Top Post Ad

विलास वाघ : बुद्धाच्या पाऊलखुणांचे शोधयात्री

समाजकारणात जवळपास साठ वर्षे सक्रिय असलेल्या आयुष्मान विलास वाघसरांचे 25 मार्चला कोरोना संसर्गाने दुःखद निधन झाले. कोरोना संसर्गाने अनेक जीवलगांना आपल्यापासून दूर नेले आहे. वाघसरांच्या जाण्याचे दुःख विसरता न येण्याजोगे आहे. पुण्याच्या सदाशिव पेठेत आंबेडकरी विचारांच्या प्रसारासाठी प्रकाशन व्यवसाय सुरू करायचा आणि तो यशस्वीपणे चालवायचा- यासाठी हिंमत तर पाहिजेच, त्याचबरोबर चिकाटी आणि दूरगामी नियोजनही हवे. ते सगळं त्यांनी व उषातार्इंनी करून दाखवलं. ते अनेक आघाड्यावर सक्रिय होते, पण सुगावा प्रकाशन हीच त्यांची खरी ओळख राहिली. त्यांच्या मृत्यूनंतर सुगावाचे वाचक दुःखी झाले, तसेच त्यांनी उभ्या केलेल्या आश्रमशाळांतील मुली-मुले दुःखी झाली आणि त्यांनी आजवर जे असंख्य आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाह घडवून आणले, ती विवेकाच्या वाटेवरची जोडपीही दुःखात बुडाली. 

सामाजिक विषमतेचे चटके वाघसरांनी लहानपणापासून स्वतःच अनुभवले असल्याने, त्याविरोधात स्पष्ट भूमिका घेत सक्रिय होण्याचे बाळकडू त्यांना लहानपणीच मिळाले होते. आपल्या कामामागची वैचारिक प्रेरणा ही म.फुले, शाहूमहाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांची आहे; मात्र आयुष्यात काही तरी करून दाखवायचे, ही कृतिशीलतेची प्रेरणा मात्र आपल्याला आपल्या निरक्षर पण हुशार व कष्टाळू आईकडून मिळाली, असे ते आवर्जून सांगायचे. धुळे जिल्ह्यातील मोराणे हे त्यांचे गाव. दि.1 मार्च 1939 रोजीचा त्यांचा जन्म. मोराणे गावातच त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण झाले. वाघसरांनी पुण्याच्या स.प. महाविद्यालयातून 1962 मध्ये विज्ञान शाखेतील पदवी शिक्षण पूर्ण केले. आंबेडकरी चळवळीच्या प्रबोधनाची पताका त्यांनी खांद्यावर घेतली होती. 

राष्ट्रसेवा दलाच्या प्रांगणातही ते तितक्याच मोकळेपणाने रमायचे. राष्ट्रसेवा दलाच्या शिक्षण प्रसारक मंडळाचे ते काही काळ अध्यक्ष होते. सोशॅलिस्ट फ्रंटच्या स्थापनेपासून आणि पुढे समाजवादी जनपरिषद या पक्षातही त्यांनी सहभाग नोंदवला. त्यानिमित्ताने देशभरातील समाजवादी कार्यकर्त्यांशी त्यांची मैत्री जमली होती. त्यांच्या निधनानंतर साथी योगेंद्र यादव यांनी नोंदवलेली भावुक प्रतिक्रिया बोलकी होती. समाजवादी कार्यकर्त्यांबरोबरच्या संवादाची सुरुवात ते अनेकदा, ‘तुम्ही बौद्ध कधी होणार?’ या प्रश्नाने करायचे. समोरून थेट उत्तराऐवजी काही तरी स्पष्टीकरण यायला लागलं की लगेच पुढे म्हणायचे, ‘राहू द्या, राहू द्या! हिंदू धर्मात राहून तुम्ही कसला जातीअंत करणार आहात!’ या वैचारिक हल्ल्याने समोरचा समाजवादी कार्यकर्ता बिचकला की, मग मोकळेपणाने त्याच्या खांद्यावर हात टाकून त्या कार्यकर्त्याला विश्वासात घेत पुढील कार्यक्रमाच्या नियोजनाची चर्चा सुरू करायचे. वैचारिक आग्रह दुराग्रहात रूपांतरित होऊ द्यायचे नाहीत आणि वैयक्तिक संबंधांत कधी कटुता येऊ द्यायची नाही, हा सम्यक्‌ मार्ग त्यांच्याकडून शिकण्यायोग्य होता. आंबेडकरी चळवळीतील ते खरे तर समाजवादी व आंबेडकरी चळवळीतला दुवा होते, असे नक्कीच म्हणता येईल.

