स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेतलेले स्वतःचे सेवक सापडत नाहीत म्हणून आता इतर देशभक्तांना आपल्याच संघाचे म्हणून प्रोजेक्ट करण्याचे षड्यंत्र सुरु आहे. याचा भाग म्हणून शहीद भगत सिंग व शिवराम राजगुरू हे संघाशी कसे जुळले होते हे सुद्धा तोडमोड करून जनतेवर थोपणे सुरु आहे. संघाचे व ABVP चे नेते नरेंद्र सहगल यांनी शहीद शिवराम राजगुरू हे संघाचे सेवक होते असा तद्दन खोटा प्रचार करणे चालवले आहे. या महाशयांनी त्यांच्या “भारतवर्ष की सर्वांग स्वतंत्रता” या पुस्तकात तसा दावाही केला आहे. आपले वेगवेगळ्या पक्षांच्या लोकांशी संबंध असू शकतात, याचा अर्थ आपण त्या पक्षाचे सदस्य असतो असे नाही. त्याप्रमाणे राजगुरू यांचे आरएसएसच्या काही लोकांशी संबंध असू शकतील; पण त्याचा अर्थ ते आरएसएसचे सेवक होते असा मुळीच होत नाही. साँडर्स यांच्या हत्येनंतर ते नागपूरला गेले होते एवढाच काय तो ऐकीव दुवा आहे. तसे ते इतरत्र सुद्धा गेले होते. ते जर आरएसएसचे सेवक होते तर नंतर त्यांनी आरएसएस का सोडला व संघाच्या पूर्ण विरोधी विचारसरणी असलेल्या हिदुस्थान सोशालीस्ट रिपब्लिकन असोसिएशन मध्ये का गेले? याचे स्पष्टीकरण नरेंद्र सहगल यांनी स्पष्ट करायला हवे होते. पण तशी चर्चा त्यांना करायची नाही. ते त्यांना झेपणार सुद्धा नाही व परवडणार सुद्धा नाही. त्यांना फक्त एक गैरसमज पसरवून इतिहासाचे प्रदूषण त्यांना घडवून आणायचे आहे, असे यातून दिसून येते.
हिदुस्थान सोशालीस्ट रिपब्लिकन असोसिएशन व शहीद भगत सिंग हे समाजवादी, साम्यवादी विचार प्रवाहातील होते. तर आरएसएसने समाजवाद व साम्यवाद यांचा सतत विरोध केला आहे. इतकेच नव्हे तर समाजवादी व साम्यवादी लोकांना आरएसएसने सतत देशद्रोही म्हणून बदनाम केले आहे, अजूनही करत असतात. संघाला देव, धर्म, हिंदुत्व व संबंधित अंधश्रद्धा यावर आधारित धर्मसत्ताक समाज निर्मिती करायची आहे. पण हिदुस्थान सोशालीस्ट रिपब्लिकन असोसिएशनचे सदस्य देव-धर्म नाकारणारे होते. त्यांना धर्मसत्ताक राष्ट्र नको होते. त्यांना सामाजिक समता असलेले धर्मनिरपेक्ष समाजवादी राष्ट्र निर्माण करायचे होते. धर्मनिरपेक्ष व समाजवादी या मुल्यांची संघाच्या लोकांनी सतत खिल्ली उडविली आहे. शहीद भगत सिंग यांच्या साहित्यातून हे आपल्याला स्पष्टपणे जाणवते. “मी नास्तिक का आहे?” हे भगत सिंग यांचे पुस्तक तर प्रसिद्धच आहे. या पुस्तकातील विचार आरएसएसला कवडीमात्र पचणार नाहीत. आरएसएसचे आदर्श हेडगेवार, शंकराचार्य अशा व्यक्ती होत्या तर हिदुस्थान सोशालीस्ट रिपब्लिकन असोसिएशनचे आदर्श कार्ल मार्क्स, लेनिन असे होते. अशा भिन्न विचारसरणीची राजगुरू यांच्यासारखी व्यक्ती संघात जाणे व रुळणे मुळीच शक्य नाही.
उपलब्ध माहितीनुसार राजगुरू यांनी १९२२ साली त्यांच्या वयाच्या १४ व्या वर्षी घर सोडले. बनारस येथे शिक्षण घेतले, तसेच अमरावतीच्या हनुमान व्यायाम शाळेत व्यायाम विशारद झाले. नंतर हुबळीला डॉ. नारायण सुब्बाराव हार्डिकर यांच्या कॉंग्रेस सेवादलात काम केले. नंतर पुन्हा ते बनारसला गेले. तेथे ते चंद्रशेखर आझाद यांच्या संपर्कात आले. त्यावेळी त्यांना आझाद यांचा धर्मनिरपेक्ष समाजवाद आवडला व त्यांनी पुढील आयुष्य हिदुस्थान सोशालीस्ट रिपब्लिकन असोसिएशनच्या कार्यात झोकून दिले. हा त्यांचा थोडक्यात इतिहास आहे. यात आरएसएस औषधालाही येत नाही. आरएसएसची स्थापना १९२५ ला झाली होती, म्हणजे आरएसएस त्या वेळी १९२८ ला बाल्यावस्थेत होता. इंग्रजांशी मिळते-जुळते घेऊन त्यांचे ब्राह्मण एकतेचे कार्य सुरु होते.
