Top Post Ad

"अदानी"ने घेतली एनआरसी कंपनीची जागा, कामगारांवर अन्याय होऊ न देण्याची पालकमंत्र्यांची ग्वाही


 कल्याण
अदानी कंपनीने एनआरसी कंपनीची जागा विकत घेतली असून या ठिकाणी न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून कामाला सुरुवात केली आहे, असा आरोप करत एनआरसी कंपनीच्या कामगारांनी आंदोलन सुरू केले आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी  या आंदोलकांची भेट घेतली. राज्य सरकार एनआरसी कामगारांच्या पाठीशी असून कोणावरही अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील याबाबत संवेदनशील असून आंदोलकांच्या प्रतिनिधींशी लवकरच मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक आयोजित करण्याचे आश्वासनही  शिंदे यांनी दिले. गेली १३ वर्षे एनआरसी कामगार आपल्या न्याय्य हक्कांसाठी लढा देत असून त्यांचा हा लढा वाया जाऊ देणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः या प्रश्नाची दखल घेतली असून आंदोलकांचे प्रतिनिधी आणि कंपनीचे प्रतिनिधी यांच्यासमवेत तातडीने बैठकीचे आयोजन करण्यात येईल, असे  शिंदे यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान मी कल्याणकर सामाजिक संस्थेचे नितीन निकम, कैलास शिंदे आणि उमेश बोरगावकर आंबिवली नजीक उल्हास नदीजवळ आंदोलनाला बसले होते. त्यांची देखील भेट शिंदे यांनी घेतली. याप्रसंगी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, उल्हासनगर महापालिका आयुक्त ए. एन. राजा, जिल्हा परिषद सीईओ, तसेच सगुणा बागेचे प्रगतिशील शेतकरी व मायक्रोबायॉलॉजिस्ट शेखर भडसावळे, आमदार विश्वनाथ भोईर, शांताराम मोरे आदी उपस्थित होते.  

ठाणे जिल्ह्यातील बव्हंशी नागरी भागांना पाणीपुरवठा करणाऱ्या उल्हास नदीत दरवर्षी उद्भवणाऱ्या जलपर्णीच्या समस्येवर जैव तंत्रज्ञानाच्या साह्याने कायमस्वरुपी तोडगा काढण्यात येत असल्याची ग्वाही ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी येथे दिली. सध्या अस्तित्वात असलेल्या जलपर्णी जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने नष्ट करून, नदीचे पाणी शुद्ध करून पुन्हा जलपर्णी निर्माण होऊ नयेत, यासाठी पावले उचलण्यात येत असल्याचे शिंदे यांनी सांगितले.  शिंदे यांनी दिलेल्या ग्वाहीनंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले.

भडसावळे यांनी विकसित केलेल्या तंत्रज्ञानाच्या मदतीने औरंगाबाद येथे ४० एकरवर पसरलेल्या डॉ. सलीम अली तलावातील जलपर्णी दोन वर्षांपूर्वी नष्ट करण्यात आली होती. त्यानंतर गेल्या दोन वर्षात तिथे ही समस्या पुन्हा उद्भवलेली नाही. याच तंत्रज्ञानाची मदत उल्हास नदीतील जलपर्णीची समस्या निकाली काढण्यासाठी घेण्यात येणार आहे. तसेच, तातडीची बाब म्हणून सोमवार पासून मॅन्युअल पद्धतीने जलपर्णी काढण्यास सुरुवात करण्याचे आदेश शिंदे यांनी यावेळी दिले. उल्हास नदीत मिसळणाऱ्या सांडपाण्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर महापालिका यांच्या माध्यमातून एसटीपी उभारले जात आहेत. खेमाणी येथील एसटीपीचे काम पूर्ण झाले असून कल्याण-डोंबिवली हद्दीतील ५ एसटीपीचे काम मे अखेरीपर्यंत पूर्ण होणार आहे. म्हारळ नाल्यावरही एसटीपी उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश शिंदे यांनी यावेळी दिले. तसेच तातडीची बाब म्हणून या नाल्याच्या मुखाशी बांध घालून सांडपाणी थेट नदीत मिसळणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देश शिंदे यांनी दिले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com