मुंबईतील महिला नोकरदार वर्गाला लोकल प्रवास परवानगी देण्याची मागणी, प्रधानमंत्र्यांना पत्र

मुंबईतील महिला नोकरदार वर्गाला, लोकल प्रवासाची परवानगीची मागणी
'धर्मराज्य पक्षाच्या महिला संघटनेने लिहिले प्रधानमंत्र्यांना पत्र...


 ठाणे
मुंबई महानगरातील खासगी कार्यालयांत नोकरी करणाऱ्या नोकरदार महिलांसह, सर्वच महिलांना १७ ऑक्टोबरपासून लोकल प्रवास करण्याबाबत परवानगी देण्याची सूचना महाराष्ट्र शासनाने रेल्वे प्रशासनाला केली होती, परंतु राज्य शासन आणि रेल्वे प्रशासन यांमध्ये अद्यापही योग्य तो समन्वय साधला जात नसल्यामुळेच, मुंबईतील नोकरदार महिलांना आपल्या कार्यालयांत इच्छित वेळी रुजू होता येत नाही. याचा परिणाम त्यांच्या कार्यालयीन कामकाजासोबतच, त्यांच्या वेतन प्राप्तीवरदेखील होत आहे. म्हणून मुंबईतील लोकल प्रवास सरसकट सुरू करण्यात यावा, अशा आशयाचे पत्र 'धर्मराज्य पक्षा'च्या महिला संघटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी, तसेच मध्य आणि पश्चिम रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक यांना ई-मेलद्वारे पाठवून योग्य त्या खबरदारीसह लवकरात लवकर लोकलसेवा सुरू करण्याची मागणी केली आहे.


तब्बल सहा महिन्यांहून अधिक काळ सुरू असलेल्या 'कोविड-१९'च्या संक्रमणकाळात अवघ्या देशाची अर्थव्यवस्था ढासळलेली आहे. अशा परिस्थितीत गेल्या काही दिवसांपासून देशभरात, विशेषतः महाराष्ट्र राज्यात कोरोनासंबंधीचा प्रादुर्भाव समाधानकारकरित्या कमी होत असल्याने, एकीकडे महाराष्ट्र शासनाने दुकाने, औद्योगिक आस्थापना-कार्यालये, उपहारगृहे, परमिट रूम, ग्रंथालये, सार्वजनिक वाहतुकीची साधने सुरू करण्यास परवानगी दिलेली असताना, फक्त शासकीय व अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता; इतर प्रवाशांना मात्र, लोकल प्रवासास परवानगी नाकारली होती, परंतु त्यातल्या त्यात 'पुढचं पाऊल' म्हणून, १७ ऑक्टोबर पासून राज्य शासनाने महिलांना लोकल प्रवास करण्याबाबत परवानगी देण्याबाबतची सूचना देण्यात येऊनही, रेल्वे प्रशासनाने आपली आडमुठी भूमिका धरून ठेवली असल्याचेच सकृतदर्शनी स्पष्ट होत असल्याचे पत्रात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.    देशाचे प्रधानमंत्री या नात्याने ठोस निर्णय घेऊन, त्याबाबतच्या सूचना रेल्वे प्रशासनाला द्याव्यात आणि योग्य त्या खबरदारीसह, नोकरदार महिलांबरोबरच संपूर्ण प्रवास सरसकट करून, मुंबईतील नागरिकांची, प्राधान्याने महिलावर्गाची ससेहोलपट त्वरित बंद करावी, अशी आग्रही मागणी 'धर्मराज्य महिला संघटने'च्या महाराष्ट्र राज्य महिला समन्वयक स्वप्नाली पवार, ठाणे लोकसभा महिला अध्यक्षा पौर्णिमा सातपुते, नवी मुंबई महिला अध्यक्षा शीतल कोळी आणि नवी मुंबई महिला उपाध्यक्षा रेखा साळुंखे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 🙏दैनिक प्रजासत्ताक जनता नियमित वाचनासाठी

for latest updates...

Follow this link to join our WhatsApp group:

https://chat.whatsapp.com/Cf2s55RAfdQ0yVYSelRURA