वाघ यांनी आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात राष्ट्रीय व सामाजिक मूल्यांच्या प्रसारासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनच्या प्रौढ शिक्षण कार्यक्रमात महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे. त्यांनी पुणे रेल्वे स्टेशनवरील शालाबाह्य मुलांसाठी एक अनौपचारिक शिक्षण केंद्र वर्षभर चालवले. पुण्याच्या वडारवाडी परिसरात त्यांनी बराच काळ एक बालवाडी चालवली. सर्वेषां सेवा संघामार्फत त्यांनी देवदासींच्या मुली-मुलांसाठी पहिले वसतिगृह सुरू करून यशस्वीपणे चालविले आहे. वैदू महिलांसाठी शिक्षणवर्ग चालवले, वडारवाडी परिसरातील महिलांसाठी शिवणकाम विद्यालय सुरू केले. त्यांनी शिक्षणक्षेत्रात दीर्घ काळ मोलाचे कार्य केले. स्वतः पुढाकार घेऊन समता शिक्षण संस्थेची स्थापना केली. 

समता शिक्षण संस्थेमार्फत त्यांनी तळेगाव ढमढेरे, जिल्हा पुणे येथे कस्तुरबा मुलींचे वसतिगृह सुरू केले. तेथेच नंतर भटक्या-विमुक्त जमातींच्या मुली-मुलांसाठी आश्रमशाळाही त्यांनी सुरू केली. याच समता शिक्षण संस्थेच्या वतीने त्यांनी आपल्या जन्मगावी म्हणजे मोराणे येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने समाजकार्य महाविद्यालय सुरू करून यशस्वीपणे चालवून दाखवले. ते शिक्षणसम्राट झाले नाहीत; पण द्रोणाचार्यांनी शिक्षणाचा अधिकार नाकारलेल्या एकलव्याच्या अनेक वारसांना अंगठ्याचे दान न मागता शिक्षण मिळावे, यासाठी आयुष्याच्या अंतापर्यंत ते झटत राहिले. वाघसरांच्या जाण्याने ते सगळे एकलव्य भावविवश झाले होते.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रौढ आणि निरंतर शिक्षण विभागातही त्यांनी काही काळ काम केले. तिथेच त्यांची उषातार्इंशी ओळख झाली आणि या ओळखीचे प्रेमात परिवर्तन होऊन त्यांचा आंतरजातीय विवाह झाला. विद्यापीठातील नोकरीचा राजीनामा देऊन त्या दोघांनी स्वतंत्रपणे सामाजिक कार्य सुरू केले आणि मग पुढे जी अनेक मोठमोठी कामे केली गेली, ती या दोघांनी मिळूनच केली. ते आणि उषातार्इंचे सहजीवन हे म.फुले आणि सावित्रीबाई या जोडीसारखेच परस्परपूरक व संवादी होते. त्यांचा आपसातला स्नेह आणि विश्वास हा नव्या जोडप्यांसाठी मार्गदर्शक असाच होता. अर्थात विवेकी सहजीवन म्हणजे केवळ एकमेकांबद्दल आदर व कौतुक असे नसते आणि नसावेही. एकमेकांच्या व्यक्तिमत्त्वातील न्यून हळुवारपणे लक्षात आणून देत दोघांनीही परस्परांचे व्यक्तिमत्त्व अधिक समृद्ध करत जाणे, हाच विवेकी सहजीवनाचा अर्थ असतो. ते आणि उषातार्इंचे सहजीवन हे असेच आदर्श होते. विवेकी सहजीवनामधून एकाची साथ सुटणे हे मागे राहिलेल्यासाठी जरा जास्तच त्रासदायक असते. उषातार्इंना या दुःखातून सावरण्याचे बळ निर्मिक देवो.