बरे, राजगुरू यांनी साँडर्स वर १९२८ ला गोळ्या झाडल्या होत्या. तेव्हापासून राजगुरू यांच्या नागपूर भेटी विषयी व त्यांच्या कथित सेवक असण्याविषयी १९६० पर्यंत कोणीच काही बोलले नाही. त्या दरम्यान आरएसएसची बरीच पुस्तके प्रकाशित झाली. कोणीही या संबंधांचा साधा उल्लेख सुद्धा केला नाही. पण १९६० मध्ये नारायण हरी पालकर नावाच्या एका आरएसएस च्या नेत्याने एक पुस्तक लिहून त्यात राजगुरू हे नागपूरला आले होते व संघाचे संस्थापक बळीराम हेडगेवार यांना भेटले होते, असे काहीबाही उल्लेख केले होते. त्याचा आधार घेऊन नरेंद्र सहगल यांनी सुतावरून स्वर्ग गाठला व राजगुरू यांना आरएसएसचे सेवक बनवून टाकले. हे पालकर १९३३ ला आरएसएसत आले, त्यामुळे १९२८ च्या घडामोडींचा त्यांचा प्रत्यक्ष काहीही संबंध नव्हता, हेही लक्षात घेतले पाहिजे. जर हे क्रांतिकारक आरएसएसचे सेवक होते तर त्यांना वाचविण्यासाठी आरएसएसच्या लोकांनी काहीच का केले नाही, हाही मोठा प्रश्न आहे. "द लेजंड ऑफ भगत सिंग" या चित्रपटात राजगुरू यांची प्रतिमा बालिश व विनोदी रंगवण्यात आली, पण आरएसएसने त्या विरोधात कधी आवाज नाही उठवला. या आधी भगत सिंग यांनाही आरएसएसचे असल्याचे सिद्ध करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचे भजे झाले होते. तरीही पुन्हा पुन्हा असले उपद्व्याप ते करीत राहतात. रेटून खोटे बोलायचे व वारंवार खोटे बोलत राहायचे हा आरएसएसचा खाक्या आहे. खूप वेळा रेटून खोटे बोलले की भक्त मंडळी कसलाही सारासार विचार न करता त्या गोष्टी पुढे पसरवत राहतात. सदर प्रकरण त्याच वृत्तीचा एक भाग आहे.
नरेंद्र सहगल यांचे पुस्तक फेब्रुवारी २०१८ मध्ये प्रकाशित झाले. अलीकडे त्याच्या प्रती ABVP च्या कार्यकर्त्यांना वाटण्यात आल्या. त्यानंतर मिडीयामध्ये याविषयी तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. आता ही थाप पचत नाही हे स्पष्ट झाले. ज्येष्ठ नेते मा. गो. वैद्य यांनी याबाबतीत जाहीर खुलासा केला. राजगुरू हे आरएसएसचे सेवक कधीच नव्हते असे त्यांनी जाहीरपणे सांगून टाकले. पण नरेंद्र सहगल यांचे खोटारडेपणा केल्याचे पुस्तक मागे घेत आहोत, किंवा रद्द करीत आहोत असे कोणीही आरएसएसवाल्यांनी जाहीर केले नाही. पालकरच्या पुस्तकाचा संदर्भ सहगल यांनी घेतला, उद्या यांच्या पुस्तकाचा सुद्धा संदर्भ घेऊन अशीच विकृत उठाठेव दुसरा कोणीतरी करणार. मीडियातून आरडओरड झाली नसती तर असा खुलासा वैद्यांनी कदाचित केलाही नसता. पालकरांचे पुस्तक १९६० मध्ये प्रकाशित होऊनही वैद्य हे त्याविषयी मूग गिळून बसले होते. यावरून संघाची “खोटं पचत तेवढं पचू द्या” ही रणनीती दिसून येते.
गांधीजींच्या खुनानंतर पेढे वाटणे, राष्ट्रध्वज पायाखाली तुडविणे, राष्ट्रीय सणाला स्वतःच्या मुख्यालयावर राष्ट्रध्वज न उभारणे, स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी न होणे, भारत छोडो आंदोलनात सहभागी न होता इंग्रजांना मदत करणे इत्यादी घटनांचे डाग आरएसएसच्या कपड्यावर आहेत. ते पुसून त्यांना आता देशभक्तीचा मुखवटा घ्यायचा आहे. देशभक्तीचे दाखले वाटत राहायचे आहे. त्यासाठी त्यांची ओढून ताणून केविलवाणी धडपड सुरु आहे. इतिहासातील प्रदूषण टाळण्यासाठी व स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या योध्यांची बदनामी होऊ नये म्हणून आरएसएसचे हे नतद्रष्ट उपद्व्याप हाणून पडणे आवश्यक आहे.
- धनंजय आदित्य
#adinama #आदिनामा
----------------------------
0 टिप्पण्या