मुंबई
सोलापूर जिल्ह्यातल्या रणजितसिंह डिसले यांचं नाव आता जगभर झालं आहे. युनेस्को व लंडनस्थित वार्की फाऊंडेशनचा ‘ग्लोबल टीचर’ पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्हा परिषद सोलापूरचे शिक्षक रणजितसिंह महादेव डिसले यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभासाठी सरकारने डिसले यांच्या आई पार्वती आणि वडील महादेव डिसले यांनाही खास निमंत्रित केलं होतं आणि त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड-गोडसे, परिवहन मंत्री ॲड. अनिल परब, राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी डिसले यांच्या कामाचं कौतुक करत त्यांना राज्य सरकार पूर्ण मदत करेल असं आश्वासनही दिलं. राज्यात प्राथमिक शिक्षणात अमुलाग्र परिवर्तन घडवून आणण्यासाठी राज्य सरकारने एक टास्क फोर्स तयार केला आहे. त्याच्या माध्यमातून आता ‘डिसले पॅटर्न’ राज्यभर राबविण्यात येणार आहे.
राज्यातल्या काना कोपऱ्यात हा प्रयोग घेऊन जाणार असल्याची इच्छा डिसले यांनी कार्यक्रमानंतर व्यक्त केली. राज्यात असे अनेक शिक्षक निर्माण झाले पाहिजेत असंही ते म्हणाले.
महाराष्ट्रात क्यूआर कोडची सुविधा सर्वांत आधी रणजित यांनी सुरु केली. याचबरोबर 2017 मध्ये महाराष्ट्र सरकारला देखील त्यांनी या पद्धतीने सर्व सिलॅबस जोडण्याचा सल्ला दिला होता. सुरुवातीला प्रायोगिक स्तरावर त्यांचा हा प्रस्ताव स्वीकारण्यात आला. त्यानंतर आता सरकारने सर्व श्रेणीच्या विद्यार्थ्यांमधे राज्य सरकार क्यूआर कोडची सुविधा उपलब्ध करून देणार आहे. एनसीईआरटीनेदेखील याची घोषणा केली आहे.
क्यूआर कोडचा (QR Code) क्विक रिस्पॉन्स कोड हा फुलफॉर्म आहे. बारकोडच्या पुढील जनरेशनमधील हा कोड असून यामध्ये विविध माहिती सुरक्षित राहते. चौकोनी आकाराचा हा कोड असून आपल्या नावाप्रमाणेच फास्ट काम करण्याचे कार्य हा कोड करतो. पुस्तक असो किंवा वेबसाईट असो सर्व प्रकारची माहिती या क्यूआर कोडमध्ये समाविष्ट असते.
0 टिप्पण्या