फुले-शाहू-आंबेडकरी विचारांच्या प्रसारात वाघसर आणि उषातार्इंनी स्थापन केलेले सुगावा प्रकाशन हा एक मैलाचा दगड आहे. आधी म्हटल्याप्रमाणे पुण्याच्या सदाशिव पेठेत या ध्येयासाठी प्रकाशन व्यवसायात जम बसवणे, हे नक्कीच धाडसाचे काम होते. आज सुगावा प्रकाशन हे नाव सर्वांच्या तोंडी आहे, त्याला मान्यता आहे. असे असले तरी हा प्रवास त्या वेळी सोपा नव्हता आणि आजही सोपा नाही. यासाठी किती खस्ता खाव्या लागल्या, किती कडू-गोड अनुभवांना सामोरं जावं लागलं ते वाघसर आणि उषाताईच जाणोत. आंबेडकरी विचारांवरील अविचल निष्ठा आणि त्यासाठी सर्व प्रकारचे कष्ट करण्याची तयारी असल्याशिवाय हे शक्य नव्हते. सुगावा प्रकाशनाने जसे डॉ.रावसाहेब कसबे, डॉ.सुखदेव थोरात, डॉ. यशवंत मनोहर, उत्तम कांबळे यांच्यासारख्या मान्यवरांची पुस्तके प्रकाशित केली, तसेच त्यांनी आंबेडकरी चळवळीतील अनेक नवोदित लेखकांनाही लिहिते केले. ‘माझा भाऊ- अण्णा भाऊ’ हे सुगावाचे पहिले पुस्तक. डॉ. रावसाहेब कसबे यांनी लिहिलेले ‘आंबेडकर आणि मार्क्स’ हे दुसरे पुस्तक. कथा-कादंबऱ्या प्रकाशित न करता केवळ वैचारिक साहित्याला आणि त्यातही आंबेडकरी विचारांच्या साहित्याला वाहून घेणे हे काम ध्येयासाठी वेडे होणाऱ्यांना व त्यासाठी वैयक्तिक आयुष्यात अनेक आव्हानांना भिडण्याची तयारी असणाऱ्यांनाच जमू शकते. 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर चरित्रखंड, डॉ.आंबेडकर आणि हिंदू कोड बील, डॉ.भा. ल. भोळेलिखित आंबेडकरांचा वैचारिक वारसा, उत्तम कांबळेसरांचे वामनदादांच्या गीतातील भीमदर्शन, गं. बां. सरदारलिखित गांधी आणि आंबेडकर, डॉ.रावसाहेब कसबे यांचे डॉ.आंबेडकर आणि भारतीय राज्यघटना, य. दि. फडकेसरांचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि काळाराम सत्याग्रह अशी एकापेक्षा एक मौल्यवान पुस्तके सुगावा प्रकाशनाने दिली व वाचकांपर्यंत पोहोचवली. शोषितांचे नेते आणि संविधाननिर्माते याशिवाय बाबासाहेबांच्या कर्तृत्वाचे इतर अनेक दुर्लक्षित पैलू समाजासमोर आणण्यासाठी काही विशेष पुस्तके सुगावाने प्रकाशित केली. डॉ.सुखदेव थोरात यांनी लिहिलेले डॉ.बाबासाहेब आंबेडकर : नियोजन जलविद्युत विकास भूमिका व योगदान तसेच विजय खरेलिखित डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रीय सुरक्षा, डॉ.भालचंद्र मुणगेकर यांचे भारतातील आर्थिक सुधारणा आणि डॉ.आंबेडकर ही त्या अर्थाने सुगावा प्रकाशनाची महत्त्वाची पुस्तके ठरावीत. जिथे वाचक तिथे पुस्तके पोहोचविण्यासाठी त्यांनी व उषातार्इंनी जे अविश्रांत कष्ट घेतले, तशी मेहनत अन्य कुठल्याही प्रकाशनाने घेतलेली मला आठवत नाही. पुस्तकांचे गठ्ठे उचलणे, वाहनात चढवणे, गठ्ठे उतरवणे ही कामेसुद्धा त्या दोघांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत अनेकदा केलीत. 

दि.6 डिसेंबर आणि 14 एप्रिलला विविध शहरांत तसेच मोठ्या कार्यक्रमांच्या व अधिवेशनांच्या स्थळी सुगावाचे स्टॉल लागावेत आणि पुस्तके वाचकांपर्यंत पोहोचावीत यासाठीची त्यांची धडपड वाचकांचा प्रतिसाद मिळाला की, सत्कारणी लागायची. पुस्तक प्रकाशनासोबतच सुगावा नियतकालिकातून अनेक महत्त्वाच्या विषयांवरील प्रबोधन साहित्य हे कार्यकर्ते व वाचकांसमोर ठेवून या विचारांची एक जनचळवळ उभी राहावी, असा वाघसरांचा प्रयत्न असायचा. आंबेडकरी राजकारणाची चिकित्सा आणि भविष्यासाठी दिशादर्शन हा त्यातील महत्त्वाचा विषय असायचा. आंबेडकरी प्रबोधन चळवळीत सुगावाचे स्थान सतत अग्रभागी राहील आणि वाघसरांचे स्मरणही त्या निमित्ताने सतत होत राहील.

