त साद घालणाऱ्या काव्याने तर जणू प्रेमाची बरसात केली. मालवणी भाषेची गोडी दर्शविणाऱ्या 'छनक छनक छनक छुम्' या कवितेने वातावरण पैंजणांच्या नादाने भरुन गेले. शब्दांचा वरदहस्त लाभलेले हे कवि मराठी शुभेच्छापत्रांचे आद्यप्रवर्तक असुन मधुमंगेश कर्णिक यांनी त्यांना 'शुभेच्छांचा सौदागर' अशी उपाधी दिली आहे. मराठी भाषेची आसक्ती असणाऱ्या  कुलकर्णी यांचा 'आनंदयात्रा' हा आयुष्याकडे सकारात्मकतेने बघावयास शिकविणारा कार्यक्रम सातासमुद्रापार  झेंडा रोवून आला आहे. मराठी शुभेच्छापत्रांच्या चाहत्यांसाठी त्यांची 'प्रासादिक' ही अॅप उपलब्ध आहे.

अशा या रंगतदार कार्यक्रमाच्या जादूने रसिकांच्या मनाचा असा काही ताबा घेतला की हा सोहळा संपूच नये असे प्रेक्षकांना वाटत होते आणि हिच ब्रम्हांड कट्ट्याच्या प्रत्येक संकल्पनेची  खासियत असते. गेली १२ वर्षे अविरतपणे ब्रम्हांड कट्टा समाजाला सामाजिक तसेच सांस्कृतिक सेवा देत आला आहे. संस्थापक  राजेश जाधव यांनी हा सर्व परिवार त्यांचे परिश्रम, कलासक्ती, मार्गदर्शन व दुरदृष्टी यांनी घट्ट् बांधून ठेवला असून एक तप यशस्वीरित्या पूर्ण केले. ब्रम्हांड कट्टा हे समाजसेवेचे व्रत अखंड चालू ठेवेल व काळानुरुप तांत्रिक दृष्ट्याही पुढे पाऊल टाकेल अशी ग्वाही देत संस्थापकांनी या यादगार वर्धापनदिन सोहळ्याची सांगता केली.


 ब्रम्हांड कट्टयाचे कार्यक्रम पहाण्यासाठी QR code आपल्या मोबाइलच्या कॅमेरा मध्ये धरा.. व कार्यक्रमाचा आस्वाद घ्याटिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad