Top Post Ad

हरिनिवास नाका रिकामा करण्यासाठी बाऊंसरचा वापर... नाका कामगारांवर मेहता बिल्डरची अरेरावी

 


कोरोना प्रादुर्भावाने सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले असतानाच गरीब मजूर, कामगारांना तर जीवन जगणे असह्य झाले आहे. त्यातच नाका कामगारांचे हाल अधिक होत आहेत. हाताला काम नसले तरी दिवसभर नाक्यावर थांबून काही मिळते का या विवंचनेत असलेले हे कामगार फार कठीण अवस्थेत जीवन जगत आहेत.  ठाण्यातील कळवा नाका, जांभळी नाका, काबुरबावडी नाका, हरीनिवास नाका आदी नाक्यावर हे कामगार कामासाठी वाट पहात उभे रहातात. मात्र आता हे नाके देखील बिल्डर आणि नगरसेवक लॉबी आपले अड्डे बनवत आहेत. त्याकरिता या कामगारांना तिथून हुसकावून लावण्याचे प्रकार सुरु झाले आहेत.  हरिनिवास नाक्यावरील कामगारांना हुसकावून लावण्यासाठी चक्क बाऊंसरच ठेवण्यात आले आहे. इथल्या बिल्डर लॉबीने स्थानिक नगरसेवकांशी आर्थिक लागेबांधे करून हा नाका रिकामा करण्याचे षडयंत्र केले असल्याचा आरोप असंघटीत कामगार युनियनचे चंद्रभान आझाद यांनी केला आहे. 

मागील चाळीसहून अधिक वर्षापासून या नाक्यावर आपल्या रोजीरोटीची वाट पहाणारे कामगार आपले हक्काचे ठिकाण म्हणून येथे जमत आहेत. याच ठिकाणाहून त्यांना विविध ठिकाणची कामे मिळत आहेत. हा नाका ठाण्यातील सर्वच लोकांचा परिचयाचा झाला असल्याने लोक छोट्या -मोठ्या कामासाठी माणसं हवी असल्यास येथे येतात. मात्र आता हा नाका बिल्डरने ताब्यात घेतला असून येथील कामगारांना जोरजबरदस्तीने येथून हाकलण्यात येत आहे. यासाठी चक्क एक-दोन नव्हे अनेक बाँऊंसर उभे करण्यात आले आहेत. मेहता बिल्डरच्या माध्यमातून हे बाऊंसर या ठिकाणी तैनात करण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे. 

गरीब-गरजू लोकांवर अत्याचार करणारी  बिल्डर लॉबी आणि त्याला साथ देणारे नगरसेवक आणि लोकप्रतिनिधी, समाजसेवक यांचा तीव्र शब्दात निषेध करण्यात येत असल्याचे आझाद यांनी स्पष्ट केले. या विरोधात पोलिसांत तक्रार नोंदवण्यात येणार असून, पोलिसांनी याबाबत तात्काळ हस्तक्षेप करून या कामगारांना न्याय द्यावा, जर नाका कामगारांचा नाका जबरदस्तीने ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाला तर त्याविरोधात जोरदार आंदोलन करण्यात येईल असे आवाहन चंद्रभान आझाद यांनी केले आहे. 

ठाण्यातील कळवा नाका, जांभळी नाका, काबुरबावडी नाका, इत्यादी ठिकाणी सकाळी 9 नंतर हे कामगार कामाच्या शोधात थांबत असतात.  रोजंदारीवर काम करणाऱया या कामगांरांना दिवसाला मिळणाऱ्या मजूरीवर यांचा उदरनिर्वाह होत असतो. ठाण्यातील कापूरबावडी नाका, शास्त्रीनगर  नाका, जांभळीनाका, कळवा नाका या ठिकाणीही भरपूर प्रमाणात हे कामगार उभे असतात.   यामधील कळवा नाका सोडला तर इतर नाक्यांवर सुमारे 1000 ते 1200 कामगार असतात. तर कळवा नाक्यावर 1500 हून अधिक कामगार असतात. हे सर्व कामगार सकाळी 8 वाजल्यापासूनच कामाची  वाट पहात असतात. टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com