परिवर्तन मिश्रविवाह संस्थेच्या वतीने आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह करू इच्छिणाऱ्या युवती-युवकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहायचं कामं तर त्यांनी ज्या बांधिलकीने केलं, ती सलाम करण्याजोगीच आहे. त्यांच्या व उषातार्इंच्या मदतीने असंख्य विवाह झाले आणि यशस्वी झाले. एस.एम.जोशी सोशलिस्ट फाउंडेशनची वास्तू ही त्यासाठी त्यांच्यासहित इतरांनी पण हक्काची जागा मानलेली आहे. या कामात पण केवळ विवाह लावून देणे एवढेच कर्तव्य त्यांनी कधी मानले नाही. आर्थिक दृष्ट्या सक्षम नसलेल्या जोडप्यांच्या पाठीशी ते आई-वडिलांच्या मायेने उभे राहिले. जोडप्याचा संसार नीट मार्गी लागेपर्यंत लक्ष ठेवत राहिले. नवरी आणि नवरा दोन्हीकडच्या घरच्यांची सहमती असेल, तर आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाहांना अनेक जण उपस्थित राहतात. शुभेच्छा वा आशिर्वाद देतात. पण दोनपैकी एक किंवा दोन्हीकडच्या घरच्यांचा विरोध असेल आणि तणाव असेल, तर मोजकेच लोक मदतीला तयार असतात. अशा मोजक्या लोकांमध्ये ते आघाडीवर असायचे. पोलीस स्टेशन असो की कोर्टबाजी असो- वाघसर ती स्वतःची जबाबदारी समजून हजर असणार, पुढाकार घेणार. आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाह केलेल्या अनेक जोडप्यांच्या मनात वाघसरांच्या जाण्याने आज पोरकेपणाची भावना आहे, तशी ती चळवळीतील अनेक विद्रोही तरुणी-तरुणांच्या मनात पण आहे. कारण बंडखोर तरुणाईच्या पाठीशी उभे राहताना वाघसर संभाव्य नुकसानीचा हिशोब कधी मांडायचे नाहीत.

विलास वाघसर हे बोलके समाजकारणी नसून क्रियाशील कार्यकर्ते तर होतेच, पण त्यांनी आपल्या कामाला कप्पेबंद स्वरूपही कधी येऊ दिले नाही. सुगावा प्रकाशन व सुगावा नियतकालिक तसेच परिवर्तन मिश्रविवाह संस्था आणि समता शिक्षण संस्था हा सगळा व्याप सांभाळतानाच समविचारी जनआंदोलनांच्या लढ्यांना साथ देण्यासाठी पण ते आवर्जून वेळ काढायचे. 1976 च्या विषमता निर्मूलन शिबिराने ‘एक गाव- एक पाणवठा’ची हाक देताच त्यांनी पुणे जिल्ह्यातील 40 गावांना भेटी दिल्या. जातीयता या विषयावर गावकऱ्यांशी संवाद साधला. पाणवठे सर्वांना खुले करण्याचा प्रयत्न केला. मला आठवतंय तसं पुणे शहरात शिक्षण हक्क आंदोलन असो, कष्टकऱ्यांच्या सामाजिक सुरक्षेचा विषय असो, की नर्मदा बचाव आंदोलन समर्थक गटाचे धरणे आंदोलन असो किंवा जादूटोणाविरोधी कायद्याची मागणी असो; ते कार्यकर्त्यांच्या भूमिकेतून हातात फलक घेऊन पाठिंब्यासाठी उभे असत. सामाजिक समतेच्या चळवळीत एवढं प्रचंड योगदान आणि अनुभव असूनही त्यांच्या वागण्या-बोलण्यात कुठलाही अभिनिवेश नसायचा. ‘मी कुणी तरी आहे’ असा भाव नसायचा. माझी जबाबदारी म्हणून मला जे शक्य आहे तेवढं माझं योगदान द्यायला मी आलोय, हा साधा भाव असायचा. बुद्धाबद्दल बोलणं सोप आहे, त्या मार्गावर चालणे अवघड आहे. बुद्धाच्या पाऊलखुणांवर चालताना ते इतरांच्या किती तरी पुढे होते. त्यांना विनम्र अभिवादन!

  - सुभाष वारे
(साधना साप्ताहिकातील लेख)

            

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com