Top Post Ad

लस उत्पादकांना न्यायालयीन कारवाईपासून संरक्षण मिळावे- पुनावाला

 पुणे:
महासाथी दरम्यान लसीच्या दुष्परिणामांबद्दल आरोप केले जातात आणि नुकसान भरपाईबाबत अवास्तव दावे केले जातात. यामुळे जनमानसात अकारण भीती निर्माण होते आणि लस उत्पादकांना आपले मूळ काम सोडून वस्तुस्थितीचे स्पष्टीकरण करण्यात आपला वेळ घालवावा लागतो,  यासाठी कोरोना महासाथीच्या काळात लस उत्पादकांना न्यायालयीन कारवाईपासून संरक्षण मिळावे, अशी विनंती सिरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी केंद्र सरकारला केली आहे. ‘कोरोनावरील लस निर्मितीमधील आव्हाने’ या विषयावरील ऑनलाईन परिसंवादात ते बोलत होते. कार्नेजी, इंडिया आयोजित ‘ग्लोबल टेक्नॉलॉजी समिट’ अंतर्गत या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. 

‘कोवॅक्स’च्या वतीने इतर देशांमध्ये लस उत्पादकांना कायदेशीर कारवाईपासून संरक्षण देण्याबाबत चर्चा सुरू करण्यात आली आहे. भारतातही असे संरक्षण आवश्यक आहे. त्यासंबंधी केंद्र सरकारकडे विनंती करणार आहे, असे पूनावाला यांनी या परिसंवादात सांगितले. अनेकदा अशा बाबतीत अवास्तव दावे केले जातात आणि त्यामुळे संभ्रम निर्माण होतो. त्यामुळे लस उत्पादनाच्या प्रक्रियेत अडथळे उत्पन्न होतात. हे टाळण्यासाठी सरकारने योग्य तीच माहिती यावी यासाठी पावले उचलण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. भारतातील सिरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक या कंपन्यांमध्ये ऑक्सफर्ड, कोव्हॅक्सिन आणि फायझर या लसींचे उत्पादन केले जात असून या कंपन्यांनी लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी मागितली आहे. दोन्ही कंपन्यांनी लसीबाबत अधिक सविस्तर माहिती सादर करण्याचे आदेश नियामकांनी दिले आहेत.

दरम्यान अमेरिकेमध्ये ही लस घेतल्यानंतर नागरिकांवर या लसीचे दुष्परिणाम झाल्याचे समोर आल्यामुळे अमेरिकेच्या सेंटर्स फॉर डिजीज कंट्रोल अॅण्ड प्रीव्हेंशनने (रोग प्रतिबंधक व नियंत्रण केंद्र) तातडीने पावले उचलत महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत.  फायझर-बायोएनटेक व मॉर्डना या दोन कंपन्यांच्या कोरोना लसींना अमेरिकेमध्ये परवानगी देण्यात आली आहे. ही परवानगी आपातकालीन वापरासाठी देण्यात आलेली आहे . मात्र प्रतिबंधक लस घेतलेल्या दोन आरोग्य कर्मचाऱ्यांवर लसीचे दुष्परिणाम दिसून आले. ही घटना अलास्का राज्यात घडली. अॅलर्जीसारखा त्रास लस घेतल्यानंतर जाणवू लागला आहे. लसीकरणामुळे दुष्परिणाम झाल्याचे निर्दशनास आल्यानंतर अमेरिकेच्या रोग प्रतिबंध व नियंत्रण केंद्राने (सीडीएस) तात्काळ मार्गदर्शक सूचना जारी केल्या. लस घेतल्यानंतर दुष्परिणाम झालेल्या व अॅलर्जीचा त्रास असणाऱ्या नागरिकांना लस घ्यावयाच्या खबरदारी बद्दल सूचना देण्यात आल्या आहेत. लसीचा पहिला डोस घेतल्यामुळे ज्या व्यक्तींना त्रास सुरू झाला आहे. लसीचा दुसरा डोस त्यांनी घेऊ नये, असे सीडीएसने स्पष्ट केले आहे. संबंधित व्यक्तीला लस दिल्यानंतर अॅलर्जीपासून संरक्षण करणारे औषध देण्यात आले आणि त्यानंतरही रुग्णालयात दाखल करण्यासारखी परिस्थिती उद्भवल्यास या प्रकरणाला गंभीर समजले जाईल. ज्या व्यक्तींना लसीमुळे अॅलर्जी होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, त्यांना लसीकरणापासून दूर ठेवण्याचे निर्देश सीडीएसने दिले आहेत.

संपूर्ण जगात कोरोनाच्या लसीची प्रतीक्षा केली जात असताना ब्राझीलचे अध्यक्ष जैर बोलसोनारो यांनी फायझरच्या लसीची खिल्ली उडविली आहे. ही लास घेतल्यानंतर महिलांना मिशा उगवल्या तरी त्याची जबाबदारी घेण्याची ‘फायझर’ची तयारी नाही, असे ते म्हणाले. बोलसोनारो यांनी, ‘कोविड १९ हा सामान्य ताप असल्याची भूमिका सातत्याने मांडली आहे. कोरोनावरील लसीवर त्यांनी अविश्वास व्यक्त केला आहे. फायझरची लस घेतल्यानंतर दुष्परिणाम (Side Effect) झाल्यास त्याची जबाबदारी उत्पादकांवर नसल्याचे त्यांच्या करारात नमूद करण्यात आले आहे, याकडे ते लक्ष वेधतात. ब्राझीलमध्ये कोरोनाची लस घेणे ऐच्छिक असून त्यांच्या सर्वोच्च न्यायालयानेही त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. लस घेतल्यानंतर तुमचे रूपांतर मगरीत झाले तरी त्याची जबाबदारी तुमच्यावरच असेल. लस घेऊन तुमच्यामध्ये अतींद्रिय शक्ती निर्माण झाली. बायकांना मिशा उगवल्या, पुरुष बायकी आवाजात बोलू लागले… असे काहीही घडले तरी ‘फायझर’ला त्याच्याशी काहीही देणे घेणे नाही. सर्वस्वी जबाबदारी तुमचीच असेल, असे बोलसोनरो यांनी म्हटले आहे.







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com