Top Post Ad

दुकाने ९.३० पर्यंत सुरू ठेवण्याकरिता ठाण्यातील व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाचे महापौरांना निवेदन

ठाण्यातील दुकाने रात्री 9.30 पर्यत सुरु ठेवावीत
पालकमंत्री यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार महापौर नरेश म्हस्के यांचे प्रशासनास आदेश  



 ठाणे
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन होते. यामध्ये ठाण्यातील सर्व दुकाने बंद होती, परंतु ठाणेकर नागरिक व व्यापारी यांचेकडून सततच्या होत असलेल्या मागणीमुळे काही अटी व शर्तीवर टप्प्याटप्प्याने दुकाने सुरु करणेबाबत परवानगी देण्यात आली होती. परंतु याचा फटका व्यापारी वर्गास मोठया प्रमाणात आजही बसत आहे, याबाबत ठाण्यातील व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने महापौर नरेश म्हस्के यांची भेट घेवून दुकाने ९.३० पर्यंत सुरू ठेवण्याची मागणी केली. याबाबत महापौर यांनी पालकमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली व  ठाण्यातील दुकाने रात्री 9.30 वा पर्यंत चालू ठेवण्यात यावीत असे निर्देश आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांना दिले आहेत.


मागील अनेक महिने दुकाने बंद असून, व्यापारी वर्गाचे आर्थिक नुकसान होत आहे. यासाठी ठाण्यातील व्यापारी संघटनानी ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे व महापौर यांना निवेदन देवून  ठाण्यातील सर्व दुकाने रात्री 9.30 वा.पर्यंत सुरु ठेवण्याची मागणी ठाणे व्यापारउद्योग महासंघाचे पदाधिकारी अध्यक्ष देवीलाल जैन, उपाध्यक्ष हिरेन शहा, उपाध्यक्ष आशिष गणू, महासचिव भावेश मारु, वरिष्ठ उपाध्यक्ष आशिष शिरसाट, मूलचंद गाला, कमलेश श्रीश्रीमल व सुरेश ठक्कर यांनी केली.  या अनुषंगाने महापौर नरेश म्हस्के यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचेशी दूरध्वनीवरुन चर्चा करुन ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व दुकानांची वेळ रात्री 9.30 पर्यंत वाढविण्यात यावी असा निर्णय घेवून याबाबत आवश्यक ती कार्यवाही करणेचे आदेश प्रशासनास दिले आहेत.


ठाण्यातील सर्व दुकानदारांनी दुकाने सुरु ठेवत असतांना आवश्यक ती काळजी घ्यावी,  सर्वांनी मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टनसिंगचा अवलंब करावा. वेळोवेळी हॅण्ड सॅनिटायझरचा वापर करावा, तसेच दुकानात ग्राहकांची गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी.  तसेच दुकानात काम करणारे व दुकानात येणाऱ्या ग्राहकांची थर्मल तपासणी करावी, तसेच दुकानात येणाऱ्या ग्राहकांनी जर मास्क लावले नसतील तर संबंधित दुकानदार यांचेवर कारवाई करण्यात येईल  याबाबतही महापालिकेने सर्वांना सूचित करावे असेही या प्रसंगी महापौर यांनी सांगितले.  तसेच जे दुकानदार या नियमांचे पालन करणार नाहीत त्यांचेवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल असेही महापौर नरेश म्हस्के यांनी नमूद केले आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com